मन, मृत्यू… आणि त्या पलीकडचं काहीतरी
एखादा माणूस अचानक नाहीसा होतो…
कालपर्यंत बोलत होता, हसत होता… आणि आज आपण म्हणतो — तो गेला.
पण खरंच तो जातो का?
की फक्त आपल्या दिसण्याच्या जगातून थोडा बाजूला सरकतो?
जंगलात चालताना कधी कधी असं होतं—
आपण एकटे असतो… पण एकटे वाटत नाही.
वाऱ्याची झुळूक… पानांची सळसळ… दूरचा पक्षी…
काहीतरी सतत चालू असतं.
आपणच त्यात सहभागी नसतो.
आपण जगाला पाच इंद्रियांमधून ओळखायला शिकलो — पाहणं, ऐकणं, स्पर्श, वास, चव.
पण निसर्गात वेळ घालवला की प्रश्न पडतो —
हे पुरेसं आहे का ?
काही जागा शांत करतात… काही अस्वस्थ करतात…
काही माणसं न बोलताही समजतात…
हे नेमकं कुठल्या इंद्रियातून येतं?
विज्ञानही आता हळूहळू हे मान्य करू लागलं आहे —
आपण जे पाहतो, ते पूर्ण वास्तव नसतं.
आपला मेंदू फक्त तेवढंच दाखवतो,
जेवढं आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे.
म्हणजेच…
काहीतरी अजून आहे, जे दिसत नाही.
मृत्यूबद्दलही कदाचित तसंच असेल.
निसर्गात काहीच संपत नाही —
सगळं बदलतं.
पान गळतं, माती होतं, पुन्हा झाडाला पोसतं.
पाणी वर जातं, ढग होतं, पुन्हा पाऊस बनतं.
मग माणसाचं काय वेगळं?
कदाचित मृत्यू म्हणजे शेवट नाही —
तो एक बदल आहे.
दुःखही तसंच… ते फक्त मनात राहत नाही.
ते शरीरात उतरून येतं.
आणि कदाचित त्या अवस्थेत —
आपण थोडं जास्त उघडं होतो.
काही योगायोग घडतात…
आणि आपण विचारतो —
हा फक्त योगायोग आहे का?
आज आपण खूप जोडलेले आहोत —
पण आतून तुटलेले.
निसर्गात गेलं की एक गोष्ट जाणवते —
इथे काहीच घाईत नाही.
झाडं शांत… पाणी वाहतंय… आकाश बदलतंय…
आणि आपण? सतत धावत आहोत.
कदाचित उत्तर खूप साधं आहे —
थोडा वेळ थांबणं… निरीक्षण करणं… आणि ऐकणं.
कदाचित मन फक्त मेंदूत नसावं —
ते निसर्गात, लोकांमध्ये आणि त्या न दिसणाऱ्या जगात पसरलेलं असावं.
मग मृत्यूची भीतीही कमी होते.
कारण वाटतं — हा शेवट नाही…
हा फक्त एक बदल आहे.
मुलांना जंगलात सोडलं की ते विचारत नाहीत —
ते अनुभवतात.
कुतूहलाने पाहतात… हुप्प्या करत धावतात…
आणि नकळत स्वतःला शोधायला लागतात.
थोडं मोठं झाल्यावर —
तेच अनुभव पुन्हा शोधावेसे वाटतात.
कदाचित म्हणूनच काहीजण पुन्हा निसर्गाकडे वळतात —
स्वतःला पुन्हा ओळखायला.
कळावे,
हेमंत ववले
निसर्गशाळा
www.nisargshala.in

अतिशय उत्तम. थोडक्यात पण सगळं आणि खूप काही सांगून गेलात.
मला पण असं वाटते मृत्यू म्हणजे संपलं नाही. काही तरी बदल फक्त ते आपल्या ला अजून समजले नाही किंवा आपला मेंदू त्या साठी तयार नाही. म्हणजे की डोळ्याला सूर्य कसा दिसतो कधी भगवा कधी सोनेरी कधी लाल पण खरं तो शुभ्र पांढरा आहे पण आपले डोळे सक्षम नाही. तस चं हे असावे.
अगदी बरोबार श्रीपाद जी. धन्यवाद