सह्याद्री : जीवन सुसह्य करणारा पर्वत
सह्याद्री : जीवन सुसह्य करणारा पर्वत
पहाटेच्या झुंजुमुंजू थंड हवेत, गायी गुरांच्या गळ्यातील घंट्यांच्या विस्कळीत तरीही शांत लयीत, भींतींवर लावलेल्या आणि खिडकीतुन येणा-या हवेच्या हळुवार झुळूकीसोबत हलकेच हलणा-या दिवटीच्या मंद प्रकाशात आणि जात्याच्या घर-घर पण लयबध्द पार्श्वसंगीतात सुंदर शब्द कानी येतात…
माय माऊली जोंधळे दळतेय. संसाराचे गोडवे गातेय, आशेचे नवे किरण , सुर्य उगवण्याआधीच आसमंतात उधळुन टाकते आहे. गायीच्या धारा काढण्यासाठी गड्याची लगबग सुरुये, याची चाहुल लागताच बाजुचे वासरु नाचु लागते, हिसके देउ लागते. उजाडताना अण्गणात शेणसडा पडतोय, क्वचित दुरवरुन क्षीण होत होत अजुन एका गाण्यचे स्वर कानी पडतात…
वासुदेव आला, वासुदेव आला.
सह्याद्रीने दिवसाची अशी सुरुवात अनगिनत वेळा पाहिले आहे. हजारो वर्षांपासुन सह्याद्री या सर्वाम्चा साक्षीदार आहे.

जगण्याचा शाश्वत आश्रय शोधणाऱ्या माणसाला निसर्गाने कुठे व कसा आधार दिला हे पाहताना ‘सह्याद्री’ हे नाव समोर येतं. “सह्य” म्हणजे सुसह्य, मदतीला येणारा, साथ देणारा. म्हणूनच हा पर्वतरांगांचा विशाल पट्टा केवळ भूगोलापुरता मर्यादित राहत नाही – तो संस्कृतीचा, श्रद्धेचा, आणि जीवनाचा स्थिर पाया ठरतो.
जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये शतकानुशतके लोकांनी निसर्गाशी आपापल्या पद्धतीने जुळवून घेतलं, पण सह्याद्रीने आपल्या लोकांना जणू दोन्ही हातांनी आधार दिला. युरोपात अठराव्या शतकापर्यंतदेखील स्वच्छतेसाठी पाण्याचा वापर क्वचित होत असे; राजे-राण्यांनीही अंघोळ हा दैनंदिन जीवनाचा भाग मानलेला नव्हता. पण इथे, सह्याद्रीच्या पर्जन्यछायेत, आकाशातून कोसळणाऱ्या पावसाचं पाणी नद्या, झरे, तलाव, विहिरी आणि तळी यांत साठून राहायचं.
या अखंड जलसंपदेने इथल्या लोकांना केवळ प्यायला आणि आंघोळीला पाणी दिलं नाही, तर शेतीला पोसण्यासाठी, जनावरांना पाजण्यासाठी, धान्य दळण्यासाठी, आणि गावोगावच्या नित्यउत्सवांत पवित्र स्नानासाठीही पाणी पुरवलं. पावसाळ्यात डोंगराच्या उंच कड्यांवरून कोसळणारे धबधबे गावकऱ्यांसाठी फक्त निसर्गदृश्य नव्हते, तर पाणी साठवण्याची आणि जगण्याला पुरवठा करण्याची देवाची देणगी होती.
सह्याद्रीतील मातीने पाणी धरून ठेवण्याची ताकद दिल्यामुळे उन्हाळ्यातही पाणवठे आटत नसत. सकाळी गावातील स्त्रिया पितळेच्या घागरी घेऊन पाण्यासाठी चालताना गाणं म्हणत जात, मुलं नदीकाठच्या उथळ पाण्यात खेळत, आणि शेतकरी बैलांना पाण्याच्या ओढ्यापाशी नेऊन थकवा उतरवत. या पाण्याच्या सहज उपलब्धतेमुळे इथलं जीवन स्वच्छतेकडे आणि आरोग्याकडे झुकत राहिलं – जे त्या काळी जगातील अनेक भागांत दुर्मिळ होतं.
सह्याद्रीची रचना - पृथ्वीच्या प्राचीन स्मृतींमधून घडलेला वारसा

साधारण २५ कोटी वर्षांपूर्वी, पृथ्वीवर पॅंजिया नावाचा एकच महाभूखंड होता. त्या काळी डायनासोरांचा एकछत्री अंमल होता आणि आपले सस्तन प्राण्यांचे पूर्वज जमिनीत लपून जगायचे. मग सुमारे ६६ कोटी वर्षांपूर्वी एक महाकाय उल्कापात झाला, ज्याने त्या महाकाय सरपटणाऱ्या प्राण्यांचा अंत घडवला. धूर, धूळ, आम्लवर्षा आणि हिमयुग या सगळ्यांनी पृथ्वीचे रूप बदलले.
पॅंजिया हा महाभूखंड नंतर, अंदाजे २० कोटी वर्षांपूर्वी, हळूहळू तुटून वेगवेगळ्या दिशांनी वाहू लागला. याच तुकड्यांपैकी एक होता भारतीय उपखंड—तो मुळचा आशियाचा भाग नव्हता. भारतीय भूमी उत्तरेकडे सरकत जाऊन अखेर आशियाला धडकली, आणि या भव्य टक्करमधून हिमालय उभा राहिला.
दख्खन पठार आणि सह्याद्री पर्वतरांग मात्र त्यापूर्वीच अस्तित्वात होती. सह्याद्रीची खरी निर्मिती साधारण ६६ कोटी वर्षांपूर्वीच्या दख्खन ट्रॅप्स ज्वालामुखी उद्रेकांमधून झाली. या उद्रेकांतून बाहेर पडलेला गरम, द्रवरूप बेसॉल्ट लाव्हा थरावर थर साचत गेला, आणि लाखो वर्षांत तो आजचे पठारी भाग, उंच कडे, सुळके आणि कातळांचा किल्ला बनला.
या लाव्हाच्या प्रवाहांत कधी तिरक्या, कधी उभ्या फटींत शिरून घट्ट झालेले डाईक—भिंतीसारखे बेसॉल्टचे थर—आजही सह्याद्रीच्या कातळांमध्ये जणू काळाच्या शिक्क्यासारखे उभे दिसतात. वारा, पाऊस, उन्हाचा सततचा प्रहार आणि गाळ वाहून नेणाऱ्या नद्यांनी लाखो वर्षांत या पर्वतरांगांना खोल दऱ्या, विशिष्ट आकाराचे सुळके आणि गड-किल्ल्यांसारखे कडे बहाल केले.
सह्याद्री ही फक्त भूगर्भीय चमत्कार नाही; ती आपल्या हवामान, पर्जन्यमान आणि जैवविविधतेवर परिणाम करणारी एक जिवंत, धीरगंभीर रक्षक आहे—पृथ्वीच्या प्राचीन स्मृतींमधून घडलेला आणि अजूनही जिवंत असलेला वारसा.
प्राचीन सहजीवन आणि ज्ञानपरंपरा
सह्याद्री हा केवळ भूशास्त्रीय संरचना नसून तो प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचा स्त्रोत राहिला आहे. नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर परिसरात ऋषी-मुनींची तपश्चर्या, सह्याद्रीत उगम पावलेल्या नद्यांच्या काठी चाललेले वेदाध्ययन, आणि विशेष म्हणजे जनजाती, आदीवासी, कातकरी, कोळी, वारकरी आणि भिल्लांची लोकसाहित्यपरंपरा – या साऱ्यांमध्ये सह्याद्री जणू साक्षीदार ठरतो.
सह्याद्रीच्या कुशीत प्राचीन भारतातील गणितज्ञ आणि खगोल तज्ञ भास्कराचार्य यांचे योगदान विशेष उल्लेखनीय. महाराष्ट्रातील विजयेगड (काही अभ्यासकाम्च्या मते कर्नाटकातील बिजापुर हे देखील त्यांचे जन्मस्थान आहे)जवळील सह्याद्री भागात जन्मलेले हे संशोधक लीलावती आणि सिद्धांत शिरोमणी सारख्या ग्रंथांमधून आपला वारसा मागे ठेवतात. तोरणा किल्ला प्राचीन काळी शैव साधुंचे साधनास्थळ होते, आणि कथा प्रत्येक गडकोटासंदर्भात लोककथांमधुन, दंतकथांमधुन आजही रुंजी घालत आहेत.
महान व्यक्तिमत्वांची पायवाट
भगवान परशुरामापासून ते आजच्या पर्यावरण चळवळीपर्यंत अनेक व्यक्तींनी सह्याद्रीला आपली कर्मभूमी मानली. ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीपासून त्र्यंबकापर्यंतची पदयात्रा केली, रामदास स्वामींनी सह्याद्रीच्या दुर्गम भागात चालवलेली सामाजिक चळवळ, शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला गड-किल्ल्यांचा अभेद्य संरक्षक पट्टा, भारतातील नाथ परंपरा, संत ज्ञानेश्वर, तुकोब्बा राय, एकनाथ महाराज, महिला संत कवी, बलुतेदार संत महात्मे – हे सारे प्रमाण आहे सह्याद्री ही महामानवांना जन्म देणारी सुपीक भुमी आहे.
इतिहासात अनेक परदेशी प्रवासी आणि चीनी भिक्षूंच्या नोंदींमध्ये सह्याद्रीचा उल्लेख येतो. त्यांच्या नजरेत इथली हिरवाई, नद्यांचा प्रवाह, गड-किल्ल्यांची रांग आणि स्थानिक लोकसंस्कृती हे सारे विस्मयकारक होते. इंग्रजी फिरस्त्यांनी प्रवासवर्णनांतून इथल्या निसर्गाची आणि लोकजीवनाची बारकाईने नोंद घेतली; त्यांच्या नकाशांत, रेखाटनांत आणि दिनदर्शिकांत आजही त्या काळचं चित्र जिवंत आहे. चीनी भिक्षूंनी येथील आध्यात्मिक केंद्रं, गुहा आणि साधुसंतांच्या परंपरेचं मनोवेधक वर्णन केलं.
आधुनिक काळात पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी सह्याद्रीच्या जैवविविधतेचं आणि संवर्धनाचं महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित केलं. त्यांच्या अभ्यासातून, धोरणांमधून आणि अहवालांतून सह्याद्रीला मिळालेलं स्थान आजही पर्यावरण चळवळीचं प्रेरणास्थान आहे. अलीकडच्या काळात डॉ. पद्मभूषण राधामोहन गांधी, पद्मश्री भीमा नाइक, आणि अनेक पर्यावरण अभ्यासक, ट्रेकर्स, लेखक – यांचा सह्याद्रीशी असलेला स्नेह नव्या पिढीला जंगल, गड-किल्ले आणि नद्या यांचं मोल शिकवतो.
सह्याद्रीतून उमललेली कला-संस्कृती
जिथे पाण्याची, अन्नाची, आणि निवाऱ्याची शाश्वती असते, तिथेच गाणी, नृत्य, आणि कथा ह्या आपोआप अंकुरतात. सह्याद्रीच्या कडेकपारींमध्ये पावसाळ्यात धुकं पसरलेलं असतं, आणि एखाद्या गावाच्या वेशीवर रात्रीच्या तमाशाला किंवा भारुडाला गेलेली माणसं परतताना झाडांच्या पानांतून थेंब झरण्याचा मंद आवाज ऐकत चालतात. चांदण्यांच्या प्रकाशात रंगलेली कोल्हाटी-लावणी, ढोलकीचा ताल, आणि नृत्यातील फिरकी – या सगळ्यांमध्ये मातीचा गंध मिसळलेला असतो.
जात्यावरील गाणी ऐकताना, भात लावणी करताना फेर धरणा-या स्त्रियांची लय जणू पिकांच्या शेंड्यांतूनही झुलत राहते. हळद दळताना गाणाऱ्या ओव्या, पाचवीच्या पुजेच्या अंगणात ऐकू येणारे गोड सूर – हे सारे आपल्या गावांचा आत्मा आहेत. संतसाहित्य, हरिपाठ, किल्ल्यांच्या तटांवर गुंजणारे पोवाडे – हे फक्त कला नाहीत, तर शतकानुशतकांच्या स्मृती, संघर्ष, आणि श्रद्धेचे दस्तऐवज आहेत. या प्रत्येक कलाप्रकाराचा विस्तृत प्रवास आपण पुढील लेखांमध्ये अनुभवणार आहोत.
गोपाळांची संस्कृती – काळाच्या पडद्यावर लोप पावलेलं एक जिवंत चित्र

काही वर्षांपूर्वी ‘हीरडस मावळ’ या सह्याद्रीच्या कुशीत मला एक गोपाळ भेटला. गोपाळ म्हणजे गावातील गायींना, बैलांना, वासरांना सांभाळणारा — हा फक्त व्यवसाय नाही, तर आयुष्यभर जपलेली परंपरा. त्याच्या हातात बासरी, डोक्यावर साधी टोपी, आणि खांद्यावर घुंगरांनी सजवलेली जुनी घोंगडी होती. हातातील काठीला देखील घुंगरांची सजावट होती. उन्हं, पाऊस, थंडी — सगळ्यांना तोंड देण्यासाठी तो आणि त्याचं साहित्य अगदी तयार होतं.
त्याच्या मागे एक मोठा कळप चालला होता — वीस-पंचवीस गायी, काही बैल, वासरे, सगळे मिळून जणू एक कुटुंबच. बासरीचे गोड सूर हवेत पसरले होते, झाडांच्या सावलीत गायी विश्रांती घेत होत्या, आणि डोंगरांनी जणू त्यांच्यासाठी कवच पसरवलं होतं. त्या क्षणी निसर्ग, माणूस आणि जनावरं — तिघेही एकमेकांत गुंफलेले भासले.
सह्याद्रीमध्ये असे गोपाळ गावागावत होते. त्यांची रानवनाशी नाळ जोडलेली होती. त्यांनी छेडलेल्या बासरीच्या सुरांनी गायीगुरेच काय पण निसर्गदेखील मंत्रमुग्ध होत असेल प्राचीन काळापासुन.
हा फक्त देखावा नव्हता, तर निसर्गाशी असलेला एक जिव्हाळ्याचा नातं होतं. पण दुर्दैवाने, अशी आत्मीय गोपाळ संस्कृती आता हळूहळू कमी होत चालली आहे. डोंगरावरची गायराने कमी होत आहेत, आणि या जीवनशैलीचे तेज आता मंदावू लागले आहे.
सह्याद्रीतील देवराया – निसर्गाचे पवित्र प्राणवायुची बेटं
सह्याद्रीच्या पायथ्याशी किंवा डोंगराच्या कुशीत वसलेल्या देवराया म्हणजे निसर्गाची लहानशी मंदिरेच. गावातील कुणीही तिथे झाड तोडत नाही, पानपण फुकट उपटत नाही, कारण तेथे प्रत्येक झाड, पाखरू, आणि फुल हे देवाच्या संरक्षणाखाली आहे, अशी श्रद्धा आहे. सकाळी तिथून चालताना पायाखाली ओलसर पानांचा गालिचा असतो, आणि वरून जुनी झाडं जणू छत्री धरून उभी असतात.
या लहानशा जंगलांमध्ये ऋतुचक्रानुसार रंग बदलतात – पावसाळ्यात हिरवी गर्द छाया, हिवाळ्यात गारवा, आणि उन्हाळ्यात पिवळसर पाने जमिनीवर सांडून नवीन जीवनाला जागा करून देतात. तिथे उगवणाऱ्या औषधी वनस्पती, दुर्मिळ पक्षी, आणि लहान प्राणी – हे सगळं आपल्या पिढ्यांसाठी जपणं म्हणजे भविष्याचा साठा जपणं आहे. जगभरात अशा पवित्र उपवनांच्या प्रथा दिसतात, पण सह्याद्रीतील देवराया या परंपरेला स्थानिक रंग आणि सुगंध देतात.

सह्याद्रीसमोरील आव्हानं

जगण्याला सुसह्य करणाऱ्या या पर्वतरांगा आज नव्या, अधिक भीषण धोक्यांना सामोऱ्या जात आहेत. मानवनिर्मित वणव्यांच्या ज्वाळा फक्त जंगल जाळत नाहीत, तर शेकडो वर्षे उभ्या असलेल्या परिसंस्थेची मुळेच खणून काढतात. फार्महाऊस प्लॉटिंगसाठी डोंगर फोडणे, सपाटीकरण करणे, आणि जंगलतोड – या कृतींमुळे केवळ झाडं नाहीशी होत नाहीत, तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या असंख्य स्थानिक वनस्पती आणि प्राणी प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर जातात. या रानफुलांपासून ते दुर्मिळ पक्ष्यांपर्यंत, प्रत्येक जीव निसर्गाच्या एका गुंतागुंतीच्या साखळीचा भाग आहे, जी तुटली तर पुन्हा कधी जुळू शकत नाही.
एका पिढीने केलेला हा नाश पुढच्या अनेक पिढ्यांचा पाण्याचा, अन्नाचा आणि जीवनाचा आधार हिरावून घेऊ शकतो. सह्याद्रीच्या उरात वसलेल्या नद्या, झरे, माळरान, देवराया – हे फक्त निसर्गाचे दान नाहीत, तर आपल्या संस्कृतीचे जिवंत पुरावे आहेत. त्यांना जपणं ही केवळ जबाबदारी नाही, तर आपल्या पूर्वजांच्या वारशाशी आणि येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्याशी निष्ठा दाखवण्याचं नैतिक कर्तव्य आहे.
केवळ निर्जीव डोंगर नाही तर एक सजीव पर्वतरांग
सह्याद्री केवळ इतिहासातच नव्हे, तर आजच्या जगण्यातही तितकाच महत्त्वाचा आहे — पश्चिमेकडून येणाऱ्या पावसाचे थेंब पकडून ठेवणारी ही रांग आपल्या नद्या, धरणं आणि शेतीचा पाया आहे. पर्यटन, जलसंपदा आणि हवामान बदलाच्या आव्हानांमध्ये सह्याद्रीच महत्त्व आज अधिक जाणवतं; कारण त्याचा नाश म्हणजे आपला नाश, आपल्या संस्कृतीचा नाश, आपल्या भविष्याचा नाश.
सह्याद्री फक्त डोंगररांग नाही, तो श्वास घेणारा जीव आहे – जो गवताच्या कुशीतून, ढगांच्या सावलीतून, पक्ष्यांच्या गीतातून, पावसाच्या थेंबांतून आपल्याशी बोलतो. सह्याद्री म्हणजे विस्मरणात जात असलेली एक शाश्वत जाणीव, जी पुन्हा पुन्हा आपल्याला आपल्या मुळांशी जोडते.
धन्यवाद
हेमंत ववले, निसर्गशाळा, पुणे
सह्याद्रीला समजुन घेण्यासाठी या लेख मालेतील पुढील भाग अवश्य़ वाचा.