कालचक्र पुस्तकाचे मुखपृष्ठ
निसर्गशाळा प्रस्तुत

कालचक्र

काळ, अनुभव आणि अस्तित्वाचा शोध

हेमंत ववले

प्रकाशन माहिती

कालचक्र
काळ, अनुभव आणि अस्तित्वाचा शोध

© २०२६ हेमंत ववले
सर्व हक्क राखीव.

ही या पुस्तकाची पहिली डिजिटल आवृत्ती आहे.

प्रकाशक
निसर्गशाळा (Nisargshala)

www.nisargshala.in

या पुस्तकातील कोणताही भाग लेखकाच्या लेखी परवानगीशिवाय पुनर्मुद्रित, अनुवादित किंवा इतर कोणत्याही स्वरूपात प्रकाशित करू नये.

लेखकाविषयी

हेमंत ववले

हेमंत ववले हे निसर्गप्रेमी, निरीक्षक आणि विचारांचा सतत शोध घेणारे लेखक आहेत. निसर्ग, विज्ञान, भारतीय तत्त्वज्ञान आणि मानवी अनुभव यांच्या संगमातून त्यांनी स्वतःचे प्रश्न आणि निरीक्षणे विकसित केली आहेत.

त्यांनी स्थापन केलेली निसर्गशाळा ही केवळ कॅम्पिंग किंवा पर्यटनाची जागा नसून, निसर्गाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची एक प्रयोगशाळा आहे. सह्याद्रीतील भ्रमंती, तारांगण निरीक्षण, रानभाज्या, जैवविविधता आणि मुलांसाठीचे अनुभवाधारित शिक्षण या उपक्रमांतून त्यांनी हजारो जिज्ञासूंना निसर्गाशी जोडले आहे.

कालचक्र हे पुस्तक कोणत्याही विशिष्ट तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्यासाठी लिहिलेले नाही. उलट, आपल्या दैनंदिन अनुभवांमधून उभे राहणाऱ्या काही मूलभूत प्रश्नांचा प्रामाणिक शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे.

काळ म्हणजे नेमके काय?
वर्तमान क्षण खरोखर अनुभवता येतो का?
स्मृती, जाणीव आणि अनुभव यांचा परस्पर संबंध कसा आहे?
भारतीय तत्त्वज्ञान काळाकडे कोणत्या दृष्टीने पाहते?

या प्रश्नांची अंतिम उत्तरे देण्याचा दावा हे पुस्तक करत नाही. मात्र, वाचकाने स्वतः विचार करण्यासाठी एक शांत, संयमी आणि जिज्ञासू प्रवास सुरू व्हावा, एवढीच लेखकाची अपेक्षा आहे.

कालचक्र
प्रस्तावना

प्रस्तावना

काळ म्हणजे नेमके काय?

हा प्रश्न मला अनेक वर्षांपासून पडत आला आहे.

आपण वेळ मोजतो. घड्याळे वापरतो. दिवस, महिने, वर्षे मोजतो. पण आपण जे मोजतो, तो खरोखर काळ असतो का? की काळाची काही चिन्हे?

या प्रश्नाचा शोध घेत असताना मला जाणवले की काळ हा केवळ भौतिकशास्त्राचा विषय नाही. तो तत्त्वज्ञानाचाही आहे, मानसशास्त्राचाही आहे, जीवशास्त्राचाही आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तो प्रत्येकाच्या अनुभवाचा विषय आहे.

या लेखमालेत मी कोणताही नवा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही. तसेच येथे मांडलेले विचार अंतिम सत्य आहेत, असाही माझा दावा नाही.

उलट, हे लेख लिहिताना माझ्याच मनात अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले. काही प्रश्नांची उत्तरे मिळाली असे वाटले, तर काही प्रश्न अधिकच गहिरे होत गेले.

या प्रवासात मी कधी माझ्या अनुभवांचा आधार घेतला आहे, कधी विज्ञानाचा, तर कधी भारतीय ज्ञानपरंपरेतील विचारांचा. काही ठिकाणी निसर्ग माझा शिक्षक झाला, तर काही ठिकाणी एखादा साधासुधा प्रसंग अनेक वर्षे मनात रेंगाळत राहिला.

माझी एकच अपेक्षा आहे.

हे लेख वाचताना माझ्या मतांशी सहमत व्हावे, अशी अपेक्षा नाही. पण हे प्रश्न स्वतःला एकदा तरी विचारून पाहावेत, एवढीच इच्छा आहे.

कदाचित माझे काही विचार चुकीचे असतील. काही अपूर्ण असतील. काही पुढे बदलतीलही.

कारण विचार करणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे.

हा ग्रंथ त्या प्रवासाची नोंद आहे.

चला...
काळाला मोजण्यापेक्षा
एकदा त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
— हेमंत ववले

कालचक्र

भाग १

काळाची चाहूल

भाग १ — काळाची चाहूल

काळ म्हणजे नेमके काय?

आमच्या गावात एक परंपरा आहे. गोकुळाष्टमीच्या काळात मंदिरामध्ये पहारा घेण्याची पद्धत. प्रत्येक घरातील एका व्यक्तीने आळीपाळीने पहारा द्यायचा असतो. मला जसे समजू लागले तसे आमची वेळ आली की मलाच जावे लागायचे. दोन तासांचा पहारा असायचा.

अपरात्री पहारा घ्यायची वेळ आली तर मंदिरात अजून कुणीही नसते किंवा मागचे-पुढचे पहारेकरी एक-दोन जण झोपलेले असतात. मंदिराच्या बाहेर, रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशापलीकडे फक्त अंधार!

दिवसा मात्र चित्र वेगळे असते. मंदिरात मोजकी माणसे काहीतरी वेळ घालवत बसलेली असतात आणि बाहेर जगाची नेहमीची धावपळ सुरू असते. या दोन्हीपैकी दिवसा पहारा असेल तर ते दोन तास तुलनेने लवकर संपतात; पण अपरात्रीचे तेच दोन तास संपतच नाहीत.

असे का होत असावे?

मंदिरातील पहाराारा

मागील एखाद्या तासापूर्वी, काल, परवा किंवा भूतकाळातील कोणत्याही आठवणीतील एखाद्या घटनेविषयी बोलताना शिवा सहज म्हणतो, “मागच्या वेळी...” त्याला अद्याप भूतकाळातील विशिष्ट काळाविषयी कसे बोलायचे हे अवगत नाही. त्यामुळे त्याच्यासाठी चालू क्षणाच्या आधी घडलेल्या साऱ्या गोष्टी एकाच भूतकाळात सामावलेल्या आहेत.

आपण मात्र काल, परवा, मागच्या महिन्यात, गेल्या वर्षी अशी वेगवेगळी नामाभिधाने वापरतो. त्यामुळे भूतकाळामध्ये खरोखरच भेद निर्माण होतो का? की तो केवळ आपल्या भाषेचा परिणाम आहे?

केवळ भूतकाळच नव्हे, तर तीन काळांविषयी विचार करताना आपण मनोमन हे गृहीत धरलेले असते की भूत, वर्तमान आणि भविष्य असे तीन स्वतंत्र काळ आहेत.

काल काय घडले याचे स्मरण होताना आपणास खात्री असते की ‘काल’ नावाची एखादी गोष्ट अस्तित्वात आहे.

पण खरंच...

‘कालचा दिवस’ नावाची एखादी गोष्ट अस्तित्वात आहे का?

तसेच उद्याचेही आहे. आपण उद्या नावाची एखादी गोष्ट अस्तित्वात आहे, या खात्रीने उद्यासाठी नियोजन करतो.

पण ‘उद्याचा दिवस’ नावाची एखादी गोष्ट प्रत्यक्षात अस्तित्वात आहे का?

किंबहुना हेच विश्लेषण आणखी संक्षिप्त करूया.

दिवस या परिमाणाऐवजी आपण क्षण या परिमाणात बोलूया.

ज्या क्षणी मी हे टाइप करीत आहे, त्या आधीचा क्षण माझ्यासाठी भूतकाळ आहे. आणि ज्या क्षणी तुम्ही ‘हा’ शब्द वाचत आहात, त्या क्षणी त्या आधी वाचलेला प्रत्येक शब्द तुमच्यासाठी भूतकाळात गेलेला आहे.

मी जो क्षण जगत आहे, तोच क्षण मला माझ्या अस्तित्वाचे भान करून देतो. मला काहीतरी अस्तित्व आहे आणि ते मला समजते ते केवळ या क्षणी. वर्तमान क्षणी.

याचा अर्थ असा होतो का की काळ, वेळ, समय, कालः किंवा Time म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून जो दृष्टा आहे, जो कर्ता आहे, त्या प्रथमपुरुषी अनुभवाला स्वतःच्या अस्तित्वाचे भान होणे?

याचाच अर्थ असा देखील होऊ शकतो का की प्रत्यक्ष ज्ञान, प्रत्यक्ष अनुभव फक्त वर्तमान क्षणाचाच असतो?

बाकीचे दोन्ही — भूत आणि भविष्य — हे मनाचे खेळ आहेत?

कारण त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान इंद्रियांच्या आधारे होत नाही. ते स्मरणात असतात, कल्पनेत असतात.

त्यामुळे ते अस्तित्वमान नाहीतच असे मला वाटते.

जे काही आहे ते केवळ चालू क्षणात आहे.
चालू क्षणच सत्य आहे.

स्वतःच्या अस्तित्वाचे भान कशाने होते?

आपल्या पंचेंद्रियांमुळे आपणास बाह्य जगाचे ज्ञान होते. पण स्वतःच्या अस्तित्वाचे भान पंचेंद्रियांखेरीज अन्य कशाने होऊ शकते?

मन नावाचे आणखी एक औजार आपल्याकडे आहे.

मन आणि बुद्धिमत्ता (Intelligence) यात काही भेद आहे का? की ते दोन्ही एकच आहेत?

मला आधी वाटायचे की आपल्या इंद्रियांमुळेच आपणास स्वतःच्या अस्तित्वाचे भान होते.

मग माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला—

जर सर्व पंचेंद्रिये कार्य करीत नसतील, तरी आपणास आपल्या अस्तित्वाचे भान होईल का?

आपण जैवशास्त्रीय भाषेत जिवंत आहोत, पण कोणतेही इंद्रिय कार्यरत नाही; अशा अवस्थेत भूत, वर्तमान आणि भविष्य असे भेद उरतील का?

एखादा योगी जर बाह्य जगाचा अनुभव घेणे थांबवून सर्व इंद्रिये अंतर्मुख करेल, तर त्याच्या दृष्टीने काळ थांबेल का?

वरील दोन्ही उदाहरणे आणि माझे मंदिरातील पहारे यामध्ये काही संबंध आहे का?

ते दोन तास संपत नाहीत.

याचा अर्थ माझ्या दृष्टीने काळाची गती मंदावते का?

आणि ती कशामुळे?

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग आलेले असतात, जेव्हा काळ पुढे सरकतच नाही, किंवा फार हळूहळू सरकत असल्याचा भास होतो.

याचे कारण काय असावे?

इंद्रिये हेच त्यामागचे कारण आहे का?

अपरात्री मंदिरात अन्य कुणी नसताना इंद्रियांना बाह्य जगाकडून मिळणारे संकेत तुलनेने कमी असतात. त्यामुळेच कदाचित काळ संथ गतीने चालल्याचा भास होत असावा का?

आणि जेव्हा इंद्रिये वर्तमानातून कमी संकेत देतात, तेव्हा मन अधिक कार्यरत होऊन आपल्याला भूत आणि भविष्य अशा दोन्ही काळांमध्ये घेऊन जाते का—ज्या काळांचे प्रत्यक्ष अस्तित्वच नाही?

काळ...
समय...
कालः...
Time...

म्हणजे नेमके काय?
हेमंत ववले
निसर्गशाळा, पुणे

कालचक्र

भाग २

अस्तित्वाची जाणीव

भाग २ : अस्तित्वाची जाणीव

काळ म्हणजे नेमके काय, हा प्रश्न विचारल्यानंतर एक नवीन प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो.

आपण काळ अनुभवतो की आपण स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव घेतो?

जर भूत आणि भविष्य हे प्रत्यक्ष अनुभवाचे विषय नसतील, तर वर्तमान क्षणाचे वैशिष्ट्य काय?

आणि जर वर्तमान क्षणातच स्वतःच्या अस्तित्वाचे भान होत असेल, तर काळ हा स्वतंत्र घटक आहे, की अस्तित्वाच्या जाणीवेचेच दुसरे नाव?

या भागातील लेख

कालचक्र

भाग २

अनुभव म्हणजे काळ

चालू क्षणाचे प्रत्यक्ष ज्ञान होणे किंवा चालू क्षणात बाह्य जगाचा अनुभव होणे म्हणजेच काळ, असे मला अनेक दिवसांच्या चिंतनातून वाटत आले आहे.

मागील लेखावर आलेल्या एका प्रतिक्रियेमध्ये एक व्हिडिओ पाहिला. त्यात जीवशास्त्रीय परिभाषेनुसार असे सांगण्याचा प्रयत्न केला होता की आपण प्रत्यक्षात वर्तमानात जगत नसतोच. आपल्या बाह्येंद्रियांद्वारे मिळणारे अनुभव मेंदूपर्यंत पोहोचण्यास सुमारे ८० मिलीसेकंद लागतात.

याचाच अर्थ असा काढला जातो की आपण वर्तमानात नव्हे तर भूतकाळात जगत असतो.

हे खरे आहे का?

वैज्ञानिक दावा केला आहे, त्यामुळे त्यामागे संशोधन आणि तथ्यांचा आधार असणारच. तरीही मला हा निष्कर्ष पूर्णपणे योग्य वाटत नाही.

माझ्या मते आपण वर्तमानातच जगत असतो; मात्र आपण जे काही अनुभवले आहे, ते समजण्यास काही मिलीसेकंदांचा विलंब होतो.

अनुभव घेणे ही प्रक्रिया अखंड सुरूच असते.

त्या अनुभवांपैकी काही मोजकेच मेंदूपर्यंत पोहोचतात, अनेक कधीच जाणीवेपर्यंत पोहोचत नाहीत.

आपण वर्तमानात जगत नाही असे नाही...

आपण वर्तमान समजण्यास काही मिलीसेकंद उशीर करतो.

म्हणूनच आपण सदैव भूतकाळात जगतो, असे म्हणणे मला योग्य वाटत नाही.

आता आपण दुसरा विचार करूया.

चालू क्षणाचा अनुभव घेणे म्हणजे बाह्य जगाशी सतत अन्योन्यक्रिया चालू असणे.

या अन्योन्यक्रियेमध्ये काही योजना आहे का?

काही हेतू आहे का?

बाह्य जगाचा अनुभव होत असल्यामुळेच मला माझ्या अस्तित्वाची जाणीव होत असते.

मी अस्तित्वमान आहे, हे मला समजते... आणि तेच कदाचित काळ आहे.

येथे मी स्पेसमधील 'टाईम' या संकल्पनेविषयी बोलत आहे.

काळ, वेळ, समय आणि अवकाश
काळ, वेळ, समय, कालः आणि Time — एका संकल्पनेच्या विविध अभिव्यक्ती.

ज्या प्रकारे बाह्य जगात पदार्थ आहेत, त्यांना आकार, रूप, गंध, तापमान असे गुण आहेत; त्या प्रकारे काळाला असे कोणतेही गुण नाहीत की ज्याद्वारे आपण त्याला थेट जाणू शकू.

काळाला आपण जाणू शकतो ते केवळ आपल्या अस्तित्वाच्या जाणीवेवरून.

आपण अस्तित्वमान आहोत, याची अनेक प्रमाणे आपल्याला सतत मिळत असतात.

प्रत्येक अनुभव ही त्या जाणीवेची पुनःपुष्टी असते.

आणि त्या प्रत्येक अनुभवाबरोबर आपल्याला असे वाटते की कालचक्र पुढे सरकत आहे.

पण खरोखर कालचक्र पुढे सरकते... की आपल्या अनुभवांची मालिका पुढे सरकत असते?

— हेमंत ववले

निसर्गशाळा, पुणे

कालचक्र

भाग २

अन्योन्यक्रिया आणि अस्तित्व

बाह्य जगताशी आपला येत असलेला संबंध कशामुळे येत असतो? हे सर्व आपल्या नकळत घडते, की आपण जाणीवपूर्वक हा संबंध प्रस्थापित करीत असतो?

मी लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहून हे टायपिंग करीत आहे. माझी बोटे पटापट चालत आहेत. कोणते बोट कोणत्या कळीवर पडणार, याचा निर्णय प्रत्यक्ष कृती घडण्यापूर्वीच झालेला असतो का? जर तसे असेल, तर तो निर्णय कोण घेतो? आणि तो प्रत्यक्ष कृतीच्या किती आधी घेतला जातो?

माझा श्वास सुरू आहे. मी त्याचा जाणीवपूर्वक विचार करीत नाही. तरीही तो अखंड सुरू असतो.

आपल्या कानांवर सतत आवाज येत असतात. आपण जागे असतो तो प्रत्येक क्षण कान बाह्य जगातील संकेत स्वीकारत असतात. परंतु त्या प्रत्येक आवाजावर आपण प्रतिक्रिया देत नाही.

मेंदू कोणत्या संकेताकडे लक्ष द्यायचे आणि कोणत्या संकेताकडे दुर्लक्ष करायचे, हे ठरवत असतो.

अन्योन्यक्रिया सतत घडत असतात...

परंतु प्रत्येक अन्योन्यक्रिया आपल्या जाणीवेपर्यंत पोहोचतेच असे नाही.

म्हणजेच बाह्य जगाशी आणि आपल्या शरीराशी असंख्य देवाणघेवाणी सतत सुरू असतात. त्यांपैकी केवळ काहीच आपल्या जाणीवेचा भाग बनतात.

ज्या क्रिया पुढच्या क्षणासाठी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यास आवश्यक असतात, त्यांची नोंद, प्रक्रिया आणि प्रतिक्रिया अधिक महत्त्वाची ठरते.

आपण जर आजही आदिम जंगलात राहत असतो, तर आपले प्रमुख ध्येय एकच असते—पुढचा क्षण जगणे.

इतर बहुतांश प्राणी आजही हेच करीत आहेत.

मग केवळ मनुष्यच अजून न आलेल्या अनुभवांचे अंदाज कसे बांधू शकतो?

भविष्यासाठी योजना आखणे, कल्पना करणे, शक्यता मांडणे—ही क्षमता आपल्याकडे कशी आली?

आणि त्यामुळे आपण अधिक सक्षम झालो आहोत की अधिक अस्वस्थ?

भविष्य ही प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट नाही...

ती कल्पना करण्याची क्षमता आहे.

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव स्वतंत्रपणे कार्य करतो; परंतु तो पूर्णपणे स्वतंत्र नाही.

प्रत्येक अवयव एका मोठ्या योजनेचा भाग आहे.

त्याच्या कार्यामध्ये स्वातंत्र्य आहे; परंतु त्यापेक्षा अधिक आहे परस्परावलंबित्व.

उदाहरणार्थ, आपल्या त्वचेमधून सतत वायू आणि पाण्याचे आदानप्रदान होत असते. त्या प्रक्रियेची आपल्याला जाणीव नसते; तरी ती अखंड सुरू असते.

एका अवयवाची क्रिया दुसऱ्या अवयवाच्या कार्यासाठी आवश्यक ठरते.

अशा असंख्य स्थानिक योजना एकत्र येऊन शरीर ही एक व्यापक योजना घडवतात.

शरीरातील प्रत्येक व्यवस्था स्वतंत्र आहे...

पण एकटी नाही.

आपल्या शरीरातील या सर्व अंतर्गत अन्योन्यक्रिया, तसेच बाह्य जगाशी असणाऱ्या देवाणघेवाणी, बहुतांश वेळा आपल्या नकळत घडत असतात.

त्यांचे परिणाम मात्र आपल्या अस्तित्वाला आधार देत असतात.

अनेक प्रक्रिया सुरू असतात; पण त्या सर्व आपल्याला कळतातच असे नाही.

कळले नाही म्हणून त्या थांबत नाहीत.

यावरून असे म्हणता येईल का, की या सर्व अन्योन्यक्रिया एखाद्या व्यापक योजनेचा, हेतूचा किंवा बुद्धिमत्तेचा भाग आहेत?

आणि जर तसे असेल...

तर ही बुद्धिमत्ता नेमकी कुठे आहे?

मेंदूमध्ये?
शरीरात?
की संपूर्ण निसर्गात?

— हेमंत ववले

निसर्गशाळा, पुणे

कालचक्र

भाग ३

भूतकाळाचे पडदे

भूतकाळाचे पडदे

'काळचक्र अव्याहतपणे फिरत आहे, गतिमान आहे,' हे अगदी परवलीचे शब्द आहेत. पण हे फिरते म्हणजे नेमके काय होत असते? "फिरते" हा शब्द खरोखर योग्य आहे का?

मी या विषयाविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

आपण काळाचे सहजपणे तीन भाग केले आहेत—भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ.

काळाच्या पडद्यावरील एखादा अंक या तिन्हीपैकी कोणत्या प्रकारात मोडतो, हे समजण्यासाठी किंवा एक समान सामंजस्य निर्माण करण्यासाठी आपण दोन वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करीत असतो.

काळाच्या पडद्यावरील हे नाट्य एका मागोमाग एक अंक सादर करीत सदैव सुरूच असते.

जेव्हा आपण मन नावाच्या साधनाच्या आधारे या पडद्यावरील एखादा अंक पाहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो अंक भूतकाळातील आहे असे आपण म्हणतो, मानतो; किंबहुना सर्वच तसे मानतात.

प्रसंगी मनाऐवजी आपण कागद वापरतो. प्रसंगी लॅपटॉप किंवा मोबाईल वापरतो. काही अंक ताम्रपटांवर लिहिलेले आहेत, तर काही दगडांवर कोरलेले आहेत.

हेतुपुरस्सर, कोणत्या ना कोणत्या साधनाचा—आणि आपले मनदेखील असेच एक साधन आहे मंडळी—उपयोग करून मानवाने या घटना नोंदवून ठेवल्या आहेत.

हे असे करण्याची प्रेरणा मानवाला नेमकी कशामुळे मिळाली असेल?

पण काय, फक्त मानवाने लिहून ठेवलेलेच अंक आपण पाहू शकतो का?

तसे नाही.

निसर्गानेदेखील विविध पद्धतींनी अनेक अंक लिहून ठेवले आहेत.

उदाहरणार्थ—जीवाश्म.

या जीवाश्मांचा अभ्यास करून आपण नेमके काय करीत असतो?

आपण काळाच्या पडद्यावरील एक अंक वाचण्याचा... पाहण्याचा... ऐकण्याचा... आणि समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो.

म्हणजेच, अशी साधने जी आपल्या शरीराचा प्रत्यक्ष भाग नाहीत—आणि मनदेखील त्यांपैकीच एक आहे—त्यांच्या साहाय्याने आपण काळाच्या पडद्यावरील एखादा अंक पाहू शकतो; तोच भूतकाळ.

या सर्व साधनांच्या मदतीने आपण भूतकाळाचा आभास निर्माण करतो. जणू एखादा व्हिडिओ रिवाइंड करून पुन्हा प्ले करावा, तसे आपण त्या घटना आपल्या मनःपटलावर पुन्हा अनुभवू शकतो.

भूतकाळातील अनुभव आणि ज्ञान जतन करण्यासाठीच ही सर्व साधने आहेत.

पण जसा एखादा व्हिडिओ पाहताना आपण त्या व्हिडिओचा भाग होऊ शकत नाही, तसाच... भूतकाळाचे पुनरावलोकन करताना आपण कधीही भूतकाळाचा भाग होऊ शकत नाही.

ही झाली त्या दोन साधनांपैकी पहिली साधने.

आता मन या साधनाकडे पाहू.

मन हे एकमेव साधन असे आहे, जे मानवाबरोबरच इतर प्राण्यांकडेही आहे.

प्राण्यांनादेखील मन आहे किंवा ते मनाचा उपयोग करू शकतात, हे आज सर्वमान्य आहे.

काही वर्षांपूर्वी आफ्रिकेतील एका प्राणीप्रेमी डॉक्टरच्या निधनानंतर हत्तींचा एक कळप तब्बल बत्तीस किलोमीटर चालत त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती.

ही घटना प्रत्यक्षात घडली की नाही, हे मला निश्चित माहीत नाही.

पण जर ती खरी असेल...

त्या हत्तींना एका माणसाच्या मृत्यूची जाणीव कशी झाली असेल? कुणी सांगितले असेल? कोणत्या भाषेत? कोणत्या संकेतांनी?

आणि घरापर्यंतचा रस्ता त्यांच्या लक्षात कसा राहिला असेल?

दुसरे उदाहरण पाहू.

एखादा पाळीव कुत्रा, त्याचे डोळे बांधून, बंद पेटीत घालून, घरापासून खूप दूर नेऊन सोडला तरी काही दिवसांनी तो पुन्हा आपल्या घरी परत येतो.

आणखी एक उदाहरण.

काल मी नॅशनल जिओग्राफिकवर 'Cheetas Growing Too Fast' हा कार्यक्रम पाहिला.

एका अभ्यासकाने दीड वर्षे एका मादी चित्त्याबरोबर आणि तिच्या पाच पिलांबरोबर राहून त्यांचा प्रौढत्वापर्यंतचा प्रवास चित्रित केला होता.

अभ्यास संपल्यानंतर तो निघून गेला.

काही काळानंतर तो पुन्हा त्या जंगलात गेला.

त्याला दूरवर एक मादी चित्ता दिसली.

तो तिच्या अगदी जवळ गेला.

काही मिनिटांनी ती चित्ता त्याच्या जवळ आली...

आणि त्याच्या चेहऱ्याला अलगद चाटू लागली.

म्हणजेच... प्राण्यांनादेखील माणसे ओळखता येतात. ठिकाणे लक्षात राहतात. भूतकाळातील अनुभव पुन्हा जागे होतात.

अशा अनेक घटना आपण पाहिल्या किंवा ऐकल्या असतील.

यावरून असे म्हणता येईल की, काळाच्या पडद्यावरील होऊन गेलेल्या अंकांना पुन्हा अनुभवण्याची क्षमता केवळ मानवाकडेच नाही; ती इतर प्राण्यांकडेही आहे.

फरक एवढाच की, मानव मनावरच अवलंबून राहत नाही.

तो घटना विविध साधनांमध्ये नोंदवून ठेवतो.

इतर प्राणी मात्र, निदान आज तरी, प्रामुख्याने मन या एकाच साधनाचा उपयोग करतात.

मला कधी कधी असे वाटते... मन हे वैयक्तिक नसून एक वैश्विक साधन असावे.

जणू एखादा सामूहिक संसाधनसाठाच.

कदाचित मानवाला या वैश्विक साधनाचा इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक प्रवेश मिळाला असावा.

हा विचार योग्य आहे की नाही, हे मला माहीत नाही.

पण तो विचार करण्यासारखा नक्कीच आहे.

त्या दोन साधनांपैकी पहिले साधन आपण पाहिले... मग दुसरे साधन कोणते?

— हेमंत ववले

निसर्गशाळा, पुणे

कालचक्र

भाग ४

कालचक्र नक्की फिरते आहे का?

कालचक्र

"कालचक्र फिरते आहे" असे आपण अगदी सहज बोलून जातो. 'काल' आणि त्यासोबत 'चक्र' ही शब्दजोडी ऐकताच घड्याळासारख्या वर्तुळाकार वस्तूची आठवण येते. पण हा शब्दप्रयोग नेमका कसा जन्माला आला असेल?

आज आपण वापरत असलेली भिंतीवरील किंवा मनगटीवरील घड्याळे ही तुलनेने अलीकडील काळातील निर्मिती आहेत.

त्यापूर्वीदेखील काळ मोजण्यासाठी अनेक साधने होती. विशेष म्हणजे त्यांपैकी बहुतांश साधने वर्तुळाकार नव्हती. दोलक, वाळूघड्याळ, घटिका यांसारख्या साधनांचा उपयोग केला जात असे. भारतात काही ठिकाणी सूर्याच्या स्थानावरून वेळ निश्चित केली जात असे.

जयपूर येथील जंतरमंतरमध्ये आजही असे सूर्याधारित वेळमापनाचे साधन पाहायला मिळते. इंग्रजीमध्ये त्याला Sundial म्हणतात. ज्या वास्तूमध्ये अशी साधने उभारली जात, त्या परिसराला Observatory म्हणजेच आकाशनिरीक्षणासाठीची प्रयोगशाळा असे म्हणतात.

मग प्रश्न असा निर्माण होतो की, वर्तुळाकार घड्याळे अस्तित्वात नसतानाही आपल्या पूर्वजांनी "कालचक्र" हाच शब्दप्रयोग का केला असेल?

पाश्चात्त्य विचारसरणीकडे पाहिले तर वेळ ही सरळ रेषेत पुढे जाणारी गोष्ट मानली जाते. ती सतत पुढे सरकत राहते; पुन्हा त्याच ठिकाणी येत नाही, अशी तिची संकल्पना आहे.

वेळ सरळ रेषेत पुढे जाते... की ती चक्राकार फिरते?

मग भारतीयांनीच काळाला चक्राकार का पाहिले असेल?

अध्यात्मातील जन्म–जीवन–मृत्यू, किंवा जन्म–मरणाचा अखंड फेरा, या विचारांचा परिणाम काळाची संकल्पना घडविण्यावर झाला असेल का?

अनेक भारतीय तत्त्वज्ञानांमध्ये शरीर नश्वर आहे, ते पंचमहाभूतांमध्ये विलीन होते आणि पुन्हा त्याच पंचमहाभूतांपासून नवीन शरीराची निर्मिती होते, असे सांगितले जाते. या अखंड प्रक्रियेलाच जन्म-मृत्यूचे चक्र म्हटले जाते.

आता या विचारातील अध्यात्म बाजूला ठेवले, तरीही हाच आशय वेगळ्या भाषेत आपल्याला आचार्य कणाद यांच्या वैशेषिक तत्त्वज्ञानात दिसून येतो.

इसवी सनाच्या सुमारे सहाशे वर्षे पूर्वी त्यांनी पदार्थाच्या सूक्ष्म कणांविषयी विचार मांडले. त्यांचे मूळ नाव कश्यप असले तरी कणांचा अभ्यास करणारे आचार्य म्हणून ते "आचार्य कणाद" या नावाने ओळखले जाऊ लागले.

त्यांच्या मते या विश्वातील प्रत्येक वस्तू—ती सजीव असो किंवा निर्जीव, सचेतन असो किंवा अचेतन—अनेक अणू किंवा परमाणूंच्या संयोगाने बनलेली असते.

वस्तूचा नाश झाला तरी तिचे मूलभूत परमाणू नष्ट होत नाहीत. ते पुन्हा नवीन रचनेत एकत्र येतात आणि त्यातून नव्या वस्तू अस्तित्वात येतात.

वस्तू नष्ट होते... पण पदार्थ नाही.

आचार्य कणादांनी हा सिद्धांत वैशेषिक दर्शन या ग्रंथात नोंदवून ठेवला आहे. हा ग्रंथ बाह्य विश्वाचा अभ्यास करणारा आहे. आज आपण ज्याला भौतिकशास्त्र किंवा Physics म्हणतो, त्या अभ्यासाचा तो प्राचीन पाया मानला जाऊ शकतो.

अठराव्या शतकात रशियन शास्त्रज्ञ मिखाईल लोमोनोसोव यांनी हाच विचार "Law of Conservation of Mass" या नावाने मांडला.

दोन वेगवेगळ्या काळातील दोन विचारवंत... पण आशय एकच.

बाह्य विश्वात जन्म, सृजन, विकास, क्षय आणि नाश या प्रक्रिया सतत घडत असतात. त्या थांबत नाहीत.

आपल्या पूर्वजांना या आवर्तनाची जाणीव होती, असे अनेक संदर्भांवरून वाटते.

त्याचप्रमाणे गोलाकार गतीची कल्पनाही त्यांना ज्ञात होती.

पृथ्वीचा अभ्यास आपण आजही "भूगोल" या नावानेच करतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते, या आकाशीय घटनांचे निरीक्षण प्राचीन भारतात होत होते.

कदाचित म्हणूनच काळाकडेही चक्राकार दृष्टीने पाहिले गेले असावे.

पुढे याच विचारातून मन्वंतरे, महायुगे आणि युगचक्र यांची संकल्पना विकसित झाली असावी.

चार युगे... पुन्हा चार युगे... पुन्हा चार युगे... असे अखंड आवर्तन.

या प्रचंड कालमानांची निर्मिती नेमक्या कोणत्या निरीक्षणांवर आधारित होती, याविषयी मात्र आज निश्चित माहिती उपलब्ध नाही.

मात्र भारतीयांनी काळाची अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत विशाल अशी दोन्ही टोकांची एकके मांडली आहेत.

सूर्यसिद्धांत या ग्रंथामध्ये काळमापनाची विस्तृत मांडणी आढळते.

६० त्रुटी = १ रेणु
६० रेणु = १ लव
६० लव = १ लेषक
६० लेषक = १ प्राण
६० प्राण = १ विनाडी
६० विनाडी = १ नाडी
६० नाडी = १ अहोरात्र
७ अहोरात्र = १ सप्ताह
२ सप्ताह = १ महिना
२ महिने = १ ऋतु
६ महिने = १ अयन
१२ महिने = १ वर्ष
४,३२,००० वर्षे = कलियुग
८,६४,००० वर्षे = द्वापरयुग
१२,९६,००० वर्षे = त्रेतायुग
१७,२८,००० वर्षे = सत्ययुग
४३,२०,००० वर्षे = चतुर्युग
७१ चतुर्युगे = मन्वंतर
१४ मन्वंतरे = ब्रह्मदेवाचा एक दिवस

याचा अर्थ ब्रह्मदेवाचे एक अहोरात्र म्हणजे सुमारे ८,५८,८१,६०,००० मानवी वर्षे.

एका रात्रीनंतर पुन्हा दिवस उगवतो... पुन्हा सृजन... पुन्हा प्रवास... पुन्हा आवर्तन.

कदाचित म्हणूनच भारतीयांनी काळाला केवळ पुढे जाणारी रेषा मानली नाही.

कालचक्र फिरते आहे... वर्तुळाकार आहे... आवर्तनशील आहे... पुन्हा पुन्हा स्वतःकडे परत येत आहे.

— हेमंत ववले

निसर्गशाळा, पुणे

कालचक्र

भाग ५

जीवनाची योजना

हे ब्रह्मांड किती विशाल आहे, याची कल्पनाही मानवी मनाला पूर्णपणे करता येत नाही. सूक्ष्म बिंदूसमान अवस्थेतून सुरू झालेला विश्वाचा विस्तार आज अब्जावधी दीर्घिकांपर्यंत पोहोचला आहे. आधुनिक विज्ञान या प्रवासाची सुरुवात बिग बँगमध्ये शोधते; पण त्याचा शेवट अजूनही अज्ञात आहे. आपण अनेकदा म्हणतो की ब्रह्मांड अनादी आणि अनंत आहे. पण तंतोतंत पाहिले, तर अनादी आणि अनंत ब्रह्मांड नसून काळ आहे. ब्रह्मांडाला उत्पत्ती आहे, त्याची उत्क्रांती आहे, आणि कदाचित एक अंतही असेल. काळ मात्र या सर्वांचा साक्षीदार आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय—या सर्व घटना काळाच्या अखंड प्रवाहात घडत राहतात.

माझ्या आकलनानुसार, अनादी आणि अनंत ही संकल्पना काळाला अधिक लागू पडते.

हे विचार मनात घोळत असतानाच मी ते लिहून ठेवण्यासाठी लॅपटॉप उघडला... आणि अचानक वीज गेली. खिडकीबाहेर पावसाचे ढग दाटून आले होते. वारा वाढत होता. दोन-तीन तास उलटले तरी वीज आली नाही. शेवटी मी स्थानिक वायरमनला फोन केला. "आणखी तीन-चार तास लागतील," तो म्हणाला. "पावसाळ्यापूर्वीची झाडांची छाटणी सुरू आहे." त्या एका वाक्याने माझे विचार अचानक विश्वातून झाडांकडे वळले.

जीवनाची योजना

निसर्गशाळा परिसरात पावसाळ्यात अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. शहरांतही असे प्रसंग नवीन नाहीत. बहुतेक वेळा वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडतात आणि पुरवठा खंडित होतो.

निसर्गशाळा परिसरात तर कधी कधी वीज गेली की दोन-दोन, चार-चार दिवस परत येत नाही.

यावर उपाय म्हणून वीज वितरण कंपन्या पावसाळा सुरू होण्यापूर्वी वीजवाहिन्यांच्या आसपासच्या झाडांच्या फांद्या छाटतात. अनेकदा तर झाडे अक्षरशः भुंडी करून टाकली जातात. त्यामुळे काही काळासाठी तारा सुरक्षित राहतात आणि वीजपुरवठा सुरळीत राहण्याची शक्यता वाढते.

पण या उपायामध्ये एक गंमत आहे.

पावसाळा संपेपर्यंत त्या तोडलेल्या फांद्यांच्या जागी पुन्हा अनेक नवीन फांद्या फुटलेल्या असतात. काही महिन्यांतच त्या पुन्हा तितक्याच उंच वाढतात आणि पुन्हा वीजवाहिन्यांपर्यंत पोहोचतात.

मग पुढच्या वर्षी पुन्हा त्याच झाडांची छाटणी करावी लागते.

हे दृश्य मी अनेक वर्षे पाहत आलो आहे.

आणि प्रत्येक वेळी माझ्या मनात दोन प्रश्न उभे राहतात.

झाडाला कसे समजते की नवीन फांद्या फुटल्या पाहिजेत?

आणि...

विशिष्ट काळात त्या पुन्हा जवळजवळ तितक्याच उंच वाढतात, तर झाडाला काळाचे भान असते का?

वरवर पाहता हे साधे प्रश्न वाटतात.

पण त्यांच्यामागे आणखी खोल प्रश्न दडलेले आहेत.

नवीन फांदी नेमकी कुठे फुटायची हे झाड कसे ठरवते?

मुळांपासून पाणी आणि पोषकद्रव्ये नेमकी त्या नव्या फांदीपर्यंतच कशी पोहोचतात?

झाडाच्या शरीरातील असंख्य पेशींना एकाच वेळी कसे समजते की आता वाढीची दिशा बदलली आहे?

या सर्व प्रक्रियेमागे एखादी योजना आहे का?

की हा केवळ रासायनिक घटनांचा परिणाम आहे?

आधुनिक वनस्पतिशास्त्र सांगते की झाडे बाह्य वातावरणाला प्रतिसाद देतात. प्रकाश, गुरुत्वाकर्षण, पाणी, जखम, ऋतू, संप्रेरके आणि असंख्य जैवरासायनिक संकेत यांच्या आधारे त्यांची वाढ नियंत्रित होत असते.

याचा अर्थ झाडे विचार करतात, असा होत नाही.

पण ती अत्यंत गुंतागुंतीच्या जैविक प्रक्रियांद्वारे स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवतात.

पण माझ्या मनात प्रश्न तिथे थांबत नाही.

मी त्या झाडाच्या जीवनप्रवासात थोडे मागे जातो.

माझ्यासमोर मोठे झाड नाही.

एक छोटे रोपटे दिसते.

त्याही आधी...

एक कोवळा अंकुर.

आणि त्याच्या विरुद्ध दिशेने अलगद खाली जाणारे नाजूक मूळ.

आता अजून मागे जाऊ.

अंकुरही नाहीसा होतो.

माझ्यासमोर उरते...

एक सुकलेले बी.

त्या बीजामध्ये ना मुळे आहेत.

ना खोड आहे.

ना फांद्या आहेत.

ना पाने.

ना फुले.

ना फळे.

तरीही...

"या बीमधून
एक दिवस
मोठे झाड उभे राहील."

हे वाक्य आपण इतक्या सहजपणे बोलतो की त्यामागील आश्चर्य आपल्या लक्षातच येत नाही.

कारण त्या बीजामध्ये झाड दिसत नाही.

तरीही... झाड आहे.

प्रत्यक्ष स्वरूपात नाही.

पण शक्यतेच्या स्वरूपात.

मग प्रश्न असा निर्माण होतो...

नेमके काय जपून ठेवले आहे त्या बीजाने?

लाकूड?
पाने?
फुले?

की...

झाड घडविण्याची योजना?

— हेमंत ववले

निसर्गशाळा, पुणे

कालचक्र

भाग ६

प्रतीक्षा

जाणिव आणि नेणिवेची उत्कंठावर्धक अवस्था

प्रतीक्षा


यावर्षी पाऊस उशीरा आला. म्हणजे नेहमीपेक्षा जवळजवळ वीस दिवस उशिरा सुरू झाला. जसे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत होते, तसेच प्राणी, पक्षी, शहरे, गावे, प्रशासन आणि अगदी माझ्यासारखे निसर्गप्रेमीही त्याची वाट पाहत होते.

दररोज मोबाईल किंवा लॅपटॉपवर हवामानाचा अंदाज पाहण्याची सवयच लागली होती. प्रत्येक वेबसाईट, प्रत्येक वृत्तवाहिनी एकच सांगत होती—यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल. एल निनोचा प्रभाव जाणवेल. हलक्या दुष्काळाची शक्यताही व्यक्त केली जात होती.

ही माहिती फक्त माझ्यासाठी नव्हती. ती सर्वांसाठी होती. आणि... पावसाची वाट पाहणारे केवळ आपणच नव्हतो.

१५ जून उजाडला तरी पावसाचा पत्ता नव्हता. सहजच मी पंचांग उघडले. आधुनिक हवामानशास्त्राच्या अंदाजांच्या अगदी उलट पंचांग म्हणत होते— पाऊस उशीरा येईल; पण समाधानकारक होईल. अतिवृष्टीही होईल.

आज पाच ऑगस्ट आहे. कालपासून वृत्तवाहिन्यांवर एकामागून एक बातम्या झळकू लागल्या— महाराष्ट्रातील बहुतांश धरणे जवळजवळ शंभर टक्के भरली आहेत. पुण्यातील पाणी कपातही रद्द करण्यात आली.

त्या क्षणी मला १५ जूनला लिहिलेली माझी सोशल मीडिया पोस्ट आठवली.

प्रतीक्षा म्हणजे काय?

पावसाची वाट पाहणारे अजुन कोण, हा प्रश्न आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. आधी प्रतीक्षेविषयी बोलू.

बसस्थानकावर बसची वाट पाहणारे प्रवासी... संध्याकाळी आई-बाबा घरी येण्याची वाट पाहणारी मुले... प्रिय व्यक्तीची आतुरतेने वाट पाहणारा एखादा तरुण... प्रत्येक प्रतीक्षेमध्ये उत्कंठा असते. आशा असते. अधीरपणाही असतो.

मला माझी दहावी आठवते. १९९५ साल. माझी मोठी बहीण बारावीनंतर पुण्यात शिक्षणासाठी होस्टेलवर राहायला गेली होती. महिनाभरानंतर ती दोन दिवसांसाठी घरी येणार होती.

बाबुजी तिला आणण्यासाठी पुण्याला गेले होते. रविवार होता. सकाळी दहापासून माझे लक्ष केवळ रस्त्याकडे होते. टीव्हीवरील मालिकेच्या जाहिराती सुरू झाल्या की मी बाहेर येऊन रस्ता पाहायचो. एक तास... दोन तास... दुपारचे दोन वाजले... तरीही ते आले नव्हते.

त्या दिवशी मी प्रथमच काळ संथ झाल्याचा अनुभव घेतला.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात. काही आपण विसरून जातो. काही कायमचे लक्षात राहतात. विशेषतः... जेव्हा प्रतीक्षा करणारे आपण स्वतः असतो.

बीजाची प्रतीक्षा

आता पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊ.

पावसाची वाट पाहणारे अजून कोण होते? अशी कोणती गोष्ट आहे, जी आपल्याला निर्जीव वाटते... पण कदाचित तीदेखील प्रतीक्षा करीत असते?

एव्हाना तुमच्या लक्षात आले असेल. आपण बोलत आहोत... बीजाविषयी.

आपण जे अन्न खातो— गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, डाळी... हे सर्व बीजच आहे.

मग प्रश्न असा निर्माण होतो...

बीजाला जाणिव असते का?

की... ते केवळ नेणिवेने जगत असते?

साधारणपणे आपण सजीव आणि निर्जीव यांच्यामधील भेद जाणिवेच्या आधारावर करतो.

समर्थ रामदास स्वामी दासबोधातील सृष्टीक्रमनिरूपण या समासामध्ये म्हणतात—

औषधीपासून नाना रस ।
नाना बीज अन्नरस ।
चौर्यांशी लक्ष योनींचा वास ।
भूमंडळीं ॥

समर्थ येथे बीज, अन्न आणि सर्व जीवसृष्टी यांना एका अखंड सृष्टीक्रमाचे टप्पे म्हणून पाहतात. जीवन एकाच प्रवाहात वेगवेगळ्या रूपांनी प्रकट होत राहते, असे त्यांना सुचवायचे असावे.

सुप्त जागरूकता

आधुनिक जीवशास्त्र सांगते की अनेक बीजे वर्षानुवर्षे सुप्त अवस्थेत राहू शकतात. योग्य आर्द्रता, तापमान, प्राणवायू आणि इतर पर्यावरणीय संकेत मिळाल्यावरच अंकुरणाची प्रक्रिया सुरू होते.

म्हणजे... बीज झोपलेले असते. पण मृत नसते.

बीजमाता राहीबाईच्या कणगीतले बीज असो... किंवा एखाद्या निर्जन जंगलात पडलेले बीज... किंवा जुन्या मंदिराच्या दगडी भिंतीवर विसावलेले वडाचे बीज...

ती सर्व... शांत आहेत. अचल आहेत. पण... प्रतीक्षा करीत आहेत.

कशाची प्रतीक्षा?

१९९५ मध्ये प्रतीक्षा करणारा मी... आणि... हे शांत पडलेले बीज... यांच्यामध्ये काही भेद आहे का?

मी माझ्या आवडत्या व्यक्तीच्या येण्याची वाट पाहत होतो. तिच्या येण्याने माझा सभोवताल आनंदाने भरून जाणार होता.

बीजही प्रतीक्षा करते.

वरवर पाहता... ते पावसाची वाट पाहते.

पण...

ते खरोखर पावसाची वाट पाहते का?

की...

पाऊस हा केवळ एक संकेत असतो?

प्रत्यक्षात... बीज प्रतीक्षा करीत असते... त्या एका क्षणाची...

ज्या क्षणी त्याच्या भोवतालची संपूर्ण परिस्थिती त्याला अलगद सांगते—

"आता..."

आणि...

त्या एका क्षणातून शांततेच्या गर्भातून पहिले मूळ जन्म घेते.

— हेमंत ववले

निसर्गशाळा, पुणे

कालचक्र

उपसंहार

या पुस्तकात मी उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला नाही.

उलट, प्रत्येक प्रश्नामागे दडलेला आणखी एक प्रश्न शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

काळ म्हणजे नेमके काय?
तो वाहतो की आपण वाहत असतो?
अनुभव म्हणजे काळ की काळ म्हणजे अनुभव?
स्मरणाशिवाय भूतकाळ अस्तित्वात असतो का?
आणि आपण ज्याला कालचक्र म्हणतो...
ते खरोखर फिरते आहे का?

कदाचित या प्रश्नांची एकच उत्तरे नसतील.

प्रत्येक पिढी त्यांना पुन्हा विचारेल. प्रत्येक संशोधक त्यांना नव्याने पाहील. प्रत्येक जिज्ञासू त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहील.

प्रश्न संपले...

असे कधीच होत नाही.

ते फक्त अधिक परिपक्व होत जातात.

जर या पुस्तकाने तुमच्या मनात एक जरी नवीन प्रश्न निर्माण केला असेल, तर या लेखनाचा उद्देश सफल झाला, असे मी मानेन.

— हेमंत ववले

निसर्गशाळा, पुणे

॥ इति कालचक्रम् ॥

प्रथम आवृत्ती