प्रस्तावना

पहिला पाऊस पडतो... आणि सह्याद्री पुन्हा जिवंत होतो.

डोंगर हिरवेगार होतात, ओढे खळाळू लागतात, जंगल नव्या पालवीने बहरून येते आणि जमिनीखालून असंख्य रानवनस्पती डोकावू लागतात. याच दिवसांत सह्याद्री आपल्याला एक अमूल्य भेट देतो—पावसाळी रानभाज्या.

कधीकाळी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, विशेषतः सह्याद्रीच्या पायथ्याशी राहणाऱ्या कुटुंबांच्या स्वयंपाकघरात या रानभाज्यांना मानाचे स्थान होते. कोणती भाजी कधी येते, कुठे मिळते, कशी ओळखायची, कशी शिजवायची आणि कोणत्या ऋतूत खायची याचे ज्ञान पिढ्यानपिढ्या जपले गेले. दुर्दैवाने बदलत्या जीवनशैलीमुळे हे पारंपरिक ज्ञान आज हळूहळू लुप्त होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गशाळेच्या माध्यमातून सह्याद्रीत भटकताना आम्हाला स्थानिक ग्रामस्थ, आदिवासी बांधव, ज्येष्ठ महिला, शेतकरी आणि निसर्गप्रेमी यांच्या सहवासातून अनेक रानभाज्यांची ओळख झाली. काहींची नावे पहिल्यांदाच ऐकली, काहींची चव प्रथमच अनुभवली, तर काहींच्या पाककृती आणि उपयोग प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळाली.

या प्रवासात जाणवले की रानभाज्या हा केवळ अन्नाचा विषय नाही; तो आपल्या जैवविविधतेचा, लोकसंस्कृतीचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा जिवंत वारसा आहे.

हा लेख त्या अनेक वर्षांच्या अनुभवांचा, निरीक्षणांचा आणि अभ्यासाचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. यात सह्याद्री परिसरात आढळणाऱ्या विविध पावसाळी रानभाज्यांची ओळख, त्यांचे वैशिष्ट्य, उपलब्धतेचा काळ, पारंपरिक उपयोग, पाककृती आणि आवश्यक त्या ठिकाणी वैज्ञानिक माहिती संकलित केली आहे.

महत्त्वाची सूचना

या लेखातील माहिती शैक्षणिक आणि जागृतीच्या उद्देशाने दिली आहे. केवळ फोटो किंवा इंटरनेटवरील माहितीच्या आधारे कोणतीही रानभाजी गोळा करून खाऊ नये. अनुभवी स्थानिक व्यक्ती किंवा वनस्पती तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखालीच रानभाज्यांची खात्री करून त्यांचा वापर करावा.

रानभाज्या का खाल्या पाहिजेत?

रानात, माळरानावर, शेताच्या बांधावर किंवा जंगलाच्या कडेला निसर्गतः उगवणाऱ्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. शेती, सिंचन किंवा निगा न करता निसर्ग स्वतःच ज्या वनस्पती पिकवतो त्या रानभाज्या पोषणदृष्ट्या अतिशय समृद्ध असतात.

या भाज्यांमध्ये खनिजे, आवश्यक मूलद्रव्ये आणि औषधी गुणधर्म प्रचुर प्रमाणात आढळतात. त्यांच्या नैसर्गिक वाढीमुळे त्या रासायनिक खतं व कीटकनाशकांपासून मुक्त असतात आणि त्यामुळे शरीरासाठी अधिक हितकारक ठरतात.

स्थानिक ज्ञान आणि परंपरा

जंगलाच्या आसपास राहणाऱ्या लोकांसाठी या भाज्या केवळ आहाराचा भाग नाहीत, तर त्यांच्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक आहेत. अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या परंपरेत ऋतुनुसार या भाज्या गोळा करून खाल्ल्या जातात. हे पारंपरिक ज्ञान अजूनही अनेक कुटुंबांमध्ये टिकून आहे.

औषधी उपयोग

रानभाज्यांपैकी अनेक वनस्पती औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत. कोळ्याचा मका नावाचा एक कंद पावसाळ्यात फुलतो. हा कंद स्थानिकांकडून विंचवाचे विष उतरवण्यासाठी वापरला जातो. अशाच अनेक वनस्पती जखमा, ताप आणि पचनाशी संबंधित पारंपरिक उपचारांमध्ये वापरल्या जातात.

चव आणि विविधता

वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या चवींच्या रानभाज्या उगवतात. योग्य ओळख करून आहारात समावेश केल्यास त्या शरीराला पोषण देतात आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अनोखा अनुभव देतात.

🎥 रानभाज्या ओळख • Nisargshala

या लेखातील रानभाज्या

खालील रानभाज्यांबद्दल सविस्तर माहिती, ओळख, उपयोग, पाककृती आणि निसर्गशाळेतील अनुभव वाचण्यासाठी संबंधित नावावर क्लिक करा.

🌿 काटे कळक (बांबूच्या कोवळ्या कोंबांची भाजी)

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा


झटपट माहिती

शास्त्रीय नाव Bambusa arundinacea
कुळ Poaceae (पोएसी)
स्थानिक नावे कासेट, काष्ठी, कळक
संस्कृत वंश, शतपर्वा, तृणध्वज
हिंदी बांस
इंग्रजी Spiny Bamboo
हंगाम पावसाळ्याच्या सुरुवातीला
खाण्यायोग्य भाग अतिशय कोवळे कोंब

निसर्गशाळेचा अनुभव

बांबू ही अतिशय महत्त्वाची गवतवर्गीय वनस्पती आहे. जगभरात तिच्या हजारो प्रजाती आढळतात. भारतात तसेच महाराष्ट्रातही अनेक प्रकारचे बांबू नैसर्गिकरित्या वाढतात. मात्र प्रत्येक बांबूच्या कोवळ्या कोंबांची भाजी करता येते असे नाही.

कोणत्या प्रजातीचे कोंब खाण्यास सुरक्षित आहेत हे माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. हे ज्ञान प्रयोगशाळेतील संशोधनातून किंवा अनेक पिढ्यांनी जपलेल्या पारंपरिक अनुभवातूनच मिळते. बहुतांश बांबूंच्या कोंबांमध्ये नैसर्गिकरित्या सायनोजेनिक संयुगे (Cyanogenic Compounds) आढळू शकतात. त्यामुळे योग्य ओळख ही सर्वात महत्त्वाची आहे.

आज आम्ही सांगत आहोत महाराष्ट्रात पूर्वी सर्वत्र आढळणाऱ्या पण आता दुर्मिळ होत चाललेल्या काटे कळक या बांबूविषयी. ही जात ओळखणे अगदी सोपे आहे. ज्या बांबूला काटे असतात तो काटे कळक.

या प्रजातीच्या कोवळ्या कोंबांची भाजी निःसंशय बनविता येते. ती सुरक्षित असून पौष्टिक आणि आरोग्यदायी मानली जाते.


कुठे आढळतो?

भारत, श्रीलंका आणि म्यानमार येथे ही प्रजाती नैसर्गिकरित्या आढळते. महाराष्ट्रात कोकण, सह्याद्री, खानदेश आणि विदर्भातील काही भागात ही वनस्पती आढळते.


निसर्गशाळेतील निरीक्षण

काटे कळकाचा उपयोग केवळ भाजी किंवा बांधकामापुरता मर्यादित नाही. निसर्गशाळेत आम्ही या प्रजातीचे जैविक कुंपण तयार केले आहे. स्थानिक जैवविविधता जपण्यासाठी तसेच शाश्वत शेतीसाठी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे.


पौष्टिक मूल्य

  • तंतुमय (High Fibre)
  • खनिजांनी समृद्ध
  • कमी उष्मांक
  • नैसर्गिक क्षारयुक्त

पारंपरिक उपयोग

ग्रामीण भागात बांबूच्या कोवळ्या कोंबांची भाजी विशेषतः बाळंतिणीच्या आहारात, पचन सुधारण्यासाठी तसेच लोणचे आणि कढी बनविण्यासाठी वापरली जाते.

बांबूच्या विविध भागांचा उपयोग आयुर्वेद आणि लोकपरंपरेतही केला जातो. मात्र औषधी वापरासाठी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.


भाजी कशी बनवावी?

आम्ही नुकतीच काटे कळकाच्या कोवळ्या कोंबांची भाजी तयार केली. कोंब कसे निवडायचे, स्वच्छ कसे करायचे आणि पारंपरिक पद्धतीने भाजी कशी बनवायची हे खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता.


💡 निसर्गशाळेची सूचना

केवळ फोटो पाहून किंवा इंटरनेटवरील माहितीच्या आधारे कोणत्याही बांबूच्या कोंबांची भाजी करू नका. योग्य प्रजातीची खात्री करूनच कोंब गोळा करा.

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

🌿 मुरटाची भाजी

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा


झटपट माहिती

स्थानिक नाव मुरटा / मुरटाची भाजी
हंगाम जुलै
अधिवास सह्याद्रीतील घनदाट वर्षारण्य
खाण्यायोग्य भाग कोवळे शेंडे
विशेष निसर्गशाळेच्या सर्वात आवडत्या रानभाज्यांपैकी एक

निसर्गशाळेचा अनुभव

जुलै महिन्यात पावसाचा जोर चांगलाच वाढलेला असतो. सह्याद्रीतील घनदाट वर्षारण्य हिरव्यागार वनस्पतींनी बहरलेले असते. अशाच काळात जंगलात मिळणारी मुरटाची भाजी ही माझ्या सर्वात आवडत्या रानभाज्यांपैकी एक आहे.

वरकरणी ही वनस्पती नेच्यासारखी दिसते. मात्र तिच्या कोवळ्या शेंड्यांची भाजी केली जाते. तिची चव, पोत आणि ताजेपणा इतर अनेक रानभाज्यांपेक्षा वेगळाच अनुभव देतो.

मी आजवर खाल्लेल्या अनेक रानभाज्यांमध्ये मुरटाची भाजी मला सर्वात जास्त आवडलेली रानभाजी आहे.

दुर्दैवाने सध्या माझ्याकडे या वनस्पतीची छायाचित्रे उपलब्ध नाहीत. पुन्हा ही वनस्पती भेटली आणि चांगली छायाचित्रे मिळाली की तिची सविस्तर ओळख, वैशिष्ट्ये, पाककृती आणि अनुभव यावर स्वतंत्र लेख नक्की प्रकाशित करेन.


🌿 निसर्गशाळेची नोंद

ही भाजी प्रामुख्याने घनदाट जंगलात आणि योग्य ऋतूमध्येच आढळते. त्यामुळे अनुभवी स्थानिक व्यक्तीच्या मार्गदर्शनाशिवाय ती गोळा करू नये.


📷 छायाचित्रे

या रानभाजीची उत्कृष्ट छायाचित्रे संकलित करण्याचे काम सुरू आहे. पुढील अद्ययावत आवृत्तीत ती येथे प्रकाशित केली जातील.

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

पाथरी / पथरीची भाजी

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा


झटपट माहिती

स्थानिक नावे पाथरी, पथरी, पात्र
हंगाम पावसाळा
अधिवास मोकळी जागा, डोंगर उतार, निचऱ्याच्या जागा
खाण्यायोग्य भाग कोवळी पाने
आढळणारा प्रदेश मावळ, विदर्भ, मराठवाडा तसेच महाराष्ट्रातील इतर भाग

पाथरी रानभाजी

निसर्गशाळेचा अनुभव

पाथरी ही पावसाळ्यात सहज आढळणारी रानभाजी आहे. केवळ मावळ भागातच नव्हे, तर विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ती विपुल प्रमाणात उगवते. स्थानिक भागानुसार तिला पाथरी, पथरी किंवा पात्र अशा विविध नावांनी ओळखले जाते.

पावसाळ्यात मोकळ्या जागेत, डोंगर उतारावर आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या ठिकाणी ही वनस्पती सहज दिसून येते. कोवळी पाने भाजीसाठी वापरली जातात.


पारंपरिक उपयोग

स्थानिक परंपरेनुसार ही भाजी मूत्रमार्ग व मूत्रपिंडाशी संबंधित तक्रारींमध्ये उपयोगी मानली जाते. तसेच शरीराला जोम व ताकद देणारी भाजी म्हणूनही अनेक भागांत तिचा उल्लेख केला जातो.

टीप: हे उपयोग लोकपरंपरेवर आधारित आहेत. कोणत्याही आरोग्यविषयक उपचारासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.


खाण्याची पद्धत

  • सुदृढ व्यक्तींनी कोवळी पाने कच्चीही खाऊ शकतात.
  • अशक्त किंवा आजारी व्यक्तींनी ३–४ पाने वाटून अथवा मिक्सरमध्ये रस करून सकाळी घेण्याची स्थानिक पद्धत आहे.
  • मुगाच्या डाळीसोबत केलेली कोरडी भाजी अतिशय चविष्ट लागते.

⚠️ महत्त्वाची सूचना

पाथरीसारखी दिसणाऱ्या काही वनस्पती कडू आणि विषारीही असू शकतात. त्यामुळे केवळ फोटो किंवा इंटरनेटवरील माहितीच्या आधारावर ही भाजी गोळा करू नका. नेहमी अनुभवी ग्रामीण व्यक्ती किंवा वनस्पती जाणकार यांच्या मार्गदर्शनाखालीच खात्री करून वापरा.

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

🌿 रानभाज्या प्रत्यक्ष ओळखायच्या आहेत?

प्रत्येक रानभाजी पुस्तकातून किंवा इंटरनेटवरील फोटो पाहून ओळखता येत नाही. अनेक वनस्पती एकसारख्या दिसतात आणि चुकीची ओळख धोकादायक ठरू शकते.

दर पावसाळ्यात निसर्गशाळेत अनुभवी मार्गदर्शकांसोबत Wild Food Discovery Walk आयोजित केली जाते. या भटकंतीत रानभाज्यांची प्रत्यक्ष ओळख, त्यांचे अधिवास, पारंपरिक उपयोग आणि शाश्वत पद्धतीने संकलन यांचा अनुभव घेता येतो.

जंगलात चालत, वनस्पतींना स्पर्श करत आणि स्थानिकांच्या अनुभवातून शिकलेली रानभाजी आयुष्यभर लक्षात राहते.

Wild Food Discovery बद्दल अधिक जाणून घ्या →

🌿 शेंडवेलाची (चाई) भाजी

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

स्थानिक नावे चाई, शेंडवेल
हंगाम कोवळे शेंडे – पावसाळ्याच्या सुरुवातीला
मोहोर – पावसाळ्याच्या शेवटी
खाण्यायोग्य भाग कोवळे शेंडे, मोहोर (फुले), कंद

निसर्गशाळेचा अनुभव

खरं तर या वेलीचे नाव शेंडवेल नाही. तिला चाईचा वेल म्हणतात. मात्र पुण्याच्या पश्चिम भागात आजही शेंडवेल हेच नाव अधिक प्रचलित आहे.

या वेलीची खास गोष्ट म्हणजे तिच्या जवळजवळ प्रत्येक खाद्य भागाची भाजी करता येते. पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारे कोवळे शेंडे, पावसाळा संपताना येणारा चाईचा मोहोर आणि काही भागात कंद देखील खाल्ले जातात.

मी स्वतः या वेलीच्या कोवळ्या शेंड्यांची भाजी खाल्ली असून तिची चव अतिशय रुचकर वाटली.

🌿 कोवळ्या शेंड्यांची भाजी

पावसाळ्याच्या सुरुवातीला चाईच्या वेलीला लुसलुशीत, कोवळे शेंडे फुटतात. याच शेंड्यांची अतिशय रुचकर भाजी केली जाते.

फोटोमध्ये दिसतात तसे कोवळे शेंडे तोडून आणावेत. साधारणपणे यामध्ये किडीचा त्रास नसतो. माती लागली असल्यास स्वच्छ धुवून घ्यावेत.

यानंतर बारीक चिरून वाफवून किंवा थेट फोडणीत परतून नेहमीप्रमाणे भाजी तयार करता येते.

पारंपरिक पाककृती

  • कोवळे शेंडे तोडा.
  • स्वच्छ धुवा.
  • बारीक चिरा.
  • वाफवून किंवा थेट परता.
  • नेहमीप्रमाणे फोडणी देऊन भाजी तयार करा.
चाईच्या वेलीचे कोवळे शेंडे

🌼 चाईच्या मोहोराची भाजी

पावसाळा संपत आला की चाईच्या वेलीला सुंदर मोहोर येतो. या मोहोराची म्हणजेच फुलांची भाजी अतिशय रुचकर असून स्थानिक भागात मोठ्या आवडीने खाल्ली जाते.

जंगलात जाऊन मोहोर मिळाला नाही तरी मावळ पट्ट्यात गणपतीनंतर ते दिवाळीपर्यंत रस्त्याच्या कडेला चाईचा मोहोर विकणारे स्थानिक विक्रेते दिसतात. ताजी फुले घेऊन ही भाजी नक्की करून पाहावी.

साहित्य

  • चाईचा मोहोर (फुले)
  • कांदा
  • लसूण
  • हिरव्या मिरच्या
  • हळद
  • तिखट
  • मीठ
  • मोहरी
  • जिरे
  • तेल

पारंपरिक पाककृती

  1. मोहोर स्वच्छ पाण्यात धुवून घ्या.
  2. फक्त फुले अलगद वेगळी करा. देठ वापरू नका.
  3. फुले हलकी वाफवून घ्या.
  4. थंड झाल्यावर अतिरिक्त पाणी पिळून काढा.
  5. मोहरी, जिरे, कांदा, लसूण यांची फोडणी तयार करा.
  6. त्यामध्ये फुले घालून चांगली परतून शिजवा.
  7. चवीनुसार मीठ व मसाले घालून गरमागरम वाढा.

🎥 चाईच्या मोहोराची पारंपरिक पाककृती


🌿 निसर्गशाळेची टिप

चाईच्या वेलीचे कोवळे शेंडे, मोहोर आणि कंद हे तिन्ही खाद्य भाग वेगवेगळ्या ऋतूंमध्ये उपलब्ध होतात. त्यामुळे योग्य हंगामातच त्यांचे संकलन करावे. कोणतीही वनस्पती प्रथमच गोळा करताना अनुभवी स्थानिक व्यक्ती किंवा वनस्पती जाणकार यांच्याकडून ओळख निश्चित करूनच वापरावी.

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

🌿 अंबाडी – लाल अंबाडी

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

अंबाडी रानभाजी
हंगाम पावसाळा
आढळते संपूर्ण महाराष्ट्र
खाण्यायोग्य भाग पाने, बिया, लाल बोंडे
विशेष ग्रामीण अन्नसंस्कृतीचा वारसा

निसर्गशाळेचा अनुभव

अंबाडी ही महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारी अत्यंत स्वादिष्ट रानभाजी आहे. पूर्वी गावोगावी शेताच्या बांधांवर अंबाडीची ताटवे सहज दिसायची.

दुर्दैवाने गेल्या काही दशकांत रासायनिक शेती, तणनाशके आणि बदलत्या शेतीपद्धतीमुळे अंबाडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. मात्र घाटमाथ्यावर आजही ही भाजी नैसर्गिकरित्या उगवताना दिसते.

🍽️ अंबाडीचे विविध उपयोग

🥬 अंबाडीची भाजी
🫓 अंबाडीच्या पानांची भाकरी
🌶️ पानांची चटणी
🫘 बियांची चटणी
🍹 लाल बोंड्यांचे सरबत
🍓 जेली
🛢️ बियांचे तेल
🪢 ताग व दोर

🗣️ विदर्भाच्या लोकपरंपरेतून

विदर्भात अंबाडीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. पूर्वी जवळजवळ प्रत्येक घरात अंबाडी वाळवून वर्षभरासाठी साठवून ठेवली जात असे.

धार्मिक नैवेद्य, भंडारे, गुरांचा आहार, पानांच्या भाकऱ्या, पानांची चटणी, बियांची चटणी, लाल बोंड्यांची चटणी, बियांचे तेल, तसेच अंबाडीच्या तागापासून दोर तयार करण्यासाठी अंबाडीचा वापर होत असे.

— माहिती सौजन्य : धनंजय मिसाळ

👨‍⚕️ वनस्पती अभ्यासकांचे निरीक्षण

तामिळनाडूमध्ये अंबाडीच्या पानांची चटणी आजही लोकप्रिय आहे. लोकपरंपरेनुसार अंबाडी मेंदूसाठी हितकारक मानली जाते. लाल बोंड्यांपासून तयार होणारी चटणी, सरबत आणि जेली विशेष चविष्ट असतात.

— डॉ. अरुण मानकर
🌿 निसर्गशाळेची टिप

अंबाडी ही फक्त एक रानभाजी नाही. ती महाराष्ट्राच्या ग्रामीण अन्नसंस्कृतीचा, अन्नसुरक्षेचा आणि जैवविविधतेचा एक महत्त्वाचा वारसा आहे.

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

🌿 चिचारडी

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

चिचारडी रानभाजी
हंगाम पावसाळा
आढळते सह्याद्री, वेल्हे परिसर
खाण्यायोग्य भाग कोवळी फळे
चव थोडी कडवट

निसर्गशाळेचा अनुभव

चिचारडी ही वेल्हे परिसरात आणि आमच्या निसर्गशाळा कॅम्पसमध्ये सहज आढळणारी एक वैशिष्ट्यपूर्ण रानभाजी आहे. ग्रामीण भागात तिच्या कोवळ्या फळांची भाजी मोठ्या आवडीने केली जाते.

मी स्वतः एक-दोन वेळा चिचारडीच्या फळांची भाजी खाल्ली आहे. कोवळी फळे कच्चीदेखील खाता येतात. त्यांची चव किंचित कडवट असली तरी योग्य पद्धतीने शिजवल्यावर ती अतिशय रुचकर लागतात.

लोकपरंपरेतून

स्थानिक लोकपरंपरेनुसार चिचारडीचा उपयोग मधुमेहाशी संबंधित आहारामध्ये केला जातो.

टीप: हा उपयोग लोकपरंपरेवर आधारित आहे. कोणत्याही वैद्यकीय उपचारासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

🍽️ पारंपरिक पाककृती

  1. कोवळी फळे स्वच्छ धुवून घ्या.
  2. वाफवून लपथपीत भाजी तयार करा.
  3. किंवा फक्त फोडणीत परतून फ्राय भाजी करा.
  4. आणखी एक पारंपरिक पद्धत म्हणजे हिरवी मिरची आणि लसूण घालून ठेचून तव्यावर परतणे.
  5. यापासून चविष्ट ठेचाही तयार केला जातो.
🌿 निसर्गशाळेची टिप

कडवट चव ही या रानभाजीचे वैशिष्ट्य आहे. कोवळी फळे निवडल्यास चव अधिक सौम्य आणि भाजी अधिक स्वादिष्ट लागते.

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

🌿 करटुले / फांगळा

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

करटुले रानभाजी
स्थानिक नावे करटुले, फांगळा, रानकारले
हंगाम पावसाळा
खाण्यायोग्य भाग कोवळी फळे
चव कारल्यासारखी दिसते पण कडू नसते

निसर्गशाळेचा अनुभव

करटुले ही कारल्याच्या कुळातील एक वैशिष्ट्यपूर्ण रानभाजी आहे. तिला अनेक ठिकाणी फांगळा किंवा रानकारले असेही म्हणतात.

दिसायला कारल्यासारखी असली तरी तिची चव कडू नसते. पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या उगवणारी ही भाजी बाजारात सहज मिळत नाही. योग्य हंगामात जंगलाच्या कडेला, शेताच्या बांधावर किंवा स्थानिक बाजारातच ती मिळण्याची शक्यता असते.

या भाजीची खरी चव अनुभवायची असेल तर कमीत कमी मसाले वापरून तिची भाजी करावी.

🍽️ पारंपरिक पाककृती

साहित्य

  • करटुले
  • भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
  • तेल
  • मोहरी
  • हिंग
  • हळद
  • तिखट
  • मीठ
  • काळा मसाला (ऐच्छिक)
  • ओले खोबरे
  • कोथिंबीर

कृती

  1. करटुले भरपूर पाण्यात स्वच्छ धुवा.
  2. गोल किंवा चौकोनी फोडी करा.
  3. मोहरी, हिंग व हळदीची फोडणी द्या.
  4. करटुले हलके परतून घ्या.
  5. थोडे पाणी शिंपडून झाकण ठेवून वाफवा.
  6. मऊ झाल्यावर मीठ, तिखट, मसाला व शेंगदाण्याचे कूट घाला.
  7. वरून ओले खोबरे व कोथिंबीर घालून वाढा.

💡 निसर्गशाळेच्या टिप्स

  • करटुले नेहमी भरपूर पाण्यात स्वच्छ धुवावीत.
  • काट्यांमध्ये माती अडकलेली असू शकते.
  • फक्त जुन्या व कठीण बिया काढाव्यात.
  • सर्व बिया काढण्याची गरज नाही.
  • कमीत कमी मसाल्यात भाजी अधिक स्वादिष्ट लागते.

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

🌿 फांजी / फाश्या

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

फांजी रानभाजी
📷 छायाचित्र सौजन्य : Rupali Bhole
हंगाम सरता आषाढ ते श्रावण
वनस्पती प्रकार वेलवर्गीय
खाण्यायोग्य भाग कोवळी पाने
विशेष वाफवून तळलेली पारंपरिक पाककृती

निसर्गशाळेचा अनुभव

सरता आषाढ आणि श्रावण महिन्यात फुलणारी ही वेलवर्गीय वनस्पती फांजी किंवा फाश्या या नावाने ओळखली जाते.

ग्रामीण भागात या हंगामात या पानांची भाजी आवर्जून केली जाते. लोकपरंपरेत या वनस्पतीला काही औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते, मात्र त्याविषयी विश्वसनीय वैज्ञानिक माहिती आम्हाला अद्याप उपलब्ध झालेली नाही.

मी स्वतः या हंगामात दोन ते तीन वेळा ही भाजी खाल्ली आहे. चव खूपच छान लागते.

🍽️ पारंपरिक पाककृती

साहित्य

  • १५–२० कोवळी पाने
  • बाजरीचे पीठ
  • थोडे गव्हाचे पीठ
  • थोडे तांदळाचे पीठ
  • कांदा
  • मिठ
  • तिखट / मसाले
  • तेल

कृती

  1. पाने बारीक चिरा.
  2. सर्व पीठे, कांदा आणि मसाले मिसळा.
  3. लांबट गोळे तयार करा.
  4. आळूवडीप्रमाणे वाफवून घ्या.
  5. थंड झाल्यावर तेलात हलके तळा.
  6. गरमागरम वाढा.

🌿 लोकपरंपरेतून

ग्रामीण भागात ही भाजी शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी खाल्ली जाते अशी समजूत आहे.

टीप: हे उपयोग लोकपरंपरेवर आधारित आहेत. यासंदर्भातील वैज्ञानिक पुरावे मर्यादित उपलब्ध आहेत.

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

🌿 गरजफळ / मटारु (करांदे)

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

गरजफळ / मटारु
📷 छायाचित्र सौजन्य : शिवशंकर चापुले
स्थानिक नावे गरजफळ, मटारु, करांदे
हंगाम पावसाळा
खाण्यायोग्य भाग कोवळी फळे
विशेष उकळून भाजी केली जाते

निसर्गशाळेचा अनुभव

गरजफळ, मटारु किंवा करांदे या नावांनी ओळखली जाणारी ही रानभाजी पावसाळ्यात उपलब्ध होते. कोवळ्या फळांची भाजी ग्रामीण भागात आवडीने केली जाते.

भाजी करण्यापूर्वी फळे उकळून घेण्याची पारंपरिक पद्धत अनेक ठिकाणी आजही वापरली जाते. यामुळे भाजीची चव अधिक खुलते.

🍽️ पारंपरिक पाककृती

साहित्य

  • गरजफळ / करांदे
  • तेल
  • मोहरी
  • जिरे
  • हिंग
  • लसूण
  • हिरव्या मिरच्या
  • कांदा
  • टोमॅटो
  • हळद
  • तिखट
  • धणेपूड
  • जिरेपूड
  • गरम मसाला (ऐच्छिक)
  • मीठ
  • कोथिंबीर

कृती

  1. फळे स्वच्छ धुवून घ्या.
  2. १० मिनिटे पाण्यात उकळून घ्या.
  3. पाणी गाळून फळे बाजूला ठेवा.
  4. मोहरी, जिरे, हिंग यांची फोडणी द्या.
  5. लसूण, हिरवी मिरची आणि कांदा परता.
  6. टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.
  7. हळद, तिखट, धणेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला घाला.
  8. उकडलेली फळे घालून सर्व मिश्रण एकत्र करा.
  9. चवीनुसार मीठ घालून ५ मिनिटे मंद आचेवर शिजवा.
  10. वरून कोथिंबीर घालून गरमागरम वाढा.
🌿 निसर्गशाळेची टिप

ही भाजी पारंपरिक पद्धतीने प्रथम उकळून मग मसाल्यात परतली जाते. ही पद्धत चव आणि पोत दोन्ही सुधारते. स्थानिक भागात भाकरी किंवा पराठ्यासोबत ही भाजी विशेष आवडीने खाल्ली जाते.

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

🌿 भारंगी

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

भारंगी रानभाजी
हंगाम पावसाळा
आढळते डोंगरउतार, जंगल, नदीकाठ
खाण्यायोग्य भाग कोवळी पाने, फुले
विशेष कडू पण अत्यंत रुचकर

निसर्गशाळेचा अनुभव

भारंगीची झुडपे डोंगरउतारावर, खुरट्या जंगलात, नदी-नाल्यांच्या काठावर तसेच शेताच्या परिसरात सहज आढळतात. पावसाळ्याच्या अखेरीस या वनस्पतीला सुंदर फुले व फळे येतात.

मुळांच्या सकर्सपासून तसेच बियांपासून भारंगीची लागवड करता येते.

२०२१ च्या पावसाळ्यात मी स्वतः भारंगीच्या पानांची भाजी करून खाल्ली. कडवट चवीमागेही एक वेगळी रुची दडलेली आहे, हे या भाजीमुळे अनुभवायला मिळाले.

🌿 लोकपरंपरेत भारंगी

कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागांत भारंगीच्या पानांची भाजी आजही आवर्जून केली जाते. लोकपरंपरेनुसार ही भाजी सर्दी, खोकला, कफ, पचन आणि ऋतुबदलाच्या काळातील त्रासांमध्ये उपयुक्त मानली जाते.

टीप : हे उपयोग पारंपरिक ज्ञानावर आधारित आहेत. वैद्यकीय उपचारासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

🥬 भारंगीच्या पानांची भाजी

साहित्य

  • कोवळी भारंगीची पाने
  • कांदा
  • लसूण
  • हिंग
  • मोहरी
  • हळद
  • तिखट
  • मीठ
  • थोडा गूळ

कृती

  1. देठ काढून पाने चिरा.
  2. कांदा व लसूण तेलात परता.
  3. त्यात पाने घालून वाफ काढा.
  4. थोडे पाणी शिंपडा.
  5. हळद, तिखट, हिंग, मीठ आणि थोडासा गूळ घालून शिजवा.
  6. कडूपणा कमी करण्यासाठी काहीजण पाने आधी उकळून पाणी काढतात.

🌼 भारंगीच्या फुलांची भाजी

साहित्य

  • भारंगीची फुले
  • कांदा
  • मूगडाळ
  • तिखट
  • मीठ
  • गूळ
  • मोहरी
  • हळद
  • हिंग

कृती

  1. फुले चिरून २–३ वेळा पिळून धुवा.
  2. यामुळे कडूपणा कमी होतो.
  3. फोडणीत कांदा परता.
  4. मूगडाळ घाला.
  5. फुले घालून मंद आचेवर शिजवा.
  6. शेवटी मीठ, गूळ किंवा साखर घाला.
  7. बेसन, भाजलेल्या डाळीचे कूट, तीळ, खसखस किंवा खोबरे घातल्यास भाजी अधिक चवदार लागते.
🌿 निसर्गशाळेची टिप

भारंगीची पाने आणि फुले दोन्ही खाद्य आहेत. कडूपणा कमी करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने वाफवणे किंवा पाण्यात धुऊन घेणे उपयोगी ठरते. बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी विशेष स्वादिष्ट लागते.

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

🌿 चिवळी

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

चिवळी रानभाजी
📷 छायाचित्र सौजन्य : मिलिंद गिरधारी
स्थानिक नावे चिवळी, रानघोळ, खाटेचौनाळ
हंगाम पावसाळा
आढळते रान, शेत, बांध
खाण्यायोग्य भाग कोवळी पाने व देठ

निसर्गशाळेचा अनुभव

चिवळी ही महाराष्ट्रात सर्वत्र मुबलक प्रमाणात आढळणारी एक स्वादिष्ट रानभाजी आहे. रानात, शेतात आणि शेताच्या बांधांवर ही सहज दिसून येते.

वेगवेगळ्या प्रदेशात चिवळी, रानघोळ किंवा खाटेचौनाळ या नावांनीही ती ओळखली जाते.

🌿 लोकपरंपरा व संशोधन

काही संशोधनांमध्ये चिवळीतील घटकांमध्ये कर्करोगप्रतिबंधक क्षमता असण्याची शक्यता सूचित करण्यात आली आहे. लोकपरंपरेत मुळव्याधीसाठीही ही भाजी उपयुक्त मानली जाते.

टीप : या उपयोगांवर अधिक वैज्ञानिक संशोधन आवश्यक आहे. कोणत्याही आजारासाठी वैद्यकीय उपचारांचा पर्याय म्हणून याकडे पाहू नये.

🍽️ लज्जतदार चिवळीची भाजी

साहित्य

  • चिवळीची कोवळी पाने व देठ
  • कांदा
  • लसूण
  • हिरवी मिरची
  • मूगडाळ
  • हिंग
  • हळद
  • तिखट
  • मीठ
  • तेल

कृती

  1. मुळे काढून कोवळी पाने व देठ निवडा.
  2. स्वच्छ धुवून बारीक चिरा.
  3. तेलात हिंग घालून फोडणी करा.
  4. कांदा मऊ होईपर्यंत परता.
  5. लसूण-मिरचीचे वाटण घाला.
  6. हळद, मूगडाळ आणि नंतर चिरलेली भाजी घाला.
  7. तिखट व मीठ घालून झाकण ठेवून शिजवा.
  8. मूगडाळ फक्त हलकी शिजेल याची काळजी घ्या.
🌿 निसर्गशाळेची टिप

गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत, खमंग चटणी, कच्चा कांदा आणि ताक यांच्यासह चिवळीची भाजी खाल्ल्यास तिचा खरा स्वाद अनुभवता येतो.

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

🌿 अनमोल बहुगुणी केना

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

केना रानभाजी
शास्त्रीय नाव Commelina benghalensis
हंगाम मे अखेर – ऑक्टोबर
खाण्यायोग्य भाग कोवळी पाने व खोड
आढळते शेत, बांध, डोंगर, गड, बाग

निसर्गशाळेचा अनुभव

पावसाळ्यात तुमच्या शेतात, बांधावर, बागेत, ट्रेकला गेले असता गडांवर, डोंगर-दऱ्यांमध्ये सहज उगवणारी ही वनस्पती म्हणजे सह्याद्रीचा एक दुर्लक्षित खजिना आहे.

महाराष्ट्रात सर्वत्र केना या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती जमिनीवर पसरत वाढते. प्रत्येक गाठीपासून नवीन मुळे फुटतात, म्हणून ती जलद वाढते.

तिची निळसर फुले सहज लक्ष वेधून घेतात. एकदा फोटो पाहिला की ही वनस्पती पुन्हा कधीच विसरता येत नाही.

तुमच्या भागात या वनस्पतीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखत असतील, तर आम्हाला जरूर कळवा.

🥬 स्वयंपाकातील उपयोग

कोवळी पाने आणि खोड भाजीमध्ये मिसळून वापरतात. याच पानांची भजीही अतिशय स्वादिष्ट होतात. भजी करताना बेसन कमी लागते आणि भजी छान फुलतात.

भाजीसाठी वरचे कोवळे भाग खुडल्यावर वनस्पतीला अधिक फूट येते.

🍽️ पारंपरिक उपयोग

  • कोवळ्या पानांची भाजी
  • मिश्र रानभाजीमध्ये वापर
  • पानांची भजी
  • दुष्काळी भागात खाद्य वनस्पती
  • जनावरांसाठी चारा

🌿 लोकपरंपरेतील उपयोग

  • अतिसार
  • घसा खवखवणे
  • त्वचेचे विकार
  • डोळ्यांचे विकार
  • कावीळ
  • रेचक म्हणून
  • जळजळ कमी करण्यासाठी
  • पोटविकार
  • फुलांचा रस

टीप : हे उपयोग पारंपरिक लोकज्ञानावर आधारित आहेत. यासाठी अधिक वैज्ञानिक संशोधन आवश्यक आहे.

🌿 निसर्गशाळेची टिप

केना ही सह्याद्रीतील सर्वात कमी ओळखली जाणारी पण सहज उपलब्ध असलेली पौष्टिक रानभाजी आहे. एकदा ही वनस्पती ओळखली, की प्रत्येक पावसाळ्यात ती तुम्हाला अनेक ठिकाणी दिसू लागेल.

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

🌿 टाकळा

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

टाकळा रानभाजी
शास्त्रीय नाव Cassia tora
स्थानिक नाव टाकळा / तखाटा
हंगाम पावसाळा
खाण्यायोग्य भाग कोवळी पाने व शेंगा

निसर्गशाळेचा अनुभव

टाकळा ही सह्याद्रीतील सर्वात बहुगुणी रानभाज्यांपैकी एक मानली जाते. पडीक जमीन, शेत, बाग, जंगल, रस्त्याच्या कडेला – जवळजवळ सर्वत्र ही वनस्पती सहज उगवते.

१९ व्या शतकात आणि त्यानंतरही ग्रामीण महाराष्ट्रात टाकळ्याची भाजी मोठ्या प्रमाणात खाल्ली जात असे. मात्र वाढते शहरीकरण, रासायनिक शेती आणि जंगलांचा ऱ्हास यामुळे ही रानभाजी आज दुर्मिळ होत चालली आहे.

आपल्या पारंपरिक खाद्यवारशातील ही एक मौल्यवान रानभाजी असून तिचे संवर्धन होणे अत्यंत आवश्यक आहे.

🌿 वनस्पतीची ओळख

  • उंची साधारण १ ते २ फूट.
  • पिवळसर फुले येतात.
  • रात्री पाने मिटतात.
  • लांबट-अंडाकृती पाने.
  • काळसर शेंगा.
  • वनस्पतीला उग्र वास असतो.

🍽️ पारंपरिक पाककृती

जून-जुलै महिन्यात टाकळ्याची भाजी किमान एक-दोन वेळा खाण्याची ग्रामीण भागात परंपरा आहे.

मेथीच्या भाजीप्रमाणेच ही भाजी बनवली जाते. औषधी रानभाजी असल्यामुळे कमीत कमी मसाले वापरणे योग्य मानले जाते.

साहित्य

  • कोवळी पाने
  • हिरवी मिरची
  • तेल
  • मीठ

माहिती सौजन्य : जिजाबाई भांगरे

🌱 खाद्य उपयोग

  • कोवळ्या पानांची भाजी
  • शेंगांची भाजी
  • पचायला हलकी
  • तुरट व किंचित उष्ण प्रकृती
🌿 लोकपरंपरेतील औषधी उपयोग
  • आयुर्वेदिक औषधांमध्ये बियांचा वापर.
  • त्वचाविकारांमध्ये पारंपरिक उपयोग.
  • पोट साफ होण्यासाठी.
  • कृमी कमी करण्यासाठी.
  • पित्त, कफ आणि वात संतुलित करण्यासाठी.
  • खोकला, श्वास आणि सर्दीमध्ये लोकपरंपरेतील उपयोग.
  • शरीरातील अतिरिक्त मेद कमी करण्यासाठी वापरली जाते अशी समजूत.
  • पावसाळ्यात होणारी खाज कमी करण्यासाठी वापर.

महत्त्वाची सूचना : वरील उपयोग हे लोकपरंपरा आणि आयुर्वेदातील उल्लेखांवर आधारित आहेत. हे वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाहीत. आरोग्यविषयक तक्रारींसाठी तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला घ्यावा.

🌿 निसर्गशाळेची टिप

टाकळा ही आपल्या आसपास सहज उगवणारी, पण दुर्लक्षित झालेली रानभाजी आहे. एकदा तिची ओळख झाली की दर पावसाळ्यात ती तुमच्या परिसरात सहज दिसू लागेल. पुढच्या पिढीपर्यंत हा नैसर्गिक खाद्यवारसा पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

🌿 वाघाटी

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

वाघाटी रानभाजी
📷 छायाचित्र सौजन्य : शिवशंकर चापुले
शास्त्रीय नाव Capparis zeylanica
कुळ Capparaceae
खाण्यायोग्य भाग कोवळी फळे
स्थानिक नावे वाघाटी, वाघोटी, गोविंदफळ

निसर्गशाळेचा अनुभव

वाघाटी ही काटेरी वेल सह्याद्रीतील कोरड्या तसेच दमट जंगलांमध्ये, डोंगरउतारावर आणि शेतांच्या कुंपणावर सहज आढळते. तिच्या वाकड्या, टोकदार काट्यांमुळे तिला वाघाटी किंवा व्याघ्रनखी अशी नावे पडली आहेत.

फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान तिला आकर्षक पांढरी फुले येतात, तर कोवळी फळे भाजीसाठी वापरली जातात.

🌿 आषाढी एकादशीची परंपरा

महाराष्ट्रातील अनेक भागांत आषाढी एकादशीला वाघाटीच्या कोवळ्या फळांची भाजी आवर्जून करण्याची परंपरा आहे. ही आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा एक सुंदर भाग आहे.

🍽️ वाघाटीची भाजी

साहित्य

  • कोवळी वाघाटीची फळे
  • कांदा
  • लसूण
  • जिरे
  • हिंग
  • हळद
  • तेल

कृती

  1. फळे स्वच्छ धुवा.
  2. बिया काढून टाका.
  3. बारीक चिरून पाण्यात शिजवा.
  4. गार झाल्यावर अतिरिक्त पाणी पिळून काढा.
  5. तेलात कांदा व लसूण परता.
  6. त्यात भाजी, जिरे, हिंग आणि हळद घालून चांगली वाफवा.

पाककृती : डॉ. प्रशांत भोसले, बारामती

🌿 वनस्पतीची ओळख

  • मोठी काटेरी वेल.
  • वाघाच्या नखांसारखे वाकडे काटे.
  • पांढरी शोभिवंत फुले.
  • लिंबाच्या आकाराची तांबूस फळे.
  • कोवळी फळे भाजीसाठी वापरतात.
🌱 लोकपरंपरेतील औषधी उपयोग

लोकपरंपरा आणि आयुर्वेदात वाघाटीच्या मुळांचा, फळांचा आणि पानांचा विविध विकारांमध्ये उपयोग केल्याचे उल्लेख आढळतात.

  • कफ, वात आणि पित्त संतुलित करण्यासाठी.
  • त्वचाविकारांमध्ये.
  • मूत्रविकारांमध्ये.
  • भगंदर आणि नाडीव्रणात.
  • सुतिका ज्वरातील पारंपरिक उपयोग.
  • क्षयरोगावरील पारंपरिक उल्लेख.
  • फळांचा उपयोग कफ आणि वायू विकारांमध्ये.

महत्त्वाची सूचना : वरील उपयोग हे लोकपरंपरा, आयुर्वेदातील उल्लेख आणि अनुभवांवर आधारित आहेत. ते आधुनिक वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाहीत.

माहिती सौजन्य : श्री दयानंद स्वामी (PSI, पेनूर)
वनस्पती वर्णन : वैद्य कैलास उगले, पंढरपूर

संदर्भ : "रानभाजी" — लेखक : राधेश बादले पाटील, लोहदंडतीर्थ, पंढरपूर

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

🌿 फोडशी / कोलु / कुळई

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

फोडशी रानभाजी
स्थानिक नावे फोडशी, कोलु, कुळई
हंगाम पावसाळ्याची सुरुवात
खाण्यायोग्य भाग कोवळी पाती
विशेष फुले येण्यापूर्वीच वापरतात

निसर्गशाळेचा अनुभव

सह्याद्रीत पावसाळा सुरू झाला की संपूर्ण डोंगररांग हिरव्या मखमलीने नटते. दगड, कातळ आणि खडकांवरही गवताचे तुरे डोलू लागतात.

या हिरवाईमध्ये अनेक खाद्य वनस्पती लपलेल्या असतात. त्यांपैकीच एक म्हणजे फोडशी. पहिल्यांदा पाहणाऱ्या कोणालाही या गवताच्या कोवळ्या पातींची स्वादिष्ट भाजी बनते, यावर विश्वास बसणार नाही.

🌼 महत्त्वाची ओळख

पाऊस सुरू झाल्यानंतर फोडशीची कोवळी पाती बाहेर येतात. केवळ फुले येण्यापूर्वीची कोवळी पातीच भाजीसाठी वापरली जातात. एकदा पांढरी फुले आली की त्या पाती भाजीसाठी वापरत नाहीत. काही भागात हिला सफेद मुसळी या नावानेही ओळखले जाते.

🍽️ साहित्य

  • कोवळी फोडशीची पाती
  • तेल
  • मोहरी
  • जिरे
  • हिंग
  • लसूण
  • कांदा
  • हळद
  • तिखट
  • धणेपूड
  • मीठ
  • कोथिंबीर

👩‍🍳 पारंपरिक पाककृती

  1. कोवळी पाती निवडून स्वच्छ धुवा.
  2. बारीक चिरा.
  3. मोहरी, जिरे, हिंग व लसूण यांची फोडणी द्या.
  4. कांदा मऊ होईपर्यंत परता.
  5. हळद, तिखट, धणेपूड घाला.
  6. फोडशी घालून झाकण ठेवा.
  7. ७–८ मिनिटे मंद आचेवर शिजवा.
  8. वेगळे पाणी घालू नका. भाजी स्वतःचे पाणी सोडते.
  9. शेवटी कोथिंबीर घालून गरमागरम वाढा.
🌿 निसर्गशाळेची टिप

फोडशी गोळा करताना नेहमी फुले न आलेली कोवळी पाती निवडा. ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत विशेष स्वादिष्ट लागते.

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

🌿 कुरडू रानभाजी

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

स्थानिक नावे कुरडू, कोंबड-कुरडू
संस्कृत नाव मयुरशिखा
इंग्रजी नाव Silver Cockscomb
खाण्यायोग्य भाग कोवळी पाने

निसर्गशाळेचा अनुभव

पहिला पाऊस पडला की रानोमाळ उगवणाऱ्या वनस्पतींपैकी कुरडू ही सर्वात दुर्लक्षित रानभाज्यांपैकी एक आहे.

अनेकदा तण समजून ही वनस्पती शेतातून उपटून फेकून दिली जाते. पण हिची कोवळी पाने अतिशय स्वादिष्ट भाजीसाठी वापरली जातात.

फुलोरा आला की कोंबड्याच्या तुऱ्यासारखा दिसतो. म्हणूनच अनेक भागांत तिला कोंबड-कुरडू असेही म्हणतात.

🦋 निसर्गातील महत्त्व

काही अभ्यासकांच्या मते शेताच्या आसपास कुरडू असल्यास त्यामुळे फुलपाखरे आकर्षित होतात आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा परागीभवनासाठी होऊ शकतो.

🍽️ साहित्य

  • ३–४ जुड्या कुरडूची कोवळी पाने
  • २ कांदे
  • ४–५ लसूण पाकळ्या
  • २–३ हिरव्या मिरच्या
  • हिंग
  • हळद
  • १ टोमॅटो
  • ओले खोबरे
  • मीठ
  • साखर
  • तेल

👩‍🍳 पारंपरिक पाककृती

  1. कोवळी पाने खुडून घ्या (उपटू नका).
  2. ३–४ पाण्यांनी स्वच्छ धुवा.
  3. लसूण व मिरचीची फोडणी करा.
  4. हिंग, हळद आणि कांदा परता.
  5. टोमॅटो व चिरलेली कुरडू घाला.
  6. झाकण ठेवून शिजवा.
  7. मीठ, साखर घालून पुन्हा ढवळा.
  8. शेवटी ओले खोबरे घालून गॅस बंद करा.
🌿 निसर्गशाळेची टिप

कुरडूची पाने खुडूनच घ्या. संपूर्ण वनस्पती उपटू नका. असे केल्याने पुन्हा नवीन फांद्या फुटतात आणि नवरात्राच्या सुमारास सुंदर फुलोरे येतात. त्यामुळे पुढील वर्षीही ही वनस्पती नैसर्गिकरीत्या उगवत राहते.

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

🌿 आंबोती / अंबुशी

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

आंबोती / अंबुशी
📷 आमच्या निसर्गशाळेच्या परसबागेत काढलेले छायाचित्र
शास्त्रीय नाव Oxalis corniculata
कुळ Oxalidaceae
स्थानिक नावे आंबोती, आंबुटी, अंबुशी, चांगेरी
इंग्रजी नाव Indian Sorrel

निसर्गशाळेचा अनुभव

आंबोती ही अशी रानभाजी आहे, जी अनेकांच्या अंगणात, परसबागेत किंवा कुंड्यांमध्ये तण म्हणून उगवते. पण ती एक स्वादिष्ट खाद्य वनस्पती आहे, हे फार कमी लोकांना माहिती असते.

ही वनस्पती जमिनीवर पसरत वाढते. खोडाच्या प्रत्येक पेरापासून नवीन मुळे फुटतात. तिची त्रिदली पाने आणि लहान पिवळी फुले तिला सहज ओळखू देतात.

🌿 ओळख कशी कराल?
  • त्रिदली (तीन पानांची) पाने.
  • जमिनीवर पसरत वाढणारी वनस्पती.
  • लहान पिवळी फुले.
  • ओलसर जागा, बागा, कुंड्या आणि परसबागेत सहज आढळते.

🍽️ आंबोतीच्या तीन पारंपरिक पाककृती

कृती १

साहित्य

  • आंबोतीची पाने
  • कांदा
  • लसूण
  • ओली मिरची / तिखट
  • गूळ
  • शेंगदाणा कूट
  • मीठ

तेलात कांदा परतून लसूण, मिरची, गूळ व शेंगदाणा कूट घालून चिरलेली पाने परतावीत. शेवटी मीठ घालून एक वाफ आणावी.

कृती २

साहित्य

  • आंबोतीची पाने
  • तूर / मूग / मसूर डाळ
  • दाणेकूट
  • हिरवी मिरची
  • लसूण
  • डाळीचे पीठ
  • गूळ

डाळ व भाजी शिजवून घोटावी. फोडणीत मिरची, दाणेकूट, गूळ, डाळीचे पीठ घालून भाजी शिजवावी.

कृती ३

साहित्य

  • आंबोतीची पाने
  • डाळीचे पीठ
  • लसूण
  • मोहरी
  • हिंग
  • हळद
  • गूळ
  • काळा मसाला

फोडणीत भाजी परतून तिखट, मसाला, मीठ व गूळ घालावा. डाळीचे पीठ मिसळून दोन वाफा आणाव्यात. शेवटी लसूण व लाल मिरचीची फोडणी द्यावी.

🌿 निसर्गशाळेची टिप

आंबोतीची आंबटसर चव शेंगदाणा कूट, गूळ आणि लसूण यांच्यासोबत अतिशय छान खुलते. घराच्या अंगणात किंवा कुंडीत सहज उगवणाऱ्या या रानभाजीकडे पुढच्या वेळी तण म्हणून नक्कीच पाहू नका.

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

🌿 चैनी / चवनी / रानकेळी

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

चैनी / चवनी / रानकेळी
📷 छायाचित्र : निसर्गशाळा • २२ जुलै २०२३
स्थानिक नावे चैनी, चवनी, रानकेळी
मावळातील नाव कोका
खाण्यायोग्य भाग फूल व कोवळी केळी
आढळते सह्याद्रीचा घाटमाथा

निसर्गशाळेचा अनुभव

सह्याद्रीत भटकणाऱ्या प्रत्येक भटक्याच्या ओळखीची ही वनस्पती आहे. घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी ती मुबलक प्रमाणात दिसते, पण तिची उपयुक्तता फार कमी लोकांना माहिती असल्याने ती हळूहळू दुर्लक्षित होत आहे.

मावळ भागात या फुलाला कोका असे म्हणतात. रानभाजी म्हणून याच फुलाची भाजी केली जाते. कोवळी रानकेळीही भाजीसाठी वापरली जातात, अगदी केळफुल आणि कच्च्या केळीप्रमाणे.

🌿 निसर्गातील महत्त्व

रानकेळीचे कंद रानडुक्कर (वराह) आवडीने खातात.

साळींदर देखील या वनस्पतीचे कंद उत्साहाने खाताना दिसतो.

पिकलेली केळी माणसाला तुरट लागतात, परंतु उन्हाळ्यात अनेक वन्य प्राण्यांसाठी ही महत्त्वाची खाद्यसाखळी आहे.

🍽️ खाद्य उपयोग

  • कोका (फूल) याची भाजी.
  • कोवळ्या केळ्यांची भाजी.
  • केळफुलाप्रमाणे पाककृती.
  • स्थानिक भागात पारंपरिक खाद्य.
🌱 संवर्धनासाठी एक छोटं पाऊल

उन्हाळ्याच्या शेवटी रानकेळीची फळे वाळल्यानंतर त्यामध्ये हजारो बिया तयार होतात. जर तुम्हाला सह्याद्रीच्या जैवविविधतेसाठी काही करायचे असेल, तर या बिया गोळा करा आणि योग्य ठिकाणी पेरा. एक-दोन वर्षांत रानकेळीचे सुंदर घोस पुन्हा डोलू लागतील.

🌿 निसर्गशाळेचा संदेश

रानभाज्या म्हणजे केवळ अन्न नव्हे, तर सह्याद्रीच्या निसर्गसंपदेचा अमूल्य वारसा आहे. त्यांची ओळख, योग्य वापर आणि संवर्धन ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

⬆️ रानभाज्यांच्या यादीकडे परत जा

🌿 रानभाज्यांचे पारंपरिक ज्ञान जपूया

रानभाज्या या केवळ अन्न नाहीत, तर आपल्या सह्याद्रीची, ग्रामीण जीवनशैलीची आणि पिढ्यानपिढ्या जपल्या गेलेल्या लोकज्ञानाची अमूल्य परंपरा आहेत. आज हे ज्ञान झपाट्याने हरवत चालले आहे. आपण सर्वांनी मिळून ते जतन केले, तर पुढील पिढ्यांनाही या नैसर्गिक संपत्तीचा लाभ घेता येईल.

📷 तुमच्याकडेही रानभाज्यांची माहिती आहे का?

तुमच्या परिसरातील रानभाज्या, त्यांची स्थानिक नावे, पाककृती, छायाचित्रे, लोकपरंपरेतील उपयोग किंवा इतर कोणतीही माहिती आमच्यासोबत जरूर शेअर करा. योग्य पडताळणीनंतर तुमच्या नावासह ही माहिती या मार्गदर्शिकेत समाविष्ट करण्यात येईल.

WhatsApp : +91 90490 02053

📲 निसर्गशाळा WhatsApp Community मध्ये सहभागी व्हा

रानभाज्या, सह्याद्री, जैवविविधता, खगोलशास्त्र, निसर्गभ्रमंती, शिबिरे, कार्यक्रम आणि निसर्गशाळावरील नवीन लेखांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत WhatsApp Community मध्ये सहभागी व्हा.

🌿 Join Nisargshala WhatsApp Community

समुदायात सहभागी झाल्यानंतर रानभाज्यांवरील नवीन लेख, सह्याद्रीतील भ्रमंती, कॅम्प्स, कार्यक्रम, खगोल निरीक्षण, निसर्गशिक्षण आणि इतर सर्व उपक्रमांचे अपडेट्स तुम्हाला नियमित मिळतील.

"आज एक रानभाजी ओळखा...
उद्या ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा."
हेमंत सिताराम ववले संस्थापक • निसर्गशाळा, पुणे

🏕️ रानभाज्या प्रत्यक्ष अनुभवायच्या आहेत?

सह्याद्रीतील रानभाज्या केवळ पुस्तकात किंवा लेखात वाचण्यापेक्षा, त्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासात ओळखणे हा एक वेगळाच अनुभव असतो. निसर्गशाळामध्ये वर्षभर विविध निसर्गभ्रमंती, पावसाळी रानभाजी फेऱ्या, ट्रेक्स, कॅम्पिंग, कुटुंब सहली, शालेय शैक्षणिक सहली, खगोल निरीक्षण कार्यक्रम आणि निसर्गशिक्षण उपक्रम आयोजित केले जातात.

🌿 आगामी कार्यक्रम पाहा

येणाऱ्या सर्व कार्यक्रमांची अद्ययावत माहिती, तारखा, शुल्क आणि नोंदणीसाठी वरील लिंकला भेट द्या.