मावळातील रानभाज्या

रानभाज्या मग त्या उन्हाळा, हिवाळ्यातील असोत वा अगदी पावसाळ्यातील असोत, या रानभाज्या आवर्जुन खाव्यात. स्टीफन कॉव्हे या इंग्रजी लेखकाचे एक वाक्य माझ्या कायमचे स्मरणात आहे. ते म्ह्णजे Interdependence is higher value than independence. एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ.

जंगले, वने माणसांनी राखली तर माणसांस वनांकडुन मिळणारी संपदा खरतर नुसती पर्यावरणाच्या दृष्टीनेचे अनमोल आहे असे नसुन व्यक्तिगत मानवी जीवनामध्ये देखील योग्य पोषकतत्वांची रेलचेल या वनसंपदे कडुन पुर्वीचा माणुस मिळवायचा. व ही आवश्यक पोषकतत्वे, खनिज तत्वे मिळण्याचे मुख्य साधन म्हणजे राजभाज्या.

हल्ली अगदी मावळ भागात देखील रानभाज्या आवडीने खाण्यासाठी, हौस म्ह्णुन खाण्यासाठी जंगलात जाणारांची संख्या खुपच कमी झाली आहे. पश्चिम पट्ट्यातील मावळ भागांमध्ये नावापुरती माणसे शिल्लक राहीलेली आहेत सध्या. व जी काही शिल्लक आहेत त्यात ९०% वयस्कर लोक आहेत. मुलं सुना, नातवंड आवडीने वर्षातुन सणासुदीला काय येतील तेवढीच ही गावे नांदतात. अन्यथा या गावांत गावकरी असे राहीलेलेच नाहीत.

पण जे काही शिल्लक आहेत त्यांच्या कडे अजुन ही पुर्वजांच्या ज्ञान विज्ञानाचा वारसा थोडा का होईना पण शिल्लक आहे.

मागच्याच आठवड्यात मला माअवळपट्ट्यातील विविध जातीच्या खेकड्यांविषयी माहीती मिळाली. ग्रामीणांना या व अशा विविध विषयात अप्लाईड ज्ञान होते याचा ही खेकड्यांची माहीती म्हणहे पुरावा होय. खेकड्यांच्या विषयीचा लेख नंतर कधीतरी लिहिणार आहे.

मागच्या आठवड्यातील रानातील वशाट लेखावर अनेक मित्रांच्या प्रतिक्रिया आल्या. अनेकांना खुबे व अळंबी हा प्रकार माहीतच नव्हता.

वशाट खाणारांनी खुबे, अळंबी सारखी व्यंजने खायला आवडतील असे ही सांगितले. पण शाकाहारी मित्रांकडुन रानभाज्यांविषयी ची सविस्तर माहिती मिळेल का अशा विनंत्या आल्या.

मांसाहारामध्येच नव्हे तर शाकाहारामध्ये देखील आपले पुर्वज व आपण खुपच समृध्द होतो व अजुन ही आहोत. रानभाज्या अनंत प्रकारच्या आहेत. अनंत म्ह्णायचे याचे कारण असे की या विषयात अधिकृत असे संशोधन अद्याप झालेले नाहीच. पुर्वापार असलेले व हळुहळु लुप्त होत चाललेले व जेवढे शिल्लक आहे तेवढेच काय आपणास माहित आहे.  किंबहुना सध्या ज्या रानभाज्या आपणास माहित आहेत त्यांवर देखील आधुनिक पध्दतीने चिकित्सा अद्याप झालेली नाही. नवनवीन जाती प्रजाती विकसीत करण्यासाठी , पोषक तत्वांचा मागोवा घेण्यासाठी तसेच अशाच रानभाज्यांची शेती करता येईल का हे पाहण्यासाठी राजभाज्यांचा वनस्पती शास्त्रीय अभ्यास होणे अत्यावश्यक आहे.

रानभाज्यांची आणि आमची ओळख वीसेक वर्षापुर्वी झाली. कधीतरी एखादा जुना जाणता ट्रेकर सोबत असला की त्याला किंवा एखाद्या स्थानिकास वाटेत दिसणा-या कोणत्याही झाडा कडे बोट करुन प्रश्न विचारावा की काका या झाडाचे नाव काय? याचे उपयोग काय? इत्यादी. व अशा प्रश्नांतुनच बरीच माहीती मिळत गेली.

ट्रेकींग करताना अशप्रकारे प्रश्न विचारुन मिळवलेले थिअरी ज्ञान खुप झाले होते . प्रत्यक्ष प्रॅक्टीकल करायला मिळाले शिळीम या गावी आमचे मित्र शरद शिंदे यांचे कडे. शरद शिंदे माझ्यापेक्षा वयाने खुपच जास्त तरीही आम्ही मित्र झालो. मी साधारणपणे ११ , १२ वी असताना कधी एकटा कधी मित्रांसोबत त्यांच्या कडे आवर्जुन जायचो. आम्हाला कामे नसायची. कधी या तिकोण्यावर तर कधी तुंग किल्यावर भटकण्यासाठी त्या भागातच पडीक असायचो. व प्रत्येक वेळी शरद भाऊंकडे जाणे नक्कीच. शरद भाऊ , शरद काका असे कोणतेही संबोधन वापरले तरी चालायचे. व अजुनही नक्की ठरवता आले नाही भाऊ म्हणायचे की काका!!

असो, तर या शरद रावांनी पहिल्यांदा रानभाज्यांची चव काय असते ती मला दिली. आम्ही त्यावेळी दोन रानभाज्या आणल्या डोंगरावरुन एक होती गुळवेल व दुस-या एका सीझनमध्ये कच्ची करवंदांची भाजी.

नंतर नोकरी व्यवसाय आयटी करीयर च्या फंदात पडलो व रानभाज्याच काय पण रान काय असते त्याचा देखील विसर पडला.

वेल्ह्यात जमीन घेणे झाले व पुनश्च निसर्गाची सत्संग सुरु झाला. वेल्ह्याच्या म्मावळा भागात, विविध ऋतुंमध्ये विविध भाज्या खावयास मिळतात. अर्थात यासाठे तुमची स्थानिक जाणकारांसोबत मस्त गट्टी पाहिजे.

मी आतापर्यंत अनेक रानभाज्या खाल्ल्या आहेत. यातील मला सर्वात जास्त आवडलेली रानभाजी म्हणजे शेंडवेल.

पावसळ्याच्या सुरुवातीस म्हणजे साधारणपणे जुनच्या शेवटच्या आठवड्यात येणा-या या वेल वर्गीय वनस्पतीचे कोवळे शेंडेच भाजी म्हणुन सर्रास मावळपट्ट्यात सगळीकडेच खाल्ली जाते.

आधीच म्हंटल्याप्रमाणे स्थानिक ठोकताळ्यांशिवाय या भाज्यांच्या पोषकमुल्यांविषयी आपणास फार काही माहीती नाही. क्वचित काही भाज्यांविषयी संशोधन ते ही आयुर्वेदातील उल्लेखामुळे झालेले दिसते.

तर शेंडवेल मावळ पट्ट्यात, वर्षावनांत म्हणजे घनदाट जंगलामध्येच तुम्हाला मिळेल. ही भाजी बनवायची पध्दत देखील अगदी साधी सोपी नेहमीची कोणतीही पालेभाजी बनवण्यासारखी्च आहे. सुकी ही करु शकता किंवा लपथपीत ही करु शकता. काही वेळा अगदी हाटुन देखील याची भाजी केली जाते.

या राजभाज्यांतील पोषणमुल्य जरी माहीती नसले तरी एक गोष्ट यांच्या बाबतीत खात्रीने सांगता येते ती म्हणजे या भाज्या शत प्रतिशत सेंद्रीय असतात. सेंद्रीय म्हणजे ऑरगॅनिक बरका!!!

सोबत मला २०१६ साली मिळालेली शेंडवेलाची भाजीचा फोटो…

जास्तीत जास्त राजभाज्या संदर्भात जास्तीत जास्त अधिकृत माहिती पुढच्या लेखामध्ये असेल.

 

भेटुयात पुन्हा !!

 

Facebook Comments

Share this if you like it..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares