मावळातील रानभाज्या – ओळख, गुणधर्म व पाककृती

वेगवेगळ्या ऋतुंमध्ये वेगवेगळ्या भाज्या आपणास रानावनांत खावयास मिळतात. गोड, आंबट, तिखट अशा वेगवेगळ्या चवींच्या या भाज्या ओळखता मात्र आल्या पाहिजे. यातील अनेक वनस्पती औषधी आहेत. स्थानिक परंपरागत ज्ञानाप्रमाणे विविध वनस्पतींचा उपयोग विविध विकारांवर जखमांवर केला जातो. उदा कोळ्याचा मका नावाचा एक कंद पावसाळ्यात फुलतो. अगदी मक्यासारखाचा पण बहारदार दिसणा-या या मक्याचा कंद विंचवाचे विष उतरवण्यासाठी वापरतात.

कोळ्याची मका

कोळ्याची मका – विंचु उतरवण्यासाठी याचा कंद वापरतात

मुरटाची भाजी

जुलै महिन्यात पावसाचा जोर खुपच जास्त असतो आणि त्याच वेळी घनदाट वर्षारण्यामध्ये मुरटाची भाजी नावाची एक अप्रतिम भाजी मिळते. वरकरणी नेच्यासारख्या दिसणा-या या वनस्पतीच्या कोवळ्या शेंड्यांची भाजी केली जाते.  मी खाल्लेल्या रानभाज्यांमध्ये मला सर्वात जास्त आवडलेली रानभाजी हीच. दुर्दैवाने माझ्या कडे या भाजीचे फोटो आता नाहीयेत. जेव्हा कधी हे फोटो मिळतील तेव्हा नक्कीच एक सविस्तर लेख या भाजीवर लिहिन.

पाथरी / पथरीची भाजी

मावळातील रानभाज्या

हि भाजी सर्वत्र आढळते. नुसतीच मावळ भागात नाही तर विदर्भ मराठवाड्यात देखील ही भाजी विपुल प्रमाणात पावसाळ्यात उगवते. पतरी,  पात्र अशा विविध नावांनी हिला ओळखले जाते. किडनी , मूत्र संबंधित व्याधीसाठी उपयुक्त . तसेच पुरुषत्व , जोम वाढवते असा देखील समज स्थानिकामध्ये आहे.
सुदृढ व्यक्तींनी कच्ची खावी . अशक्त, रुग्ण व्यक्तींनी 3/4 पानांचा मिक्सरमध्ये अथवा वाट्यावर वाटुन रस करून सकाळी प्यावा. मुगडाळ टाकून कोरडी भाजी छान होते .पावसाळ्यात मोकळ्या जागेत, डोंगर उतारावर, निच-याच्या जागेमध्ये ही भाजी उगवते.

टिप…. अशाच आकाराची पाने असलेल्या वनस्पती कडवट & विषारी पण आहेत .  नेहमी खाणारे / ग्रामीण भागातील पारखी व्यक्तींकडून खातरजमा करून मगच खावी .


निसर्गशाळा विषयी जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा 
निसर्गशाळा ही एक कॅम्पसाईट आहे पुणे शहराच्या पश्चिमेला वेल्हे तालुक्यात. हल्लीच्या काळात सु्टटीच्या दिवशी रीसॉर्ट्स मध्ये फिरण्यासाठी जाणे अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. या मध्ये आपणास मुख्यत्वे करुन सुट्टीचा आनंद घ्यायचा असतो. पण या आनंदासोबतच निसर्गातील विविध घटकांशी अगदी जवळीक साधता आली तर? जर नियंत्रित प्रकारचे व प्रशिक्षित मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली धाडसी खेळाची मजा देखील घेता आली तर? किमान नागरी सुविधा व कमाल नैसर्गिक वातावरण म्हणजेच निसर्गशाळा कॅम्पसाईट, पुणे. अधिक माहितीसाठी ९०४९००२०५३ या मोबाईल वर संपर्क साधा!

अंबाडी – लाल अंबाडी

मावळातील रानभाज्या

महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारी ही रानभाजी स्वादिष्ट आहे. गावोगाव शेताच्या बांधांवर देखील पुर्वी या भाजीचे तांडे दिसायचे. गेल्या काही दशकात विषारी रासायनिक खतांनी या भाजीचा बिमोड केल्यासारखे झाले आहे. घाटमाथ्यावर मात्र अजुन ही ही भाजी सापडते.

चिचारडी

मावळातील रानभाज्या

वेल्हे भागात, आमच्या कॅम्पसाईटवर सहज सापडणारी ही राज-फळ भाजी , ग्रामीण लोकांच्या मते मधुमेहाच्या इलाजासाठी वापरली जाते. मी स्वःत एक दोनदा चिचार्डीचीच्या फळांची भाजी खाल्ली आहे. कच्चे फळा देखील खाल्ले तरी चालते. याची चव थोडी कडवट असते पण चांगले वाफलुन घेऊन लपथपीत किंवा नुसती फ्राय भाजी केली तरी स्वादिष्ट लागते. याची भाजी करायची आणखी एक पध्दत आहे. हिरवी मिरची व लसूण घालून ठेचुन घेऊन तव्यावर परतून तव्यावर परतुन घ्यायची.

करटुले / फांगळा

मावळातील रानभाज्या

कर्टुली ही ,रानभाजी आहे.कारल्याच्या जातकुळीमधली आहे पण कङू नसते .यालाच रानकारलीसुध्दा म्हणतात. मंङईमधे सहज उपलब्ध नसते.पावसाळी मोसमातच येते. शक्यतो नैसर्गिक स्वरूपातच चांगली लागते,कमीत कमी मसाले वापरुन याची भाजी करावी.

साहीत्य :-

 कर्टुली, भाजलेल्या दाण्याचे कूट, फोङणीसाठी तेल,मोहरी,हीग,हळद,  मीठ,मिरची पावङर, काळा मसाला(ऐच्छीक), ओले खोबरे , कोथंबिर

कृति:-

सर्वात आधि कर्टुली स्वच्छ, भरपूर पाण्यात धुवून नंतर गोल किंवा चौकोनी फोडी करून चिरून घ्यावीत. चिरलेली भाजी तेलाची फोङणी करून त्यावर टाकून थोङी परतून घ्यावी व पाण्याचा हबका मारून अथवा ताटलीवर पाणी ठेवून वाफवावी.वाफून मऊ झाल्यावर त्यात मीठ, तिखट, मसाला घालावे व नीट हलवून परत एक हलकी वाफ आणावी .

तयार भाजी एका बाऊल मधे काढून वरून खोबरे कोथबिर घालावे.

टिप:-

कर्टुली भरपूर पाण्यात नीट धुवावीत.त्याच्या काट्यामधे माती रहाण्याची शक्यता असते.व भाजी खाताना तोङामधे खर  लागते.चिरल्यावर फक्त जून व कङक बियाच काढाव्यात . सर्वच काढू नयेत.

फांजी/फाश्या

सरता आषाढ आणि श्रावणात फुलणारी ही वेलवर्गीय वनस्पती “फांजी” या नांवाने ओळखली जाते. याचे काहीतरी औषधी गुणधर्म असलेच पाहिजेत, त्याशिवाय काय ग्रामीण भागात आवर्जून या वेळी याची भाजी करून खातात? याचे औषधी गुणधर्म काय आहेत हे कळू शकले नाही.

भाजी कशी करणार –

१५-२० पाने बारीक चिरुन घ्यावीत . त्यामध्ये बाजरीचे पिठ थोडे गव्हाचे पिठ थोडे तांदुळ पिठ व चवीनुसार मिठ मसाला कांदा बारिक चिरुन त्याचे लंब गोल गोळे करुन आळुच्या वडिसारखे वाफवुन घ्यावेत . नंतर तेलामध्ये फ्राय करुन खान्यास घ्यावेत . शरिरातील गर्मि कंट्रोल करन्यास मदत होते . पोट साफ राहते .
मी स्वतः या सीझन मध्य दोन ते तीन वेळा खाल्ली आहे . छान लागते .

गरजफळ/मटारु

मावळातील रानभाज्या

वेल्हे परीसरात मला याचे कंद नदीकाठावर , नदी पात्रामध्ये अनेकदा आढळले. स्थानिक लोकांना याविषयी फारसे माहित नव्हते. नंतर कधीतरी इंटरनेट वर याविषयी वाचनात आले. याची भाजी अजुन खाल्ली नाही मी. पण कोकणात सर्रास याची भाजी खाल्ली जाते. कोकणात याला करांदा/कारिंदा म्हणतात. भाजून खातात बटाट्यासारखा. पण काही वेळा कडू असतो. आधी थोडा तुकडा चावून बघा.

भारंगी

मावळातील रानभाज्या

भारंगीची झुडपे डोंगरउतारावर, खुरट्या जंगलात नदीनाल्यांच्या काठावर, शेतात सर्वत्र आढळतात. पावसाळ्याच्या अखेरीस भारंगीस फुले, फळे येतात. मुळांच्या सकर्सपासून व बियांपासून भारंगीची लागवड करता येते.

भारंगीचे मूळ ज्वर किंवा कफ असलेल्या रोगात देतात. कफ जास्त वाढल्याने होणारा दमा, खोकला या विकारांत भारंगमूळ प्रामुख्याने वापरतात. सर्दी व घशातील शोष यावर भारंगमूळ सुंठ अथवा वेखंडाबरोबर देतात.
– दम्यावर भारंगमूळ ज्येष्ठमध, बेहडा व अडुळसाची पाने यांचा काढा करून देतात.
भारंगीच्या पानांची भाजी दमा होऊ नये म्हणून आजही कोकणात वापरतात. याच्या कोवळ्या पानांची भाजी चवीला रुचकर असते. सर्दी, खोकला, ताप, छाती भरणे या विकारांत या भाजीचा उपयोग होतो.
– पोट साफ होण्यासाठीही ही भाजी उपयुक्त ठरते. कारण ती पाचक आहे.
– पोटात कृमी झाल्यास पाने शिजवून, त्यातील पाणी गाळून प्यावे. पोट जड असणे, तोंडाची चव गुळचट असणे, तोंडात चिकटा जाणवणे, सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती किंचित सूज जाणवणे, अनुत्साह, हवेच्या बदलाने सर्दी होणे, कफ घट्ट होणे, अशा वेळी भारंगीच्या पानांची भाजी हिंग व लसणाची फोडणी देऊन बाजरीच्या भाकरीबरोबर खावी.
– भारंगीच्या फुलांचीही भाजी करतात.

भारंगीच्या पानांची भाजी –

भारंगीची कोवळी पाने (देठ काढून टाकावेत.) अर्धी वाटी चिरलेला कांदा, 5-6 लसूण पाकळ्या ठेचून घ्याव्यात. मीठ, तिखट, गूळ, तेल, हिंग, मोहरी, हळद इ. कृती – जास्त तेलावर कांदा-लसूण परतून घ्यावे, त्यावर चिरलेली भारंगीची पाने घालावीत. झाकण ठेवून वाफ काढावी. पाण्याचा थोडा हबका मारावा. तिखट, मीठ, हळद, थोडा गूळ व हिंग घालून शिजवून उतरवावे. भारंगीची भाजी कडू असल्याने शिजवून पाणी काढून करतात.

भारंगीच्या फुलांची भाजी –

साहित्य – दोन वाट्या भारंगीची फुले, एक वाटी चिरलेला कांदा, मूगडाळ, तिखट, मीठ, गूळ, तेल, मोहरी, हळद, हिंग इ.
कृती – फुले चिरून घ्यावीत व 2-3 वेळा पाण्यातून पिळून घ्यावीत. यामुळे कडवटपणा निघून जातो. तेलाच्या फोडणीत कांदा परतावा. त्यात मूगडाळ नुसती धुऊन घालावी. मग चिरलेली फुले घालावीत, परतावे. मग तिखट घालावे. मंद गॅसवर परतावी. प्रथम फुलांमुळे भाजी जास्त वाढते. नंतर शिजून कमी होते. पूर्ण शिजल्यानंतर मीठ घालावे. नंतर गूळ घालून परतून उतरावे. गुळाऐवजी साखर वापरू शकता. बेसन पेरूनही भाजी छान लागते. भाजलेले डाळीचे कूट, तीळ भाजून पूड, खसखस, किसलेले खोबरे घालूनही भाजी चवदार बनविता येते.

चिवळी

मावळातील रानभाज्या

रानावनात, शेतात, बांधांवर अगदी मुबलक प्रमाणात आढळणारी ही आणखी एक लज्जतदार भाजी आहे. चिवळी , रानघोळ किंवा खाटेचौनाळ अशा वेगवेगळ्या नावांनी ही भाजी ओळखली जाते विविध प्रदेशांमध्ये.

ही भाजी कर्करोग प्रतिबंधक आहे असे काही संशोधनातुन समोर आले आहे. मुळव्याधावर देखील या भाजीचा चांगला उपयोग होतो.

लज्जतदार भाजी कशी करणार?

१) चिवळीची भाजी नीट निवडून घ्या. अगदी पानं पानं घ्यायची गरज नाही. पण त्याची मूळं काढून टाका आणि फक्त कोवळे देठ ठेवा.

२) नंतर ही भाजी स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यावर जराशी कोरडी करून बारीक चिरून घ्या.

३) कढईत तेलाची फोडणी करा. त्यात हिंग घाला. त्यावर कांदा घालून मध्यम आचेवर कांदा चांगला मऊ होईपर्यंत शिजू द्या.

४) कांदा शिजत आला की लसूण-मिरचीचं वाटण घाला. ते परता.

५) खमंग वास आल्यावर हळद आणि मूगडाळ घाला आणि त्यावर भाजी घाला. नीट हलवून घ्या.

६) त्यात तिखट आणि मीठ घाला. परत हलवून घ्या आणि झाकण ठेवून भाजी शिजवा. मूगडाळ हलकी शिजवा फार गाळ करू नका.

ही भाजी गरमागरम ज्वारीची भाकरी, एखादी खमंग चटणी, कच्चा कांदा आणि ताक असं बरोबर घेऊन खा. उत्तम लागते.

या व्यतिरिक्त अन्य देखील असंख्य भाज्या रानावनात आहेत, आपले वनवासी बांधव आजही या भाज्यांचा उपयोग करतात. इथुन पुढे जमेल तसे जमेल तेव्हा नवीन माहिती मिळाल्यास इथे शेयर करीत राहील.

आपणास देखील रानभाज्यांविषयी अधिकची माहिती असेल तर अवश्य पाठवा माझ्या व्हॉटसॲप नंबर वर – 9049002053. विविध रानभाज्यांविषयी माहिती संकलित करुन ठेवल्यास या परंपरागत ज्ञानाचे संवर्धन होईल.

आमच्या विविध लेखांविषयी अपडेट्स मिळविण्यासाठी 9049002053 या व्हॉट्सॲप नंबर वर “लेख नोंदणी” असा संदेश पाठवा

कळावे.

हेमंत सिताराम ववले

निसर्गशाळा, पुणे

Facebook Comments

Share this if you like it..

3 thoughts on “मावळातील रानभाज्या – ओळख, गुणधर्म व पाककृती

  1. Pingback: जरा जपुन, खेकडा आहे तो ! - निसर्गशाळा - Camping near Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares