गिरिप्रेमीने नुकताच कातराबाईचा कडा प्रस्तरारोहन करुन सर केला. यशदिप देखील या मोहीमेमध्ये सहभागी होता. या प्रस्तरारोहण मोहीमेचे संपुर्ण चित्रीकरण करण्यात आले होते. व यथावकाश सर्व आरोहकांचे कौतुक करण्याचा कार्यक्रम सोहळा झाला व त्यामध्ये या मोहीमेचे संपुर्ण चित्रीकरण/ फिल्म दाखवण्यात आली. कातराकडा आणि सह्याद्रीतील एकुणच सगळेच कडे कसे आडदाम्ड, उभे-आडवे विस्तारलेले, सरळसोट, रौद्र, भयावह आहेत याचे दर्शन या फिल्म मध्ये झाले. त्यातच एक भयानक अपघात देखील याच फिल्म मध्ये दाखवला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कुणालाही काहीच इजा झाली नाही. किरकोळ खरचटले मात्र. आरोहक कड्यावर वर वर चढण्याचा प्रयत्न करीत असतानाच, प्रमुख आरोहक कड्याच्या ज्या भागाला चिकटलेला होता तो संपुर्ण कड्याचा भागच निखळुन खाली पडला. तो पडताना नेमका खाली उभ्या असलेल्या आरोहकाला घासुन, आणखी खोल दरीत कोसळला. आणि खाली म्हणजे दुस-या क्रमांकावर जो आरोहक होता तो म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसुन माझा मित्र यशदिप. या फिल्म मुळे आणि यशदिप वर गुदरलेल्या या भीषण अपघातामुळे कातराकडा पाहण्याची अतीव इच्छा निर्माण झाली होती.

२००१ च्या उन्हाळ्यात आम्ही दोघांनीच रतनगड भटकण्याचे ठरवले व आम्ही निघालो. आम्हा दोघांचा नुकताच बेसिक माऊंटेनियरींग चा कोर्स झालेला होता. वय उमेदीचे होते. आनंद पाळंदेंचे डोंगरयात्रा म्हणजे आमची भगवदगीताच. त्यातील रतनगड ट्रेकच्या पानाचे व नकाशाचे झेरॉक्स करुन घ्यायचे, पुस्तकातील तो तो पाठ अनेकदा वाचायचा व मार्ग ठरवुन सुरुवात करायची. या शिवाय अन्य कसलीही साधने उपलब्ध नव्हती. आमचे नशीब चांगले की आमच्या आधीच्या पिढीने किमान तेवढे तरी करुन ठेवले होते. ज्यावेळी पाळंदे प्रभृती भटकत असतील तेव्हा त्यांच्याकडे तर पुर्वतयारी असे काहीही नव्हते. फक्त नाव तेवढे ठाऊक असायचे. त्यांनी असेच करीत करीत आख्खा सह्याद्री पाहिला, अनुभवला. एवढेच करुन ते थांबले नाहीत, तर त्यांना आलेल्या अनुभवांची शिदोरी देखील पुस्तक रुपाने आमच्या पिढील दिली, की जिच्या जीवावर आम्ही थोडेफार भटकु शकलो. त्यांच्या अनेक पुस्तकांमधुन अनेक किल्ले, कडे, पर्वत यांच्या विषयी सविस्तर माहिती त्यांनी नोंदली. नकाशे बनवले. वास्तु विशेषांची ओळख केली व ती देखील नोंदवुन ठेवली. वाटा-आडवाटा-माकडवाटा-चोरवाटा-फसव्या वाटा या विषयी लिहुन ठेवले. गडांवर पाण्याची स्थाने किती, कुठे हे सर्व लिहुन ठेवले. त्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये कोणत्या ऋतुंमध्ये पाणी उपलब्ध असते व ते पिण्यासाठी उपयोगाचे आहे की नाही हे देखील त्यांनी नोंदवुन ठेवले. राज्य महामंडळाच्या बसचे मार्ग, त्यांच्या वेळा हे सर्वच्या सर्व त्यांनी सविस्तर लिहुन ठेवले जेणेकरुन पुढच्यांची सोय व्हावी. असो.

तर डोंगरयात्राचा अभ्यास करुन आम्ही रतन गड भटकंती योजली. आम्ही सतरा-अठरा वर्षांची पोरे होतो त्यावेळी. ईगतपुरी हे नाव पुस्तकात वाचुन ते म्हणजे फार फार दुर , अगदी मध्यप्रदेडामध्ये असलेले एखादे शहर आहे की काय आणि आपण एवढ्या दुर देशी जाणार आहोत, असे वाटले होते. आणि त्याकाळी सर्व प्रवास लाल डब्यानेच व्हायचा. दुसरे पर्यायच नव्हते. त्यामुळे पुण्यापासुन निघुन आम्ही रतनवाडीला पोहोचेपर्यंत जवळजवळ आठ तास आम्ही एस टी बस मध्येच होतो. एसटी बस ची एक विशिष्ट संस्कृती होती. आणि आमच्या सारखे कधीतरीच म्हणजे भटकंतीलाच एस टी बस मध्ये बसणारे देखील आपोआपच्या त्या एसटी बसच्या संस्कृतीशी जोडले जायचे. त्या बस प्रवासातील पुण्यापासुनचा प्रवास मला विशेष आठवतो, कारण आम्हाला बस मध्ये बसण्याला जागाच मिळाली नाही. तुडूंब भरलेली बस. अगदी चेंगराचेगंरीच. त्यातच आमच्या भल्यामोठ्या पाठीवरच्या पिशव्या. दररोजच्या जीवनसंघर्षात संकटांशी दोन हात करीत, ज्यांचे पाठ आणि पोट एक झालेले होते असे ते ग्रामीण लोक जेव्हा आमच्या पाठीवरच्या त्या भल्यामोठ्या पिशव्या पाहत तेव्हा त्यांतील काहींना असे वाटत असावे की हे आले बघा खुळे! डोंगरद-या फिरायला येतात. काय ठेवलय जणु त्या दगडधोंड्यांत. तर काहींना आमच्या पिशव्या पाहुन आमच्या विषयी थोडे अप्रुप वाटत असावे असे त्यांच्या चेह-याकडे पाहुन समजायचे. आमच्या सारखे भटके पाहणे त्यांना काही नवीन नसायचे. तर आमच्या पाठीवरच्या त्या मोठाल्या पिशव्यांमुळे आम्हाला उभे राहण्यासाठी देखील जागा मिळाली नव्हती. पर्याय नसल्याने ड्रायव्हर काकांनी आम्हाला त्यांच्या केबिन मध्ये घेतले. केबिन कसली राव ती. भट्टीच म्हणा की! आमच्या बुडाखालीच इंजिनची करकर,डरडर,घरघर आणि त्यातुन येणा-या झळा. आणि डिझेलचा वास तर विचारुच नका. कसे काय ते ड्रायव्हर मंडळी एवढे लांबचे पल्ल्याचे अंतर गाडी चालवीत असतील हे देव जाणो अथवा ते ड्रायव्हरच. जसजशी गाडी एकेक थांबा घेऊन पुढे जाऊ लागली तसतशी मागे गाडीत जागा होऊ लागली. पिशव्या तशाच तिथे ठेवुन आम्ही, संधी मिळताच मागे जाऊन उभे राहिलो. पण दोन-अडीच तास तरी आम्ही असे ड्रायव्हर शेजारी बसुन घालवले असतील. नकोसे झाले होते तेव्हा अगदी!

रतनवाडीला पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती. प्रत्यक्ष प्रवासातील आठ आणि बस बदलण्यासाठी स्थानकावर वाट पाहण्यात तीन तास असा आमचा पुर्ण दिवस नुसता एस टी/ एसटी आगारामध्येच गेला. मंदिर परिसरामध्ये एक ओसरी पाहुन आम्ही आमचे बस्तान मांडले. आम्हाला विचारायला कुणीही आले नाही. कारण त्यावेळी त्या गावांमध्ये , गावचे गाव पण होते. लोक आठ वाजेपर्यंतच जेवन उरकुन निजुन जात. अगदी एखाद दुसर चुकारीचा माणुस कधीमधी चौकशीला यायचा. व तो देखील काही मदत हवी आहे का पोरांना हे पाहण्यासाठीच यायचा. पण या वेळी मत्र कोणीच आले नाही. आम्ही सोबत आणलेली चपाती, शेंगदाण्याची चटणी खाऊन, पाय पसरले. प्रवासाचा शीण भयंकर होता त्यामुळे तातडीने झोप लागली.

ज्यावेळी आम्ही इथे पोहोचलो तेव्हा भयानक अंधार असल्याने, आम्ही कुठे, कसल्या प्रदेशात आलो आहोत या विषयी काहीच कल्पना नव्हती. पहाटेला वस्तीतील कोंबड्यांच्या आरवण्याने लवकरच जाग आली.  मंदीरात घंटा अधुन मधुन वाजत होती. कदाचित कुणीतरी पहाटे पहाटे दर्शनाला आले असावेत. जसजसा आसमंत प्रकाशित होऊ लागला तसतसा आम्हाला तो परिसर देखील प्रकाशित झालेला आम्हाला दिसला. घाटमाथा म्हणजे खुप जास्त पावसाचा भाग, इथे पाऊस तीन महिने नुसत पडतच असतो त्यामुळे मंदिराचे रंगरंगोटीचे काम सुरु असलेले आम्हाला सकाळच्या प्रकाशात दिसले. नंतर हे देखील समजले की हे काम पुरातत्व खात्यामार्फतच सुरु होते.

सकाळचा चहा आणि नाश्ता आम्ही स्वतः बनविला. त्यासाठी थोडीफार लाकडे गोळा करावी लागली. चुल मांडुन आधी दुध पावडर पासुन दुध बनवुन घ्यावे लागायचे मग प्रत्यक्ष चहा. नाश्ता व जेवण बनविण्यासाठी आम्ही घरुन शिधा न्यायचो (अजुनही नेतो) . भाजलेला रवा, साखर, हळद, तिखट,  मीठ अशी या शिध्याची एक यादीच आमची बनायची प्रत्येक ट्रेकच्या काही दिवस आधी. त्या सकाळी आम्ही गोड शिरा बनवला. नेहमीप्रमाणे शिरा चिकट चिकट झाला. साखरेचा अंदाज नेहमीच चुकायचा. पण त्यातही गोडी असायची, न्यारी चव असायची.

तोंडावार थोडासा पाण्याचा शिडकावा करुन, सर्वात आधी मंदीर पाहिले. अतिशय सुंदर, सुबक असे ररतनवाडीचे मंदीर प्राचीन आहे. शिल्पकला, भिंतीवरील कोरीवकामे, मुर्तीकला अप्रतिम आहे. हल्ली सोयी वाढल्या आहेत तिकडच्या त्यामुळे जाणे-येणे, जेवण-खाण, मुक्काम आदी गोष्टी सोप्या झाल्या आहेत. ज्यांनी कुणी पाहिले नसेल हे मंदीर त्यांनी अवश्य पहावे.

अमृतेश्वर मंदीर रतनवाडी

अमृतेश्वर मंदीर रतनवाडी

ट्रेकींगचा आणखी एक अलिखित नियम आम्ही ज्येष्टांकडुन शिकलो. तो म्हणजे पाण्याचा वापर कमीतकमी करणे. माझे शिक्षक गुलाब सपकाळ, यांचा तर नेमच होता ट्रेक पुर्ण होईपर्यंत चेह-याला पाणी लावायचे नाही. नेम म्हणजे नेमच. त्यात त्यांनी कधीही बदल केला नाही. त्यांचे ट्रेकींगचे कपडेदेखील ठरलेले असायचे. पुर्ण बाह्याचा सुताचा एक सदरा मला आठवतोय. हा सदरा फक्त ट्रेकिंगसाठीच ते वापरीत. व गमतीने या सद-याला वगाचे कपडे म्हणत.

पाण्याचा वापर कमीत कमी करण्यामागची कल्पना ही आहे की कमी पाण्यात सुध्दा तुम्हाला नियोजन करता आले पाहिजे. बेसुमार पाणी वापरण्याचे फाजिल लाड कधीही ट्रेक दरम्यान करु नये. यामुळे एकतर पाण्याची बचत होते व दुसरे म्हणजे अगदी कठीण प्रसंगी म्हणजे जेव्हा खरोखरीच पाण्याचे दुर्भिक्ष्य असते त्यावेळी आपण पाण्याचा वापर कमी करण्यासाठी सरावलेले असल्यामुळे त्रास कमी होतो.

नाश्ता उरकुन, मंदीर, पुष्करिणी, परिसर, गाव-खेडे पाहुन आम्ही गड चढाई साठी निघालो. उन्हाळा असल्याने ऊन मी म्हणत तर होतेच त्यातच अचानक हवा दमट होऊ लागली. वारे वाहणे बंद झाले. रतन वाडी ते गडावरील मुक्कामाची गुहा ही चढाई साधारण दोन तासाची. नकाशे आणि स्थानिकांकडे व्यवस्थित चौकशी, मार्गावरील खाणाखुणा असे सगळे विचारुन आम्ही सुरुवात केली चढाईला. सकाळचे नऊ साडे वाजले असतील तरीही उन्हाच्या चटक्यांनी शरीराची कपड्यांनी न झाकलेली त्वचा भाजुन निघत होती. पुढ्चे दोन दिवस हे ऊन आम्हाला भाजुन काढणार होते. रतनगड तसा सोपा होता व त्याविषयी लिखित स्वरुपात माहिती देखील उपलब्ध असल्याने आम्हाला त्या विषयी फार काही चिंता नव्हती. पणा दुस-या तिस-या दिवशीचा आमचा टप्पा होता घनचक्कर डोंगर. त्याविषयी अगदी तुटपुंजी माहिती उपलब्ध असल्याने, आणि त्या नावानेच भुरळ घातल्याने, आम्ही घनचक्करचा देखील समावेश आमच्या या भटकंतीमध्ये केला होता. गावातुन निघताना एका वयस्कर मनुष्यास विनंती करुन, गावाबाहेर किल्ल्याच्या वाटेला लावुन देण्याची विनंती केली तशी त्याने होकार देऊन गावाबाहेर, थोडे दुरपर्यंत जंगलात आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी साथ दिली. वाटेत तो एका विशिष्ट झाडाची पाने तोडुन बंडीमध्ये ठेवत होता. चौकशी केल्यावर समजले की ती जंगली तंबाखुची पाने होती, व तो माणुस त्या पानांपासुन विड्या बनविणार होता. किल्ल्याच्या वाटेला लागल्यावर आमचे निरीक्षण, नोंदी देखील सुरु झाले होते. प्राण्यांच्या विष्टा पाहुन अंदाज बांधणे, झाडे-वनस्पतींकडे लक्ष देणे. त्याकाळी फोन स्मार्ट नव्हते आणि मोबाईल म्हणजे वाहुन नेता येईल असे देखील नव्हते. त्यामुळे फोटोग्राफी फारच जपुन करावी लागायची. आमच्या या तीन दिवसांच्या ट्रेक मध्ये मोजुन सहा फोटो आम्ही काढले होते. तेही केवळ रतनगड, अमृतेश्वर मंदिर आदींचे. एका माणसाचा फोटो घेण्यासाठी एक आख्खा फोटो वाया जातो असे काहीसे संकेत होते.

रतनगड छायाचित्र रतनवाडी मधुन

रतनगड छायाचित्र रतनवाडी मधुन

एका तासाच्या चालण्याने, आमच्या अंगातुन अक्षरशः घामाच्या धाराच वाहु लागल्या. ऐन उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्या घामाची देखील लागलीच वाफ होऊन अंगावर क्षाराचे चट्टे मात्र शिल्लक राहायचे. पाठीवरच्या पिशवीमध्ये शिधा, साहित्य खुपच जास्त असल्याने त्याचे वजन देखील खुप होते. पाणी जपुन जपुन वापरीत आम्ही किल्याच्या कड्यापाशी पोहिचलो. या कड्याला चढण्यासाठी एक लोखंडी शिडी लावली होती. प्रचंड दमछाक होऊन देखील आम्ही, विसावा न घेता शिडी – कडा चढण्यास प्रारंभ केला. रॉक क्लायंबिंग मध्ये होल्ड म्हणजे खडकातील पकडण्याची जागा खुप महत्वाची असते. कडा अगदी नव्वद अंशामध्ये असला तरी शिडीमुळे चढणे सोपे होते. त्यामुळे सोबत आणलेला दोर व इतर साहित्य वापरावे लागले नाही. गावात आधीच तशी चौकशी देखील केली होती. हा टप्पा चढणे सोपे जरी असले तरी एखादी चुक जरी झाली तरी क्षमा नाही अशा पध्दतीचा हा कडा होता.  सह्याद्री आहेच मुळी राकट, दणकट. इथे कित्येक ठिकाणी तुमची सगळी शक्ती व तुमचा सगळा अनुभव व तुमचे सगळे ज्ञान पणाला लागते. आमच्या अनुभव म्हणावा तर फार नव्हता. पण उमेद , उत्साह प्रचंड होता. आव्हानांना सामोर जाण्याची तयारी होती. कॉलेजला नुकत्याच सुट्ट्या लागल्या होत्या, आमचे या सुट्ट्यामध्ये करण्यासाठी चार ट्रेक पक्के झाले होते व त्यातील हा दुसरा ट्रेक होता. आमचे काही वर्गमित्र सिनेमा, पुढच्या वर्षीचे क्लासेस, इतर छंद अशा गोष्टी करण्यात सुट्ट्या घलवीत आणि आम्ही मात्र डोगर द-यामध्ये  आव्हानांनाच आव्हान द्यायला बहेर पडायचो. आम्ही दोघेही आई वडीलांना एकुलते एक. यशदिपचे आईवडील शिक्षित असल्याने व त्यांनाही सह्यद्रीच्या भटकंतीची आवड असल्याने ते कधी नाही म्हणत नसत आम्हाला. आणि माझे आईवडील तितके शिकलेले नसले तरी, माझ्या शिक्षकांच्या सल्ल्याने त्यांनी मला कधीही अडवले नाही. आम्ही असे बाहेर डोंगर द-यात जाऊन काय काय दिव्य पराक्रम करतो याची माहिती माझ्या घरी अजिबात नसायची. आपणच जेवढे काही सांगणार तेवढेच त्यांना सम्जायचे. फोटो ही त्याकळी चैनीची वस्तु असल्याने सर्वांनाच ती परवडायची नाही. त्यामुळे आता घरच्यांना जेवढ्या सविस्तर पणे फोटो, व्हिडीयो दाखवता येतात तेव्हा नसायचे.

अंगातुन अजुनही घामाच्या धारा वाहत होत्याच. सोपा जरी असला तरी चढाईमध्ये कस लागला कारण गुरुत्वाकर्षण शक्तिच्या विरुध्द काम करायचे होते. कडा चढुन आम्ही वर आलो, थोडी सपाटी लागली. श्रमाने तप्त झालेले आमचे शरीर, घामाच्या धारा, वरच्या सुरातील श्वासोच्छवास हे सगळे सुरु असताना समोर एक द्वार दिसले. त्याचा एक बुरुज अर्धा पडलेला होता. आमच्यावर जणु अमृताचा वर्षाव व्हावा, तशी वा-याची एक झुळुक आली. सर्वांगाला बिलगली. शरीराच्या प्रत्येक अवयवावर तिने हळुवार फुंकर घातली. ही झुळुक त्या दरवाज्यातुन आली होती. क्षणभरासाठी डोळे आपोआप मिटले गेले. त्या वा-याच्या आलिंगनाचा अनुभव निशब्द होऊन घेतला गेला. साठवला गेला. एकेक पाऊल पुढे पडले तसे वारे अधिक जाणु लागले. चढाईमुळे आलेला थकवा कधीच निघुन गेला होता. दरवाज्यातुन आत प्रवेशल्यावर, थोडी अधिक उंची गाठली आणि मागे वळुन पाहिले तर मागे भंडारदरा जलाशयाचा जो काही नजारा समोर दिसला तो अजुनही कायमचा लक्षात आहे. दोन पर्वत रांगांच्या मध्ये धरणाचे पाणी एखाद्या सर्पाप्रमाणे भासत होते. हा सर्प पाण्याच्या फुगवट्याकडे जाड होता व व डोंगर द-यांकडे निमुळता होत गेला. निळा साप. दोन दांडांच्या मध्ये आणखी एक छोटा जलाशय दिसत होता. संपुर्ण परिसरात अनेक छोटी छोटी खेडी, कौलारु छप्परांच्या पुंजक्या पुंजक्याने दिसत होती. ऐटदार, टुमदार गावे,वाड्या, वस्त्या तसेच त्यांच्या अवते भवती इतक्या दुरुनही दिसणारी ऊंच व डेरेदार वृक्षराजी. करड्या रंगाच्या गवतामुळे करडे झालेले डोंगरांचे दांड , त्यांच्या उतारावरदेखील मध्येमध्येच दिसणारी हिरवाई. सगळे काही विलक्षण होते. या सगळ्या दृश्यामध्ये कसलाही क्रुत्रिमपणा नव्हता. आम्ही अजुन थोडी पावले पुढे चाललो, मुक्कामाची गुहा सापडली. पाण्याची जागा शोधली, पाणी पिण्यास योग्य असल्याची खात्री केल्यानंतरच आम्ही आमच्या पाणी बिनधास्त पणे प्यायलो.

पिण्याचे पाण्याचा आवश्यक तेवढा साठा करण्यासाठी जाताना रतनगडावर

पिण्याचे पाण्याचा आवश्यक तेवढा साठा करण्यासाठी जाताना रतनगडावर यशदिप ने टिपलेले रोलच्या कॅमे-यातील फोटो

अगदी थोड्याच वेळात दुपारच्या, रात्रीच्या जेवणाची तयारी पुर्ण केली. लाकुडफाटा गोळा केला. पाणी भरुन आणले. सगळे काही टापटिप करुन आम्ही किल्ला पाहण्यासाठी निघालो. किल्ल्याचा प्रत्येक भाग आम्ही त्यावेळी पाहायचो. त्याच्या नोंदी करायचो. किती टाकी आहेत, किती मंदीरे अहेत, किती बुरुज, किती वाटा, सर्वत उंच ठिकाणाहुन आजुबाजुला इतर कोणते गड-किल्ले, डोंगर दिसतात, असे सगळे आम्ही न चुकता केले. जो कातराबाईचा कडा पहायची मला भयंकर उत्सुकता होती तो कडा तासभर तरी आम्ही न्याहाळत होतो. कड्यावर अपघात नक्की कुठे झाला होता, ती जागा देखील यशदिपने दाखविले. अगदी कातरुन , कापुन काढावा असाच राकट कतराबाईचा कडा कधीतरी चढण्याची कामना मनोमन धरुन आम्ही आटोपते घेतले. तरीही सामरद कडुन येणा-या वाटेने थोडे उतरुन जायचे राहिलेच. कारण पश्चिमेकडुन तो पर्यंत मेघ दाटुन आले. काळेकुट्ट ढग, वळवाचा मोठा पाऊस घेऊन आले होते. संध्याकाळी पाचच्या सुमारालाच अंधार पडला. जलाशय , गावे काही काही दिसेनासे झाले. धावतच जाऊन आम्ही गुहा गाठली. गुहेत पोहोचताच, जो काही पाऊस सुरु झाला तो पुढचा तासभर बरसतच होता बेसुमार. ही गुहा पुर्वेला उघडते. पर्जन्य धारा गुहेच्या दोन्ही बाजुंनी, म्हणजे बालेकिल्ल्याला वेढा देऊन पडत होत्या. इतक्या जवळुन अशा आकाशातुन कोसळणा-या पावसाच्या या धारा पाहण्याचा माझा पहिलाच अनुभव. उंच किल्ल्यावर, चक्क ढग ज्या ऊंचीला असतात त्याच उंचीवरुन इतक्या निवांत पणे , इतक्या जवळुन पाऊस आम्ही पाहत होतो. दुपारी काही माकडे दिसली होती. पण या पावसामुळे गडावर पावसाच्या आवाजाशिवाय व कडकडणा-या वीजांच्या आवाजाशिवाय आणखी कशाचाच आवाज ही नव्हता व चिटपाखरु देखील नव्हते. अंधारले होते. आमच्या कडील मेणबत्त्या लावुन आम्ही पुरेसा उजेड केला. रात्रीच्या जेवणामध्ये मसाले भात केला. तीच तिखट-मीठ चुकलेली अवीट चव त्या भाताला देखील होती. किंचित शांत आणि किंचित भय असा कल्लोळ मनात सुरु असताना पहाटे कधीतरी झोप लागली.

वळवाच्या पावसाचे ढगांनी गडा वेढा दिला - रतनगड

वळवाच्या पावसाचे ढगांनी गडा वेढा दिला – रतनगड

तिस-या दिवशी आम्हाला जायचे होते घनचक्कर ला. घनचक्कर डोंगर खुपच उंच डोंगर आहे. महाराष्ट्रातील तिस-या क्रमांकाचे उंच शिखर, येथील कातळकड्यांमुळे, घनचक्कर ची ऊंची गगनचुंबी असल्याचा अनुभव येतो. या डोंगराचे नाव घनचक्कर का पडले असावे याचा अंदाज या भटकंतीमध्ये येणार होता. रोमांच, थरार, भीती, आनंद, भुकेने झालेली व्यकुळता, पाण्याच्या एकेका थेंबासाठी आमची झालेली ससेहोलपट, रस्ता न सापडल्याने झालेली अगतिकता, हातपाय गाळुन, धीर खचणे असे अनेक अनुभव घनचक्कर ने दिले. घनचक्कर विषयी पुढे कधीतरी निवांत लिहिन.

हेमंत ववले

निसर्गशाळा, पुणे

टिप – कृपया असे एकट्या दुकट्याने ट्रेक करणे धोकादायक असल्याने टाळावेत. यात अनेक प्रकारच्या धोक्यांना आपण आमंत्रित करीत असतो, व आपत्ती समयी मदत मिळवणे देखील अवघड होऊन जाते. अनुभव व परिसराची योग्य, अचुक माहिती असल्याशिवाय असे धाडस करु नये.

Facebook Comments

Share this if you like it..

One Response

  1. Abhishek Tapre says:

    अप्रतिम. सर तुमी तो जमानाचं जिवंत केला. खुप छान लेखन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हुप्प्या – The Symphony of Emotions
A Team outing with a difference @ Nisargshala
Blog posts & Event Alerts

Recent Articles
  • In Astronomy, STar gazing
    निसर्गशाळा येथे दहा इंच व्यासाचा मुख्य आरसा असलेली दुर्बीण आहे. यातुन आपण गुरुचे उपग्रह पाहु शकतो, गुरु ग्रहावरील वादळ पाहु शकतो, अनेक दुरस्थ तारे, तारकापुंज पाहु शकतो, चंद्र तर इतका सुंदर आणि स्पष्ट दिसतो की त्यावरील खड्डे नसुन महाकाय विवरं आहेत, दया आहेत, त्यांना खोल असे कडे आहेत. एकदा आपल्याकडे एक खगोल निरीक्षक त्यांची १६ इंच व्यासाची दुर्बीण घेऊन आले होते , त्यातुन त्यांनी मला चंद्रावरील अश्याच एका विवराचा कडा दाखवला. हा कडा पाहताना मला हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा आठवला. लौकरच आपण म्हणजे निसर्गशाळा बारा इंच व्यास असलेली अजुन प्रगत अशी दुर्बीण घेणार आहोत. […]
  • In Environment
    महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या. दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली. […]
  • In Environment
    म्हणजेच काय तर आपला भारत आणी भारतातील प्रत्येक पर्वत (हिमालय अपवाद) तितकाच जुना आहे जितके पृथ्वीचे वय आहे. येथील मातीचा कण न कण असा का झाला याचे कारण या मातीने इतक्या करोडो वर्षाम्च्या अनुभवातुन हे शिकले आहे की या सुर्यमंडलात, या अवकाशात तग धरायची असेल तर त्यासाठी कसे स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. […]
  • In Environment
    पर्यावरण हा शब्द आपल्या कानी पडला की काही जण थोडं थबकतात, काही जणांच्या भुवया थोड्या उंचवतात, काही जणांचे कान अजुन जास्त सतर्क होतात तर काही जणांना काहीही समजतच नाही काय ऐकलं ते म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे काही जणांच्या बाबतीत घडत असते. […]
  • In Music, Tourism
    मग सुरु झाली संगीत रजनी. गायत्री सप्रे-ढवळे आणि कुमार करंदीकर यांनी रसिक श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात , स्वर्गीय सुखाची रेलचेल असणा-या चंद्रमाधवीच्या प्रदेशात नेण्याचा जणु चंगच बांधला होता जणु. हा प्रवास, चंद्रमाधवीच्या प्रदेशाकडे जाण्याचा हा प्रवास संगीत सुरांचाच नुसता नव्हता बर का ! […]