‘राजगड एक अविस्मरणीय आणि विस्मयकारक ट्रेक’

24 मार्च 2012 साली मी आणि माझे कॉलेज मित्र असे 6 जण राजगड ट्रेक प्लॅन केला, ट्रेकिंग चा फारसा काही अनुभव आमच्या पैकी कुणालाही नाही, पण मी स्वतः 2 वर्षांपूर्वी दुसऱ्या मित्रांसोबत राजगड one day return ट्रेक केला होता. त्यावेळी आमच्या ग्रुप मध्ये मोटरसायकल कुणाकडेही नव्हती त्यामुळे ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठून आवरून आम्ही स्वारगेट एसटी स्टँड ला जमलो, नेहमीप्रमाणे आमचा मित्र हर्षद ने जो उशीर करायचा तो केलाच, असो. हा ट्रेक मुक्काम करायच्या दृष्टीने प्लॅन केला होता त्यामुळे सर्वांनी भरपुर पाणी, ट्रेक करताना तोंड चालू राहावे म्हणून ‘चखना’, झोपण्यासाठी चटई आणि पांघरूण, आणि सर्वात महत्वाचं रात्रीच्या जेवणासाठी मॅगी ची पाकिटे आणि एक ‘भलं मोठ्ठ’ पातेलं जे भाड्याने घेतलं होतं असा हा सगळा ‘बोरीया बिस्तर’ आम्ही सोबत घेऊन आम्ही निघालो होतो.

एस टी चा प्रवास

स्वारगेट ते राजगड एसटी प्रवास आम्ही सर्वांनी गाण्यांच्या भेंड्या वगैरे करत मस्त एन्जॉय केला. गाडी कधी सातारा रोड वरून कात्रज घाटापालिकडे जाऊन हायवेय ला लागली कळलेच नाही. पुढे नसरापूर ओलांडल्यावर गावाकडे आल्याचे लगेच जाणवते, पुणेकरांना शहरापासून एवढ्या जवळ गावाकडील वातावरण आणि निसर्ग अनुभवता येणं हे भाग्य च म्हणावं लागेल. पुढील गावे ओलांडुन गाडी राजगड पायथ्याला आली सुद्धा. आम्ही आमचा सगळं गाश्या उचलून पायथ्याशी आलो, तिथे हॉटेल मध्ये पोटभरून नाश्ता केला, थोडा वेळ गप्पा मारून आम्ही आता चढण्याच्या तयारीतच होतो तेवढ्यात एकाला पोटाचा त्रास सुरू झाला. आम्ही सगळे त्याला म्हणू लागलो की चांगला मुहूर्त बघून पोट बिघडले. आधीच उशीर झाला होता, ट्रेक तर करायचा होता आणि त्याला एकटा सोडून पुढे जाणे शक्य नव्हते. मग थोडा वेळ तिथे थांबलो, त्यात मग त्याची टिंगल उडवणे, हश्या, त्या अवस्थेत त्याचे फोटो काढणे असे सगळे करमणुकीचे प्रकार झाले आणि मग त्याचा सगळा कार्यक्रम आटोपून एकदाची चढायला सुरुवात केली.

थोडे अंतर चालल्यानंतर पहीला थांबा

राजगड खूप मोठा आहे आणि ट्रेक देखील अवघड आहे उगाच नाही त्याला गडांचा राजा म्हंटल जात! ट्रेकिंग चा सराव आम्हाला नसल्या मुळे दम लागणे साहजिकच होते, आम्ही खूप हळू हळू, थांबत थांबत चढत होतो, आमच्या सोबत असलेल्या सामानाचा बोझ्या पण भरपूर होता त्यात ते पातेलं. भरपूर पाणी पीत होतो, हळू हळू पाणी सपंत होतं, त्यामुळे एकमेकांना सूचना देत होतो की पाणी कमी प्या कारण वर मुक्काम करायचा आहे आणि उद्या पर्यंत पाणी पुरायला हवे. चढत असताना वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळत होत्या विविध प्रकारचे पक्षी, कीटक, मुंग्यांची वारुळे आणि वारुळाचा एक वेगळा प्रकार ज्याला ‘गडमुंगी’ असे म्हणतात तो सुद्धा पाहायला मिळाला, याचे नाव आधी माहीत नव्हते, अलीकडेच हेमंत कडून कळाले. माकडे सुद्धा बरीच होती त्यांची भीती सुद्धा वाटत होती. माझ्याकडे Bushnell ची 10×25 Binocular होती, यातील 10 म्हणजे त्या दुर्बिणीची पॉवर म्हणजे त्यातून एखादी गोष्ट किती पट मोठी दिसनार हे कळते आणि 25 म्हणजे त्या दुर्बिणीच्या पुढील भिंग किती व्यासाचे आहे हे कळते, भिंगाचा व्यास जेवढा मोठा तेवढी त्यातून दिसणारी प्रतिमा प्रखर किंवा तेजस्वी दिसते. ही दुर्बीण सुद्धा मित्राकडून बॉरोव केली होती, चढत असताना खालील गावे, दुरवरील डोंगर, राजगड चा कडा या सर्व गोष्टी खूप जवळ दिसत होत्या. असे करता करता आम्ही बऱ्याच वर येऊन पोहोचलो, चढायला सुरुवात करून दीड तासापेक्षा जास्त वेळ झाला होता तरी सुद्धा अजून निम्म्याहून जास्त चढणे बाकी होते. आम्ही खूप दमलो होतो. मग आम्ही एके ठिकाणी झाडाची सावली बघून थांबलो. सगळ्यांना भूक लागली होती मग तिथेच आम्ही एकत्र बसून घरून आणलेला डबा खाल्ला, आणि थोडा वेळ विश्रांती घेतली.

माझी छोटी दुरबिण

विश्रांती झाल्यावर सगळ्यांना एकदम फ्रेश वाटले, आणि एका नवीन जोश मध्ये सर्वांनी पुन्हा चढायला सुरुवात केली. चढताना माझ्या Sony च्या Walkman W580 फोन मधून फोटो घेणे चालूच होते. अस करत करत आम्ही जवळ जवळ साडेतीन ते चार तासांनंतर चोरदरवजा ला एकदाचे पोचलो. एवढ्या प्रचंड चढाई केल्यानंतर सगळे थकले होते पण जेव्हा चोर दरवाजातून आत शिरलो तेव्हा सगळा थकवा जणू अचानक गायब च झाला. आपण एवढ्या उंच गडावर चढून वर आलो यावर विश्वास च बसत नव्हता. आम्ही तेथील कठड्यावर थोडा वेळ बसून आराम केला. त्यांनतर पुढे थोडा किल्ला चढला की तिथे मोठे पद्मावती तळे आहे. तिथेच वर एक मंदिर आहे तिथे आम्ही आमचा बस्तान मांडलं. तिथे कौलारू बांधकाम आहे त्याच्या पुढे व्हरांडा आहे, बसायला जागा आहे, तेथून खालील तळ्याचा छान view मिळतो, तिथे आम्ही आराम केला. तिथे बसल्यावर असं वाटत होतं की आपलंच स्वतः च घर आहे. आराम झाल्यावर आम्ही रात्रीच्या तयारीला लागलो. सर्वप्रथम आग पेटवण्या साठी सरपण हवं होतं. सगळे चारी दिशांना पसरलो लाकडं, वाळलेलं

एक अवघड चढण

गवत हे गोळा करत असताना आम्हाला गुरांचे वाळलेलं शेण सुद्धा सापडत होत ते आम्ही गोवऱ्या मानून गोळा केलं. काही ठिकाणी इतर प्राण्यांच्या वाळलेल्या विष्ठा सुद्धा होत्या त्या सुद्धा आम्ही गोळा केल्या ते नेमकं काय होत हे नंतर आम्हाला कळलं जाऊदे त्याबद्दल न बोललेलं च बरं, असो. अंधार पडायच्या आधी आग पेटवायची होती नंतर धावपळ नको. शेणाच्या गोवऱ्या आणि वाळलेलं ‘ते’ जे काही होत ते यांच्यामुळे आग लवकर पेटली. मग आम्ही त्यात मोठ्या लकडाचे तुकडे टाकले, तोपर्यंत अंधार पडला होता. त्यावर मग आम्ही सोबत आणलेलं ते भव्य पातेलं ठेवलं आणि त्यात आमच्या जवळील पिण्याचे पाणी ओतून मॅगीची पाकिटे फोडून टाकली. सतीश ने बनवायचा task हाती घेतला होता, मग मेणबत्तीच्या प्रकाशात आणि पातेल्यामध्ये टॉर्च दाखवत कशीबशी एकदाची पातेलंभरुन मॅगी तयार झाली. सगळ्यांनी मॅगीचा आस्वाद घेतला, पण मला काही ती मॅगी आवडली नाही, काही केल्या ती माझ्या घशाखाली उतरत नव्हती. कारण मी मॅगीच्या बापतीत खूप perticular आहे. पण काय करणार, दुसरा काही पर्याय नव्हता, अश्या ठिकाणी जिभेचे चोचले पुरवले जात नाहीत, जे समोर येईल ते गपचूप खावं लागतं. सर्वांचं मॅगीवजा जेवण झाल्यावरही आग तशीच चालू होती, रात्री शेकण्यासाठी आम्ही त्यात अजून लाकडे टाकली. असा सगळा कार्यक्रम उरकल्यावर आम्ही जरा निवांत झालो. आमच्या गप्पा चालू होत्या.

चुलीवरील पाककृती

संध्याकाळचे आठ वाजले असावेत सहज वर लक्ष गेलं पूर्ण आकाश हजारो चांदण्यांनी गच्च भरलं होतं एवढे तारे मी आज पर्यंत आयुष्यात कधीच बघितले नव्हते आणि आजही राजगड सारखं आकाश मी दुसरीकडे कुठेही पाहिलं नाही. पश्चिमेकडे चंद्रकोर क्षितिजाला स्पर्श करत होती त्याच्यावर गुरु मावळण्याच्या बेतात होता त्याच्यावर मृगनक्षत्र ठळक दिसत होते, पूर्वेकडे लालसर तांबूस मंगळ उगवलेला दिसत होता. त्यावेळी मला ही अक्षरं आमची एवढी माहिती नव्हती फक्त मृग नक्षत्र आणि सप्तर्षी सोडले तर मला दुसरं कुठलंही नक्षत्र माहित नव्हतं. वरील नावे मी नंतर स्टार चार्ट बघून शोधून काढली आणि आपल्याला त्या दिवशी आकाशात काय काय दिसत होतं याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला. मला राजगड ट्रेक अविस्मरणीय वाटण्याचे खरं कारण तेव्हा बघितलेलं तार्यांनी भरलेलं गच्च आकाश या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. त्या रात्री मी माझ्याकडे असलेल्या छोट्या दुर्बिणीने बघण्याचा प्रयत्न केला पण त्यातून मला काही दिसले नाही कारण तेव्हा मला आकाश निरीक्षणा बद्दल एवढं काही माहीत नव्हतं.

बरीच रात्र झाली होती बाकी सर्वजण केव्हाच झोपी गेले होते माझ्यासोबत फक्त सतीश होता आम्हाला सुद्धा झोप आली होती आम्ही आत मध्ये झोपायला गेलो. सगळे ढाराढूर झोपले होते. मीसुद्धा एका कोपऱ्यात पडलो पण काही केल्या झोप लागेना कारण आजूबाजूला उंदीर घुशी फिरत होते दार लावून घेतलं होतं तरीसुद्धा थोडी भीती वाटत होती बाहेरून कोणी येईल कि काय. थोड्यावेळाने विपिन आणि नरेश उठला कारण विपिन ला एक नंबर ला जायचे होते मी सुद्धा बाहेर आलो ते दोघे थोडे पुढे गेले मी परत आकाशात बघत बसलो, थोडा वेळ झाला आणि हे दोघे जण सुसाट पळत येत होते काय झालं विचारलं तर ते म्हणाले आम्ही बिबट्या पहिला, थोड्या वेळाने आमच्या शेजारून एक गाढव गेले. तेव्हा कळले कि तो बिबट्या म्हणजे ते गाढव होते. त्यानंतर आम्ही सर्व झोपी गेलो. मला अजूनही खंत वाटते मला जर तेव्हा ॲस्ट्रॉनॉमी बद्दल थोडी माहिती असते तर मी थोडा अजुन जागा राहिलो असतो आणि मला आकाशगंगा बघायला मिळाली असती, असो.

बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार

दुसऱ्या दिवशी थोडी उशिरा जाग आली. सर्व जण उठले. थोड्या वेळाने उरलेसुरले पाणी सुद्धा संपले. आता आमच्या कडे अजिबात पाणी नव्हते. अजून गडावर फिरायचे होते. आणि गड उतरायचा होता. सर्वांना तहान लागली होती. सर्वांसमोर आता एकच पर्याय दिसत होता, तलावातील ते शेवाळ्यानें भरलेले हिरवे पाणी बघून सर्वांच्या अंगावर काटा आला. आता काय करायचे. जिवंत राहायचे असेल तर ते पाणी पिण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. मग काय लागलो कामाला, जेवढ्या बाटल्या आणि वॉटरबॉटल होत्या त्या सगळ्या मध्ये ते शेवाळं युक्त हिरवं पाणी भरून आणले. थोडी युक्ती लढवली प्रथम ते पाणी आमच्या कडे असलेल्या रुमालांमधून चांगले २ वेळा गाळून घेतले, ते पातेलं होतच त्यात सर्व पाणी जमा केलं. मग ते पाणी उकळून घेतलं . कोणीतरी हर्षद म्हणाला आपण त्यात आपल्याकडे असलेलं लिंबू पिळुयात म्हणजे त्यात असलेल्या ऍसिड मुले त्यातले जंतू मरून जातील मग ते सुद्धा केलं. अश्या प्रकारे आमच्या कडे पिण्याचा पाण्याचा साठा तयार झाला पण ते पाणी पिण्याची इच्छा होत नव्हती. फक्त थोडं तोंड ओलं करायचं म्हणून थोडं थोडं सर्वांनी पिले. नतंर ते सर्व पाणी परत बाटल्यांमध्ये भरून घेतले. थोड्या वेळाने हत्ती कडा बघायला जायचे ठरले. मी यांच्या सोबत अर्ध्या वाटेत गेलो आणि दमलो म्हणून एका दगडावर बसलो आणि सर्वांना सांगितले तुम्ही जाऊन या मी इथेच थांबतो. हे सर्व जण जाऊन बराच वेळ झाला होता मला तिथे बसून आता बोर झालं होतं. माझ्या कडे दुर्बीण होती त्यातून मी थोडा वेळ बघत बसलो पण नंतर त्याचा पण कंटाळा आला, थोड्या वेळाने अचानक भरदिवसा भीती वाटू लागली आपण इथे एकटे आहोत आजूबाजूला जंगल आहे. एखादा वाघ किंवा बिबट्या आला तर आपलं काय होईल. पण तेवढ्यात हे सगळे पारत येताना दिसले.

परतीचा प्रवास

त्यानंतर आम्ही आमच्या तथाकथित हॉटेल रूम वर परतलो. परतीच्या प्रवासाला लागायच होतं. थोडंफार खाऊ होता तो खाऊन आम्ही गड उतरायला सुरुवात केली. उतरताना सुद्धा बराच वेळ लागणार होता. खाली उतरत असताना काही दुसरे ट्रेकिंग क्रयला आलेले हौशी ट्रेकर्स भेटत होते. बर्याच जणांनी आम्हाला विचारलं अजून किती चढायच बाकी आहे. उतरता उतरता च संध्याकाळ झाली. निम्म्याच्या खाली येई पर्यंत अंधार पडला होता. काही ठिकाणी थांबून विश्रांति घेत असताना आकाशामधे पुन्हा तार्यांकडे लक्ष गेलं, एक चांदणी पुढे पुढे सरकताना दिसली, काही वेळाने अश्या बर्याच चांदण्या आकाशामध्ये संचार करताना दिसल्या आम्ही सगळे ते दृश्य बघून हैराण झालो. पण थोड्या वेळाने माझ्या लक्षात आलं की त्या चांदण्या नसून पृथ्वीभोवती फिरणारे मावनिर्मित उपग्रह आहेत. हो आपण आकाशामध्ये Artificial Satellites नुसत्या डोळ्यांनी बघू शकतो. गड उतरून खाली आलो तेव्हा खाली गावामध्ये दुधाच्या गाड्या, ट्रक, टेम्पो हे सर्व पुण्याच्या दिशेने निघण्याच्या तयारीत दिसत होते. मग आम्ही त्यातल्याच एका टेम्पो वाल्याला विचारपूस करून त्याच्या टेम्पो मध्ये बसलो आणि पुण्याला परतलो. अश्या प्रकारे आमची राजगड ट्रिप विविध अनुभवांनी भरलेली होती आणि आम्ही खूप एन्जॉय केलं.

गौरव बाबर

पुणे

Facebook Comments

Share this if you like it..

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हुप्प्या – The Symphony of Emotions
A Team outing with a difference @ Nisargshala
Blog posts & Event Alerts

Recent Articles
  • In Astronomy, STar gazing
    निसर्गशाळा येथे दहा इंच व्यासाचा मुख्य आरसा असलेली दुर्बीण आहे. यातुन आपण गुरुचे उपग्रह पाहु शकतो, गुरु ग्रहावरील वादळ पाहु शकतो, अनेक दुरस्थ तारे, तारकापुंज पाहु शकतो, चंद्र तर इतका सुंदर आणि स्पष्ट दिसतो की त्यावरील खड्डे नसुन महाकाय विवरं आहेत, दया आहेत, त्यांना खोल असे कडे आहेत. एकदा आपल्याकडे एक खगोल निरीक्षक त्यांची १६ इंच व्यासाची दुर्बीण घेऊन आले होते , त्यातुन त्यांनी मला चंद्रावरील अश्याच एका विवराचा कडा दाखवला. हा कडा पाहताना मला हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा आठवला. लौकरच आपण म्हणजे निसर्गशाळा बारा इंच व्यास असलेली अजुन प्रगत अशी दुर्बीण घेणार आहोत. […]
  • In Environment
    महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या. दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली. […]
  • In Environment
    म्हणजेच काय तर आपला भारत आणी भारतातील प्रत्येक पर्वत (हिमालय अपवाद) तितकाच जुना आहे जितके पृथ्वीचे वय आहे. येथील मातीचा कण न कण असा का झाला याचे कारण या मातीने इतक्या करोडो वर्षाम्च्या अनुभवातुन हे शिकले आहे की या सुर्यमंडलात, या अवकाशात तग धरायची असेल तर त्यासाठी कसे स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. […]
  • In Environment
    पर्यावरण हा शब्द आपल्या कानी पडला की काही जण थोडं थबकतात, काही जणांच्या भुवया थोड्या उंचवतात, काही जणांचे कान अजुन जास्त सतर्क होतात तर काही जणांना काहीही समजतच नाही काय ऐकलं ते म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे काही जणांच्या बाबतीत घडत असते. […]
  • In Music, Tourism
    मग सुरु झाली संगीत रजनी. गायत्री सप्रे-ढवळे आणि कुमार करंदीकर यांनी रसिक श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात , स्वर्गीय सुखाची रेलचेल असणा-या चंद्रमाधवीच्या प्रदेशात नेण्याचा जणु चंगच बांधला होता जणु. हा प्रवास, चंद्रमाधवीच्या प्रदेशाकडे जाण्याचा हा प्रवास संगीत सुरांचाच नुसता नव्हता बर का ! […]