Exploring Rayling & Camping

नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं ।

अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात ॥

रायलिंग पठार

रायलिंग पठार

तसा मी रोमॅंटीक वगैरे नाही, आणि नाही कधी वरील गाणे मन लावुन ऐकले किंवा पाहीले आहे. पण नभातुन वाहणारे मेघ जेव्हा माझ्या अंगावर आले तेव्हा ह्या गाण्याच्या ओळी उस्फुर्त पणे आठवल्या. काळ कितीही पुढारलेला असला तरी सार्वजनिक जीवनात प्रेमास्पद आणि प्रेमिका (पती पत्नी देखील) प्रेमभावनेची अभिव्यक्ति करणे जड जाते, हे आपल्या अंगवळणी नाहीये अजुन. हा सहज प्रेम भाव म्हणजे नुसत प्रेमीका आणि प्रेमास्पद यांच्यापुरताच मर्यादीत आहे का?

खरतर प्रेम या विषयावर लिहिण्याचा माझा अधिकार कितपत आहे हे ,मला ठाऊक नाही. तरीही निसर्गाच्या सदोदीत सानिध्याने , पुर्वी केलेल्या थोड्याफार वाचनाने आणि जगतानाच्या कडुगोड अनुभवाची शिदोरी संगतीला घेऊन, धाडसाने इथे या अगम्य विषयावर लिहिण्याचे धाडस करीत आहे.

१४०० वर्षे तपश्चर्या करणारा वटेश्वराचा सुत, चांगदेव अंहकाराने ग्रासला, व मीच श्रेष्ठ आहे हे सिध्द करण्याच्या लालसेने ज्ञानेश्वरांना आव्हान करता झाला. कथा सर्वांना माहीत आहेच. कथेच्या तपशीलामध्ये आपणास जाण्याची आवश्यकता नाही, माऊलींनी चांगदेवास उपदेशपर केलेल्या लिखाणात अद्वैत मताचे अतिशय सुलभ आणि बालबोध उदाहरणाद्वारे विवेचन केले आहे. त्या अभंगांमध्ये अद्वैत वेदांत ठासुन भरलेला आहे. प्रत्येक अभंग आपणास द्वैताच्या पल्याड नेण्यासाठी समर्थ आहे. वाचकांनी अवश्य अभ्यासावा असा हा श्लोक संग्रह आहे. त्यातील एक अर्धी ओवी इथे मुद्दाम मांडतो.

तेंवि तूंतें मी गिवसी तेथें तूंपण मीपणेंसी उखते पडे ग्रासीं भेटीचि उरे

उरीभेट, म्हणजे गळाभेट झाल्यास “मी”पण आणि “तु”पण ग्रासले जाऊन गळुन पडते थोड्याशा या आशयाची ही ओवी आहे. उभय म्हणजे दोन, म्हणजेच द्वैत. हे द्वैत जर गळुन पडत असेल तर आपण ही खुशाल समजावे की आपण माउंलीच्या उपदेशाचे पाईक आहोत.

A walk through clouds

A walk through clouds

प्रसंग असा होता की आम्ही पुन्हा एकदा सह्याद्रीच्या अप्रतिम अद्वीतीय अवर्णनीय अशा ठिकाणी नुकतेच पदभ्रमण करुन पोहोचणार होतो. तशी ट्रेकींग करताना पायाखालची वाट तुडवत आपण जात असतो. पण यावेळी असे नव्हते. पायाखालची वाट असंख्य अशा नाजुक, लोभस, सुंदर छोट्या छोट्या निसर्गाविष्काराने भरलेली होती. नुसती पायवाटच नाही तर, जिथवर नजर जात होती तिथवर नजाकत निसर्गाच्या प्रत्येक घटकामधुन ओथंबुन वाहात होती. लव लव कणारी गवताची पाती, कधी त्या गवताच्या पात्यांवर अलगद अडकुन पडलेला एकच पाण्याचा थेंब, कधी कधी त्याच गवताच्या पात्यांवर इवलीशी गोगलगायी चिकटुन आणखी उंची गाठण्याच्या यत्नात , कधी एखादा गांडुळ पायवाट मध्ये आडवा पडलेला दिसतो व सरपट तो पायवाटेच्या पलीकडे जाण्याचा प्रयतन करीत असताना दिसतो. कधी पायवाटेच्या बाजुच्या हिरवाईतुन एखादे फुल पायवाटेवर डोके वर काढुन , हसुन आमचे स्वागत करताना दिसते. बर फुल एक  न दोन , असंख्य प्रकारची असंख्य म्हणजे मिजता येणार नाही एवढी फुले, नव्हे नव्हे फुलांचे गालिचेच सर्वदुर पसरलेले. कधीही पाहीले नसतील असे छोटे छोटे बेडुक, मधमाश्या, सापसुरळ्या, सरडे आणि हे सगळे होत असताना, नभातील ढग तरी का नभातच राहतील. नभ देखील उतरले होते. क्षणक्षण धुंदल्या सारखे व्हायचे. पावलापावलावर येथील कळ्या, फुले, पाने, वेली, गवत , प्राणी नव्हे सगळी सृष्टीच एका सुमधुर संगीताच्या तालावर एका लयीत धुंद झाल्यासारखी भासत होती. आता मला सांगा ही वाट काय तुडवायची आहे? नक्कीच नाही. अगदी हळुवारपणे आम्ही एक एक पाऊल आमच्या ध्येयाकडे टाकीत होतो. शेवटच्या वळणावर समोरचा दांड हळु लहान होत होता. एका क्षणी त्या दांडाच्या पलीकडे आकाशाला गवसणी घालणारे एक डोंगराचे टोक दिसु लागले. प्रत्येक पावलागणिक त्या डोंगराची उंची देखील वाढु लागली. आम्ही त्या डोंगराच्या, नव्हे सुळक्याच्या दिशेने त्याच्या जवळ जवळ जात होतो. हा एक किल्ला आहे. लिंगाणा नाव आहे ह्या किल्ल्याचे. जसे जसे आम्ही लिंगाण्याच्या अलीकडच्या पठाराच्या कड्याकडे पोहोचत होतो तस तशी ही धुंदी आणखी वरच्या पातळीवर जात होती. क्षणात वा-याचे झोत येऊन समोरच्या तसेच डाव्या आणि उजव्या बाजुच्या द-यांचे ओघवते दर्शन घडत होते. आणि दुस-याच क्षणात तीच धुंदी पुन्हा सर्व चराचर व्यापुन टाकीत होती. समोर जे काही घडत होते ते सर्व नाट्यमय आणि प्रचंड उर्जा प्रदान करणारे होते. नभ उतरलेले होते, ते म्हणजे नभ आणि सभोवार चिंब ओले झालेले होते, आणि अंग झिम्माड झाले होते रायलिंगाच्या हिरव्या बहरात.

लिंगाणा किल्ला

लिंगाणा किल्ला आणि झिम्माड पणा

मी जे काही अनुभवत होतो ते स्वर्गीय होते, अलौकीक होते. आम्ही अंदाजे एक ते सव्वा तास रायलिंगावर घालवला. वा-याच्या झोतांसोबत मध्येच ढग नाहीशे होत आणि समोर, पश्चिमेकडे बा रायगडावरील जगदीश्वराच्या प्रासादाची गगनचुंबी शिखरे दिसत. अजुन उजवी कडे पाहिल्यावर सह्यगिरीची असंख्य शिखरे, आकाशात झेपावताना दिसत, त्यामध्ये प्रकर्षाने दिसले ते कोकणदिवा, रायलिंग माची. लिंगाणाच्या कधी डावीकडुन ढगांचे लोट येत तर कधी उजवीकडुन व अर्धा अधिक लिंगाणा, शिखर सोडुन, ढगात जाई. व लिंगाण्याचे शिखर म्हणजे टोक मात्र तसेच अधांतरी तंरगताना दिसे. हे दृश्य काही फार लांब नव्हते. एक दोन पावले पुढे जाऊन लिंगाण्या च्या टोकाला हात लागेल की काय इतका जवळ होता लिंगाणा आमच्या समोर.

कॅम्पसाईटवर माघारी वेळेत, अंधारण्यापुर्वी जाणे गरजेचे होते. आमच्यापैकी अनेकांना तर इथुन माघारी जाण्याची इच्छाच होईना, अगदी मला ही. कित्येकांनी मला परतीच्या प्रवासात विचारले की आपण रायलिंग पठारावरच टेंट लाऊन मुक्काम का करीत नाही. त्यांना समजावुन सांगावे लागले की, मुक्कामामुळे आपण निसर्गातील “त्या” सौहार्दामध्ये (धुंदी मध्ये) व्यत्यय निर्माण करण्याचा धोका जास्त आहे. मंडळींना हा विचार पटला देखील व आवडला देखील.

The participants

The participants

कॅम्पसाईटकडे परतताना, त्या धुंदीचा, नभाचा, झिमाड अंगाचा आणि हिरवाईचा  विचार डोक्यात डोक्यात आला. माझ्यासाठी माझ्या सोईने मी या सा-या विचारांना एका सुत्रात बाधण्याचा प्रयत्न करु लागलो.

हा हिरवा बहर खरच इतका मोहीत करतो की इथे आल्यावर माझे अंग झिम्माड होते म्हणजे माझे मीपण गळुन पडते. माझ्यातील देहबोध नाहीसा होत जातो. व मी एक आणखी उच्च अशा अनुभुतीच्या पातळीवर जातो जिथे द्वैत राहत नाही. माझ्यातील मी एका खुप मोठ्या प्रवासास निघतो. तो दृश्य अदृश्य अशा अनेक वस्तुंना स्वतमध्ये सामावुन घ्यायला सुरुवात करतो. माझ्यातील मी मोठा व्हायला सुरुवात झालेली असते. समोर दिसणा-याअ सर्व चल अचल चराचरास तो सामावुन घ्यायला सुरवात करतो. आधी मला अनुभुती होते की हे ह सभोवातीदिसणा-या निखळ सुंदर अशा निसर्गाच्या मधुन पावले टाकत टाकत चालणारा हा देह, हे शरीर म्हणजे मी आहे, नतर, ती लवलवणारी गवताची पाती म्हणजे “मी” आहे अशी अनुभुती होऊ लागते, नंतर ती पान, फुल, फुलपाखर, प्राणी, हवा पाणी, ढग, ढगांमधील तुषारविंदु, डोंगर, द-या, दगड हे सगळे एकसंध, एकजीव एकात्म असल्याची अनुभुती होते.

कोकणादिवा

कोकणादिवा

आणि हा एकात्मभाव जेव्हा अनुभवास येतो तेव्हा “मी” पण संपते. आणि मग ती धुंदी, एकतानता, सौहार्द अनुभवास येते. या अनुभुतीच्या उच्च पातळीवर मी नसतो. तिथे तु नसतो. तिथे “असणे” च नसते. आणि “नसणे” देखील नसते.  तिथे असते फक्त सौहार्द, सामंजस्य. हे सामंजस्य उस्फुर्त, निसर्गदत्त असते. ओढुन ताणुन आणलेले नसते. आणि जिथे असे सौहार्द असेल तिथे अपाय होईलच कसा? आणि म्हणुनच आमच्याकडुन पायाखालची वाट तुडवली गेली नाही. आम्ही स्वतच वाट झालो होतो. लिंगाण्याला मिठी मारुन आलेले ढंगामधील तुषार आमच्या रंध्रा रंध्रात अविरत आरपार जात होते, बाहेर येत होते. “मी” राहीलोच नाही. फक्त निसर्ग होता. फक्त निसर्ग.

तेंवि तूंतें मी गिवसी तेथें तूंपण मीपणेंसी उखते पडे ग्रासीं भेटीचि उरे

माऊलींनी यापेक्षा आणखी वेगळा उपदेश केलाय असे मला तरी वाटत नाहीये. दैनंदीन जीवनात ह्या एकात्मभावाचा अनुभव घेता येणे शक्य आहे का? दैनंदीन जीवनात अनुभुतीच्या अशा उच्च पातळीवर आपणास जाता येईल का? दररोज माझे ज्या व्यक्तिशी व्यवहार (बोलणे चालणे देणे घेणे)  होतात काय ती व्यक्ति निसर्गाचा घटक नाहीये का? मी देखील निसर्ग आहे व ती व्यक्तिदेखील निसर्ग आहे. आम्हा दोघांमधील दोघेपण लोप पावुन एकपण जर आले, तादात्म्य जर आले, सौहार्द जर आले तर कुणासही अपाय कसा होईल? प्रेमी(म्हणजे प्रेम करणारा किंवा करणारी) आणि प्रेमास्पद (ज्या व्यक्तिवर प्रेम करतो ती व्यक्ति) या दोघांमध्ये अभेद निर्माण होणे, एकात्म भाव निर्माण होणे म्हणजे खरी प्रेमाची फलशॄती होय. अध्यात्म यापेक्षा वेगळे ते काय आहे. लौकीकात ज्या प्रेम हा शब्द वापरला जातो, तो अर्थ जरी गृहीत धरला तरी आज प्रत्येक स्वतःच “मी” आपल्या प्रेमास्पदाच्या “तु” मध्ये विलीन करुन, स्वतःच “मी” मोठा करण्याची संधी आहे. व हा मी उत्तरोत्तर वृध्दींगत होऊन त्याने समष्टीमध्ये विलीन झाले पाहीजे, त्यानंतर सृष्टी , नंतर परमेष्टी मध्ये रुपांतरीत झाले पाहीजे. थोडक्यात काय तर प्रेम म्हणजे प्रेम असत वाल प्रेम ही अध्यात्माची पहीली व शेवटची पायरी आहे. व सगळा प्रवास होतो निसर्गामधुन. आपणास फक्त एकच भान ठेवायचे असते, ते म्हणजे पायाखालची वाट तुडवायची नाही. अलगद, हळुवार, मृदुल पावले टाकीत आपल्या सहचरांची काळजी घेत त्या गगनचुंबी ध्येयावरील नजर न हलवता  , धुंद होऊन मार्गक्रमण करीत राहायचे असते.

हेमंत ववले,

निसर्गशाळा, पुणे

टिप – या सहलीचे सर्व फोटोस पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…

रायलिंग फोटो अल्बम

 

Facebook Comments