होळी दोन दिवसांवर आली..

Share this if you like it..

राठातुन समदी लाकडं आणली. होळीला अजुन दोन दिस बाकी होतेच. गायी गुरांच्या माग जायची गरज नसते ह्या दिवसात. कारण कुणाच्या बी शेतात काहीपण नसायचे. त्यामुळे गुर मोकार सोडुन द्यायची आणि गोपाळांनी सुध्दा पुढचे दो चार मास मोकार उंडरायचे असा नेम होता हिकड.

सांज वेळी लवकर परबती आन त्याच्या माय ने समद्या गायी गुरांच्या धारा काढल्या. वासरांला पोटभर पाजल. परबतीकडं ७ वासरं, १० गाया अन ४ बैल अशी एकुण २१ गुरं. त्यातल्या त्यात मो-या गायीचा नवीनच गो-हा, जेमतेम ४-५ महिन्यांचा आसन, त्या गो-ह्याचा आन परबतीचा चांगलाच जिव्हाळा. परबतीन त्याच नाव माणक्या ठिवलं. दोन महिन्यांपुर्वी परबती समद्या गुरांसंगट माणक्याला बी न्यायचा रानात चरायला. समदी गुरा कुठजरी असली तरी माणक्या मात्र परबतीची पाठ काय सोडायचा नाय. परबती जिकड जाईल तिकड माणक्या यायचा. अवतीभवती जे काय गवत काडी मिळल तेवढ चघळायचा.

पशुपालक धनगर सवत्स धेनु

माणक्याचा जन्म झाला तेव्हा माणक्या ला गायीला चिक पिता येत नव्हत . माणक्या एवढा अवखळ होता की तो गायीच्या कासमदी कुठ बी हुंदके द्यायचा आन नेमक गायीचा सड काय तोंडात धरायचा नाय. परबतीन एक युकत केली होती त्या वेळी. परबतीन स्वतच्या हातावर गायीच्या चिकाच्या दोन तीन धारा मारल्या अन ती चिकान माखलेली व चिकट झालेली बोट त्यानं माणक्याच्या तोंडात घातली. चिकाची चव का जशी माणक्याच्या जीभला लागली तशी माणक्या लागला की परबतीच बोट तोंडात धरुन वढायला. माणक्याला दात एक बी नव्हता पण त्याच्या हिरड्या सुध्दा मोठ्या कडक. पुढच्या काही वेळात माणक्याच्या तोंडातुन बोट काढल नाय तर बोट फाटायच माणक्याच्या तोंडातच. परबतीनं पटकन त्याचा हात गायीच्या सडापाशी आणुन, दुस-या हाताने हळुच माणक्याच्या तोंडात, दुस-या बाजुने गायीच सड टाकला. सडाला परबतीने आधीच चिक बाहेरुन फासला होता. चिकाची चव जशी पुन्ह्यंदा माणक्याला लागली तसा माणक्या गायीचा सड चोखु लागला, तसा सडातुन आजुन चिक त्याच्या तोंडात गेला. माणक्याला आता समजल होत गायीला प्यायच असल तर कुठ आन कस प्यायच.

परबतीन चार वासर पाजली आन त्याच्या आईन बाकीची. एकेक वासरु पाजुन झाल की धारा काढायच्या. रानातला हिरवा चारा संपला असल्याने घरी दुध दुभत बी कमी झालेल. समद्या गाया मिळुन परबतीकडं दहा शेर दुध निघाल. स्वच्छ भांड्यात दुध भरुन ते भांड घराबाहेर टांगुन ठेवायच आन सकाळी सकाळी पांढरीवर जाऊन पाटील कुलकर्ण्याच्या घरी दुध घालायच. पांढरीवरचा रतीब देऊन सुध्दा परबतीच्या घरी ५-६ शेर दुध शिल्लक राहायचच. त्याची आई, मग राहीलेल्या दुधाच दही, लोणी तुप असा काढी. पुनवच्या आसपास येल्यावरुन काश्या गुजर तुप इकत घ्यायला यायचा. आख्ख्या गुंजण मावळात आणि कानद खो-यात असे व्यापारी तुप इकत घ्यायला फिरायचे. परतेक धनगर पाड्यात जाऊन खरेदी-विक्री व्हायची. कदी मदी सणसुद आला की रतीब बंद आणि तुप बी बंद. सगळच्या सगळ दुध गडावर पाठवाय लागायच. त्याच्या बदल्यात सरकार न धनगरास्नी इनामी जमीनी दिल्यात जागजागी. त्यात भात, नाचणी, व-ही अशी पिक पावसकाळ्यात धनगरं घेतात.

धारा काढुन झाल्यावर परबती बाहेर येतो न येतो तोच, लक्षुमन मोठ्यान वरडला. “ये परबती, गुजर आलाय, तुला बोलीवलय रं”. आईन सुध्दा तो आवाज ऐकला आणि लगेच परबतीला म्हणाली.

“हे बघ, तुझा बाबा व्हता तवा, गडाची वरदी असताना गुजराला तुप इकायचा नाय. तु जा अन गुजराला सांग की तुप गडाव द्यायच हाये, पुढच्या खेपला देतो आमी तुप म्हणुन”

“व्हय”, म्हणुन परबती लक्षुमनाच्या वटीवर आला. आज्ज्या तिथच बसला व्हता. गुजराचा चेहरा आधीच पडला होता. परबतीच्या लक्षात आल नक्की काय झाल असणार तिथ. परबती तिथ गेल्या गेल्या गुजर सुरु झाला. म्हणाला,”परबती आता तुच सांग गड्या, म्या इक्त्या लांबुन आलोय ते काय आस रिकाम्या हाती जाऊ का र?”. परबती पोचायच्या आधीच आज्ज्यानं गुजराला काय सांगायचे ते सांगितला होतं. परबतीनं सुध्दा त्याच्या आई ने सांगितलेलच गुजराला सांगितला. गुजराचा नाविलाज झाला. चंद्र उगवला होता. जेवणाची येळ झाली होती. परबतीन गुजराला आन त्याच्या संगटच्या दोन माणसांना स्वतच्या केंबळात जेवायला नेल. आज्जा पण आला. समद्यांनी जेवण केल आन गुजर त्याची माणस आणि त्याचे दोन घोडे माघारा गेळगाणीच्या वाटेने येल्याला निघुन गेले.

दोन दिवसावर शिमगा आला होता. पाड्यावरची होळी तर तयार होती. किल्ल्यावर जाऊन दही दुध तुप सरनायकांस द्यायची जिम्मेवारी परबतीवरच होती. परबती, त्याची आई आणि लक्षुमनाची आई अशी तीन माणसे शिमग्याच्या दिशी गडावर समद घेऊन जायच ठरल.

Facebook Comments

Share this if you like it..

One thought on “होळी दोन दिवसांवर आली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *