स्वराज्य तोरण चढे….

Share this if you like it..

सांगावा आला. दरसाल असा सांगावा येत असतो. पण परबतीचा बाप, म्हंजी राघु जीता असेपर्यंत त्याला कधीबी सरकार च्या असल्या कामकाजाची फारशी माहीती नव्हती. त्याचा बाप म्हंजी राघु आजपर्यंत आख्ख्या वस्तीमधील दुधं, वाड्यावाड्यात फिरुन मोजुन मापुन गोळा करायचा आन, दो चार गडी सोबत घेऊन गडावर घेऊन जायचा. एवढच काय ते परबतीला ठाउक होत. पण आता बाबा नव्व्हता म्हणुन गडावरुन सांगावा परबतीच्या नावान आला होता.

स्वराज्य तोरण चढे..

स्वराज्य तोरण चढे..

परबती ल्हानच अजुन, १० – १२ वरसांचा आसल. परबतीला मागच्या सालातली होळी आठवत होती. मागच्या साली होळीच्या आठ एक दिवस आधी परबती, गणु, लक्षुमन आन भिकु अशी वस्तीवरची मोजुन चारच पोर कु-हाडी, रस्स्या, इखानं घेऊन राठात गेलती. वाडवडलांपासुन हे असच चालत आलय परबतीच्या वस्तीव. मागच्या साली वस्तीवर कर्ती माणस कुणीच नव्हती होळीच्या सणाच्या वेळेस. लक्षुमन चा आज्जा तेवढा होता. आज्जानं पोरांना अस लगबगीन पाड्यातुन भाईर पडताना पघीतल आन मागन त्यान जोरात मोठ्यान हाकारा दिला.

“ये बिट्यानु, थांबा वईच.”

आज्जाचा आवाज ऐकुन समदी पोर जागच्या जागी थांबली. म्हातारा आता काय म्हुन हाका मारतुय हे पोरास्नी म्हायीत होतच. तरी पोर थांबली.

आज्जा तसा लयी वयीस्कर माणुस वस्तीवरचा. म्हण्जी सगळ्यात जास्ती पावसकाळे ज्यान पघीतल्यास असा माणुस म्हंजी आज्जा. आणि वस्तीवरच्या बाया बापड्या, करती धरती माणस, पोर सोर त्याला ‘आज्ज्या’ म्हणुनच हाक मारायची. फक्त पाच उंबरा असलेल्या वस्तीवरचा सगळ्यात न्यानी आणि जाणता म्हंजी आज्जा. आपसातला तंटा असु नायतर बाहेरच काहीबी असु, आज्ज्याच्या सल्ल्या शिवाय वस्तीवरच पान बी हालायच नाय. मागच्या वरसी देसमुखानी वस्तीवरच्या पुरुस माणसांला कामगिरीवर बोलावण्यासाठी येक गडी घोड्याव बसवुन पाठीवला व्ह्ता. बायी माणुस, बापे, पोर सोर समदी जमली होती लक्षुमनच्या वटीवर. लय मोठ मोठ्या आवाजामदी बोलण झाल होत आणि राघु उठुन तडातडा निघुन गेला होता फडातुन. त्यावेळेस आज्ज्यान त्याला हाक मारली व्हती. आज्ज्याची हाक ऐकल्यावर राघु जागच्या जागी थांबला व्ह्ता आणि तसाच उलटा चालत येऊन फडात बसला होता. कायतरी ठराव झालता त्यावेळेस. आज्ज्याच सबुद म्हंजी धनगर बाबा चा सबुद अस सगळी समजायाची.

आज्जा शंभरीचा घरात आसल , तरीबी तडातडा चालत पोरांपाशी पोचला.

“ कु-हाडी इखाणं घेऊन कुठ चालला रे परबती? ”

परबती ,“आज्जा, माझी माय म्हणाली की आठ दिवसाव होळी आलीये. राठात जाऊन लाकड घेऊन या होळीसाठी, म्ह्णुन हामी राठात चाल्लोय”

“बर बर” म्हणुन आज्ज्यान आपली पुराण कथा सुरु केली. “हे पघा पोरांनो, केळेसुराचा राठ हाये त्यो इसरु नका. तित जित्त्या रुखाव कु-हाड इखाण चालवायच न्हाय. मेलेल्या झाडांच्या फांद्याच तेवढ्या आणायच्या. त्याबी खाली पडलेल्या. जीत्त झाडाला इजा न्हाय करायची. वझी झेपतील यवढीच बांधा. आन अंधार पडायच्या आत माघारा या म्हंजी झालं. ”

येवढ बोलुन आज्ज्यान जरा दम खाल्ला. पोरांला वाटल झाल आज्याच, म्ह्णुन माना हालवुन पोर निघाली. तितक्यात आज्ज्यान आजुन एक बात सांगितली. “अंधार झाला आन तुम्ही दिवटी लावली तर लक्षात ठिवा, त्येची ठिणगी सुकलेल्या गवताव पडता कामा नये. जर ठिणगी पडली तर सारा रान जळुन जाईल. जपुन -हा ”

पोरांनी माग न बघताच हात वर करुन होकार कळवला. पोर चालत उड्या मारत, निघाली राठाकडे. गणु मागच्या साली पहिल्यांदाच चालला व्ह्ता परबती बरुबर. आज्ज्याच न्यान गणु ला नवीन होत. गणु परबतीला आज्ज्याच्या गुजगोष्टी इशयी एक एक शंका इचारीत व्हता आणि बाकीच्या पोरांच्या बरुबरीने -हाण्यासाठी साठी पळत होता. परबती गणुच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देत होता. तास भर चालुन पोर राठात पोचली.

राठ तसा लई मोठ्ठा. ऐसपैस शे सव्वाशे चावर आसल. झाड एवढी मोठी की खाली हुभ राहुन मान वर करुन जर आकाश बघायच म्हणल तर आकाश दिसायचच न्हाय. रुखं झुडपं येलींनी सगळा रान झाकुन गेलेला. परबती आणि पोर ज्या पायवाटेन राठातुन जात होती त्या पायवाटेवर वरच्या झाडांचा वाळलेला पाला पाचोळा पडला होता. पाय ठेवला की कर कर असा आवाज यायचा. दांडानी चालत येताना, तळपायाला दगडं, खडक, खडे, माती अस लागत होत. आणि आता राठात परतेक पावलाला आवाज आणि तळपायाला गुदगुदल्या झाल्यासारख वाटत होत. गणु पहिल्यांदाच वस्तीबाहेर आलेला. त्याला ह्या सगळ्याचे लय आप्रुप वाटत होत. पायवाटेवरचा पालापाचोळा जरी असा आवाज आणि गुदगुल्या करीत होता तरी पायवाटेच्या बाजुला ह्या पाल्याचा भला मोठ्ठा थरच होता. एका क्षणी गणुचा पाय चुकुन बाजुला पडला आणि पावलाचा आवाज आणखी मोठा आला. गणु ला मजा वाटली म्हणुन तो पायवाट सोडुन बाजुनेच चालु लागला. पावलाखालचा वाढलेला पाचोळ्याचा आवाज एवढा मोठा होता की सगळ्यात पुढे चालणा-या परबतीला तो समजला आणि त्याने मागु वळुन हातानेच गणुला पुन्हा पायवाटेवर चालण्याचा इशारा केला.

एका झाडाखाली परबती थांबला आणि खाली पडलेली फुले गोळा करायला सुरुवात केली. काटसायरीच झाड होत ते. झाडाला आक्षी एक बी पान नव्हत. पण आख्ख झाड लालीलाल रंगल होत. राठातली सगळीच सायरीची झाड फुलली होती. पोरांनी खाली पडलेली फुल पसा-पसा गोळा करुन परतेकाचा येगयेगळा ढिग लावुन ठिवला आणि पुढ निघाली. आता मुख्य कामास सुरवात झाली. सापडेल ते सुकलेल वाळलेल लाकुड उचलायच आन एका जागी जमा करायच. तीन मोठाले ओंडके सुध्दा मिळाले. पोरांनी चार मोळ्या बांधल्या. ओंडके वस्तीवर नेण्यासाठी उद्या पुन्हा इकडे यावे लागणार होते, कदाचित पुढचे चारपाच इकडे यायचे होते. आता माघारी निघायच्या आधी परबती पुन्हा त्या फुलांच्या ढिगांपाशी आला. सगळ्यांनी ती फुल निवडली, फुंकर मारुन त्यातली किडा मुंग्या काढल्या. पाकळ्या येगळ्या केल्या. गणुला मात्र हे सगळे नवीन होते. तरी तो सुध्दा त्याच्या परबती ज्याप्रमाणे करीत होता तसच करीत होता. सगळ्यांनी आपापल्या डोक्याची मुंडासी काढली आणि त्याच्या एका पदराच्या कोप-यात त्या सगळ्या पाकळ्या भरल्या. परबतीने सगळ्यांसाठी तिखट मीठ आणले होतेच. त्याने सगळ्याना चिमुट चिमुट वाटले. तिखट मीठ आणि पाकळ्या कापडात गुंडाळुन दगडाने सगळ्यांनी ती पुर्चुंडी ठेचली. सगळा माल मसाला एक जीव होईपर्यंत काळजीपुर्वक ठेचुन, प्रत्येकाच्या कापडात एकेक ओंजळ भरेल एवढा मेवा तयार झाला होता. संगमावरच्या वाघजाईला एकेक चिमुट निवद देऊन पोरांनी दोन दोन तोबरे भरुन पटापट मेवा संपवला. गणु ची पहीलीच वेळ असल्याने तो आणखीच खुष झाला. बांधलेल्या मोळ्या डोक्यावर लादुन पोर राठाच्या बाहेर आली. राठाच्या बाहेर आल्यावर त्यांना समजल की दिस मावळाय आला होता. राठामदी दिवसभर अंधारच असतोय कारण झाडच लयी तिथ. पुढचे चारपाच दिस पोरांनी अशा त-हेने होळीसाठी लाकड आणली. होळी ची उंची वाढत वढत जाऊन पेंढ्याच्या गंजी येवढी झाली होती.

“परबती, काय इचार हाय मंग तुझा? उलटा सांगावा काय द्यायचा सरनायकांस? ”, आज्ज्याच्या आवाजान परबती जुन्या आठवणीतुन बाहेर आला. परबतीला काहीच माहीत नव्हते गडाचा राबता काय असतो ते. परबतीच्या बापासोबत कामगिरीवर गेलेली करती माणस अजुन माघारी आलेली नव्ह्ती. गडावरच्या होळीसाठी दुध दही गडावर सालाबाद प्रमाणे न्यायचे कामाची जबाबदारी परबतीवर आली होती.

परबती मोठा झाला होता.

Facebook Comments

Share this if you like it..

3 thoughts on “स्वराज्य तोरण चढे….

 1. Amogh

  …अप्रतिम . जुन्या काळाची सफर ३ मिनिटांत .
  याचे भाग आहेत का?

  1. Hemant Post author

   धन्यवाद.हो याचे क्रमशः भाग आहेत. तुम्ही जर होम पेज वरुन इमेल ॲड्रेस टाकुन सबस्क्राईब केले तर नवीन भाग पब्लिश झाला की लगेच तुम्हाला इमेल मध्ये नोटीफिकेशन मिळेल.

 2. निखिल

  नेहमप्रमाणेच अप्रतिम आणि उत्कंठा वाढवणारे लेखन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *