रंगपंचमी आपली आणि सह्याद्रीची सुध्दा..

Share this if you like it..

कालच संत ज्ञानेश्वर माऊलींच्या काही ओव्या वाचनात आल्या. त्यातील काव्यात्मकतेचा भाग , म्हणजे लक्ष्यार्थ जरी सोडला तरी माऊलींना ऋतुचक्रातील बारकावे अगदी व्यवस्थित माहीती होते हे समजते. अर्जुनाच्या उदासवाण्या, खिन्न, ग्लानी आलेल्या मनाचे वर्णन करताना माऊली ही ओळ लिहितात..

का उचलिले वायुवशे, चळे शुष्क पत्र जैसे, निचेष्ट आकाशे, परिभ्रमे ॥

 

काहीदिवसांपुर्वी सह्याद्री घाटमाथ्यावर उन्हाळ्याची चालुल लागलीये. वाळलेली पाने वा-यावर स्वार होऊन आकाशामध्ये इकडुन तिकडे जाताना दिसताहेत. अधुन मधुन वावटळ (छोटे चक्री वादळ) येते आणि सोबत धुळीचा लोट आकाशामध्ये घेऊन जाते. सर्व काही सुकुन चाललय. झाडे निष्पर्ण होताहेत. एरवी दिवसभर भिरक्या घेणारे छोटे मोठे पक्षी देखील फक्त सकाळ संध्याकाळीच दिसतात. इतरवेळी जिथे दाट झाडे आहेत तिथे मात्र झाडांखाली अजुन सावली आहे. ही पानगळ पुढचे अजुन काही आठवडे सुरुच राहणार.

अहिन/ऐन झाड निष्पर्ण झाल्यावर कसे दिसते हे एखाद्यास माहीत नसेल तर त्याला सह्याद्रीतील सर्वच्या सर्व अहीनाची झाडे एकाच वेळी उभ्या उभ्या मेली की काय असा प्रश्न पडल्यावाचुन राहत नाही. त्याची साल आधीच गडद काळपट रंगाची असते, त्यातच एक ही पान नाही. आणि त्याच्या फांद्या, उपफांद्या अगदी जिथे पाने होती तिथपर्यंत, फक्त ह्या फांद्या, जाडी कमी कमी होत गेलेल्या…फक्त लाकडाचा सांगाडाच ठेवलाय असा भास होतो. अहिना प्रमाणेच अनेक वृक्ष जुनी शुष्क पाने सोडतात किंबहुन पाने गळुन पडतात. वाळलेले पान पडणारच. कस आहे ना सृष्टीचा नियम! ते पान स्वतः गळुन पडु नये म्हणुन धडपडताना दिसत नाही की तो वृक्ष देखील त्याचे शुष्क झालेले पान “माझे पान” म्हणुन धरुन ठेवीत नाही. ते पडणारच. कदाचित त्या झाडास हे ऋतु चक्र पक्के ठाऊक आहे. त्याला हे ठाउक आहे की ह्या पानगळी नंतर रंगांची उधळण होणार आहे. नवी पालवी आणि नवे रंग आसमंता मध्ये उधळले जाणार आहेत. 

केशरी पळसाचे बहरात आलेले झाड . फोटो - वृक्षमित्र अनिल गाडवे

केशरी पळसाचे बहरात आलेले झाड . फोटो – वृक्षमित्र  अजिंक्य गाडवे

जस जसा मी निसर्गाच्या सानिध्यात जास्त वेळ घालवत आहे तस तसे मला नवनवीन साक्षात्कार होताहेत असे वाटतेय. जाता येता मी जिकडे राहतो तिकडे आणि शहरात देखील कमी प्रमाणात का असेना निसर्गाचे रंगरुप आहेच. पण फरक इतकाच की आपण कधी त्याकडे लक्ष देत नाही. लक्ष न देण्याचे कारण ही तसेच आहे. जीवघेणी स्पर्धा. सगळी कडे स्पर्धा. ऑफीसच्या कामात स्पर्धा, जेवताना स्पर्धा, ऑफीसच्या गेट मधुन गाडी बाहेर काढताना स्पर्धा, रस्त्यावर स्पर्धा, सिग्नलाला न थांबण्याची स्पर्धा, सिग्न्नलला थांबलोच तर डाव्या बाजुन गाडी हळु हळु थोडी आणखी पुढे काढण्याची स्पर्धा, गाडी चालवताना समोरुन बेफाम गाडी चालवत येत असेल तर, त्याला वाचवण्याची स्पर्धा, मध्येच घरच्यांनी काहीतरी आणायला सांगितलेले असते पण आठवत नसते, ते आठवण्याची स्पर्धा, नुसती स्पर्धा. एवढ्या सगळ्या स्पर्धांमध्ये कस शक्य आहे रस्त्याच्या बाजुला उभ्या उभ्या असलेला डेरेदार केशरी रंगाने बहरलेला पळस दिसण्याची? सुतराम शक्यताच नाही. पण ज्यावेळी निसर्गात असतो तेव्हा मात्र कसलीही स्पर्धा नसते. तिकडे फक्त निवांतपणा आहे. निसर्गात सगळे निवांत आहे. झाडे निवांत, पक्षी निवांत, प्राणी निवांत, किडा मुंग्या देखील निवांत. मग काय मी सुध्दा निवांत होऊन जातो तिकडे असल्यावर. तिथे कुणालाच घाई नाहीये. कुणालाच उद्याची चिंता नाहीये. सगळे अगदी व्यवस्थित पणे सुरु आहे (माणसाने वणवे लावणे सोडुन). माणसाने निसर्गाच्या चक्रामध्ये हस्तक्षेप नाही केला तर निसर्ग त्याची काळजी घ्यायला आणि सोबत माणसाची सुध्दा काळजी घ्यायला सक्षम आहे.

असो. आज माझी दोन्ही मुले धुलवडी निमित्त रंग खेळली. एकमेकांना, मित्रांना रंग लावणे. सगळा घोळका मिळुन एकालाच गाठायचे आणि भरपुर रंग लावायचे. तसेच जो तावडीत सापडलाय तो थोडा वेळ प्रतिकार करतो आणि मग मनसोक्त रंग लावुन घेतो. रंग लावण्यात आणि लावुन घेण्यात मजा आहे. स्वतच स्वतःला रंग लावुन मज येईल का हो? नाही. तर रंग दुस-याच्या आयुष्यात उधळायचे असतात. दुस-याचे जीवन विविध रंगांनी भारुन टाकायचे असते. किती भारी आहे आपली संस्कृती.

आम्ही मात्र मोठे झालो. गाडीवर बसुन ऑफीसपर्यंत येताना, विविध विचार डोक्यात आले. आज  मी स्पर्धेतुन माघार घेतली. अगदी निवांत गाडी चालवत निघालो ऑफीस ला. वाटेत अनेक ठिकाणी मुल मुली, तरुणाई रंग खेळताना दिसली. आणि सोबतच गाडीचा वेग कमी असल्याने, रस्त्याच्या आजुबाजुला सुध्दा लक्ष गेले. अनेक झाडे की जी विविध रंगांच्या फुलांनी अक्षरक्षः बहरली आहेत, अशी मला दिसली. निमशहरी भाग असल्याने अशा झाडांची संख्या विरळच. तरीही एखादे दुसरे झाड दिसले तरी डोळ्यांचे पारणे फिटल्यासारखे वाटले. मग मला आठवले वेल्ह्यात मागच्या दोन तीन आठवड्यात मी पाहीलेली निसर्गाची रंगांची उधळण. ऑफीसमध्ये पोहोचल्या बरोबर लगेच लॅपटॉप मधील मागच्या एक दोन आठवड्यातील सगळेच्या फोटो शोधले आणि त्या फोटोंकडे बघत बसलो. काय ती निसर्गाची किमया!! 

पानगळीनंतर किंवा काही झाडांच्या बाबतीत पानगळ सुरु असतानाच, येणारा फुलांचा बहर म्हणजे नवनिर्माणाची चाहुल आहे. एकेक कळी स्वतःच्या हृद्यामध्ये, भविष्यातील आणखी मोठाले वृक्षाचे स्वप्न घेऊन आलेली असते. पण हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचे असेल तर परागीभवन झाले पाहीजे. आणि परागीकरणासाठी मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी झाडे नाना प्रकारे शृंगार करीत असतात. त्यातलाच एक भाग म्हणजे फुलांचे रंग, पाकळ्यांचे आकार, दरवळणारा सुगंध, इत्यादी. ह्याला वृक्षाचे शहाणपण नाहीतर काय म्हणायचे?

अजुनही निसर्गामध्ये हा वसंतोत्सव सुरु आहेच. तुम्हाला तो प्रत्यक्ष बघायचा असेल तर स्पर्धा सोडा आणि निवांत व्हा. जमल्यास निसर्गात (म्हणजे शहरापासुन दुर) जा. दिसेल तुम्हाला देखील.तुर्तास ही फोटो गॅलरी पहा, प्रत्येक फोटोतील बारकावा पहा, आणि निसर्गाची ही रंगपंचमी पाहुन आनंदीत व्हा. 

 

 

 

Facebook Comments

Share this if you like it..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *