संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा….

Share this if you like it..

संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा….

 

 हा चंद्र ना स्वयंभू,रवितेज वाहतो हा |ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा ||

 

जे न पाहे रवी ते पाहे कवी असे आपण नेहमीच ऐकतो, वाचतो. इथे कवी ने नुसती कविकल्पनाच केली नाहीये तर, या कविकल्पनेतुन एक खगोलीय सिध्दांत देखील व्यवस्थित मांडला आहे.

नुकते ३१ जानेवारीला संध्याकाळी , झालेल्या चंद्रग्रहणाने आबालवृध्दांना उत्साहीत केले होते. जगभरातुन अब्जावधी लोकांनी हा स्वर्गीय नजारा पाहीला, अनुभवला. सोशल मीडीया च्या वापरामुळे सध्या या व अशा अनेक घटनांविषयी जागरुकता आजकाल वाढताना दिसते आहे. यातुन आपल्या समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पुनः प्रवेश होताना दिसतो आहे. चंद्रग्रहणापुर्वी किमान एक महीनाभर तरी आधी या आकाशीय घटनेची वार्ता सर्वदुर पसरली होती. सगळेच जण आपापल्या परीने, शहरापासुन शक्य  तितक्या , प्रकाशप्रदुषणापासुन दुर, ग्रहण सुरु होण्याच्या किमान एक तास तरी आधी पोहोचले होते. भारतामध्ये हजारो ठिकाणांहुन लाखो लोकांनी हे ग्रहण पाहीले. फेसबुकच्या माझ्या मित्र यादीतील अनेकांनी या ग्रहणाची छायाचित्रे प्रकाशित केली. मी देखील हा आकाशीय सोहळा पाहण्यासाठी शहरापासुन दुर, निसर्गशाळा, वेल्हे या ठिकाणी गेलो.

चंद्र किती वाजता उगवणार? मग ग्रहण किती वाजता सुरु होणार? पृथ्वीच्या विरळ सावलीत चंद्र किती वाजता येणार? मग गडद सावलीमध्ये चंद्र किती वाजता येणार? तसा तो विरळ सावालीमधुन गडद सावलीमध्ये जाताना, चंद्राच्या वातावरणात कशाप्रकारे बदल होणार, इत्यादी सगळे अचुक ठोकताळे आपणास आधीपासुनच मिळाले आहेत. त्यामुळे तयारीसाठी आपणा सर्वा कडे वेळ होता. आम्ही आमच्या कॅम्पसाईटवर ४ वाजण्याच्या सुमारास पोहोचलो. ग्रहण सुरु झाल्यावर पोटापाण्याकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही हे माहीत असल्याने, साडेपाचच्या सुमारासच चहा बिस्कीट असा अल्पोपहार करुन आम्ही आमच्या बंदुका(कॅमे-याच्या लेन्सेस, टेलेस्कोप इत्यादी) ताणुन बसलो होतो. खरतर, हे चंद्रग्रहण आपल्याला उघड्या डोळ्यांनादेखील स्पष्ट दिसणार होते, तरीही आमची आपली नुसती हौस ! बाकी काय!!!

निसर्गशाळा कॅम्पसाईट, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आहे. असे असले तरी, कॅम्पसाईटच्या चार ही बाजुंनी डोंगर आहेत. त्यामुळे सर्वात आधी प्रश्न होता, नक्की कोणत्या ठिकाणी आपण आपले बस्तान मांडायचे. त्यानुसार थोडा शोध घेतला आणि जागा निश्चित केली. नदीच्या पलीकडच्या डोंगराच्या उतारावरील एका भाताच्या खाचरात आम्ही सतरंज्या चटया टाकल्या. खगोलशास्त्रींच्या अंदाजानुसार ग्रहण संध्याकाळी सहा वाजुन एकवीस मिनिटांनी सुरु होणार होते आणि चंद्रोदय त्याच्या नंतर ३ मिनिटांनी होणार असा अंदाज होता.  आमची सगळी तयारी झालेली होती. टेलेस्कोप, कॅमे-यांचे ट्रायपॉड स्थिर झाले होते. सुर्य मागच्या डोंगराच्या मागे मावळणार होता. त्या मावळत्या सुर्याकडे पाठ करुन उभे राहिल्यास, आमची सावली ज्या दिशेला जात होती, त्या दिशेला आमच्या सावलीतुनच पुढे सरळ रेष जर काढली असती तर ती रेष, सरळ राजगडाच्या बालेकिल्ल्यावर संपली असती. राजगडाचा बालेकिल्ला हेच आमच्यासाठी आता क्षितिजाचे ते शेवटचे टोक होते, जिथुन चंद्र उगवणार होता. आता पावणे सात वाजुन गेले होते तरी अजुन ही चंद्र काही उगवलेला नव्हता. पुनःपुन्हा मोबाईल मध्ये वेळ तपासणे आणि राजगडाच्या बालेकिल्याकडे पाहणे या शिवाय दुसरे काही कामच नव्हते. आता आमच्या सोबतच्या मंडळींनी टेलेस्कोप, कॅमेरा इत्यादी उपकरणे अगदी तयार करुन ठेवली होती. सगळेच जण आता चंद्र उगवण्याची वाट पहात होते. एक एक क्षण आतुरतेने आम्ही पुर्व क्षितिजाकडे बघत बसलो होतो. एव्हाना अंधार पडला होता. मावळतीला डोंगररांगेची किनार, केसरी रंगाच्या पार्श्वभुमीवर उठुन दिसत होती. पुर्वेला मात्र अंधारुन आले होते. कॅम्पसाईटच्या परीसरात रस्त्यावरच्या लाईट्स, घरातील लाईट्स, गाड्यांच्या लाईट्स, असे कोणत्याच प्रकारचे प्रकाश प्रदुषण नसल्याने, हा काळोख नजरेत भरत होता.  एवढ्यात माझी नजर आकाशात थोडी दक्षिणेला गेली. मृगनक्षत्रातील व्याध त्याच्या तेजाने चकमत होता, एवढा अंधार एव्हाना झाला होता. हळुहळु मृगनक्षत्रातील सगळेच्या सगळे तारे दिसु लागले. त्याच्या वर, थोडेसे डावीकडे रोहीणी नक्षत्रातील रोहीणी तारा देखील रोहीत झाला होता. रोहीणीचा उलटा इंग्रजी “व्ही” स्पष्ट दिसत होता. एका मागुन एक सगळी नक्षत्रे दिसु लागली. एवढ्यात बाजुचे कुणीतरी आश्चर्यचकीत होऊन “चंद्र उगवला” असे ओरडले.

चंद्र उगवला असे शब्द कानावर पडल्याबरोबर, सगळ्यांच्या नजरा, पोर्णिमेचा पुर्ण चंद्र पुर्व क्षितिजावर शोधु लागल्या. पोर्णिमेचा पुर्ण चंद्र, ही काही शोधण्याची गोष्ट नव्हतीच मुळी. त्यातच आजचा सुपरमुन. तरी ही त्याला शोधावे लागले. हा शोध अगदी काही क्षणांचा होता. नजर स्थिर झाली, राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या वर आकाशात, दिसणा-या लालसर चंद्राकडे. हो बरोबर वाचल तुम्ही चंद्र लालसर, रक्तवर्णाचा झालेला होता. त्यामुळेच त्याला शोधण्याची गरज पडली. पुर्ण चंद्र दिसत होता. पण त्यातुन नेहमी ज्या प्रकारे प्रकाश परावर्तित होतो तसा प्रकाश नव्हता. फक्त एक लालसर गोल आकार दिसत होता. त्यातही चंद्रावरील विवरांच्या पार्श्वभुमीवर तो रक्तवर्ण कमीअधिक गडद-फिकट भासत होता. चंद्र आता पृथ्वीच्या गडद सावलीमध्ये होता. विरळ सावली, गडद सावली आणि सुर्यप्रकाश यांच्या तिहेरी मिश्रणाने, चंद्र रक्त वर्णी दिसत होता. प्राचीन अमेरीकन संस्कृतीमध्ये (माया) अशा प्रकारे दिअसणा-या चंद्रास ब्लड मुन असे म्हटले आहे. व वर्तमानात देखील चंद्रग्रहणाच्या अशा अवस्थेला ब्लडमुन असेच म्हणतात.

पृथ्वीची गडद सावली चंद्रापर्यंत पोहोचताना आकाराने लहान होत जात असावी. तरीही ह्या सावलीचा गोलाकार चंद्रास झाकोळेल एवढा मोठा आहे हे उघड्या डोळ्यांना देखील स्पष्ट दिसत होते. क्षितिजापासुन अंदाजे दोन-एक हात, चंद्र वर आकाशामध्ये होता आता. अगदी पुर्ण चंद्र होता. पोर्णिमेचा चंद्र होता. पण आकाशात सत्ता होती अंधाराची. इतका वेळ रक्त वर्णी चंद्राकडे पाहण्याच्या नादात आकाशात लक्षच गेले नव्हते. सहजच मान अवघडी म्हणुन वळवायला गेलो तर आकाशात अमावस्येच्या रात्री दिसते तसे तारांगण, अगदी तारे-तारकापुंजांनी खच्च भरलेले दिसत होते. हा देखील एक दुर्मिळ देखावा होता. एकीकडे पोर्णिमेचा पुर्ण चंद्र दिसतोय तर त्याच्या अगदी शेजारी आणि सर्वदुर तारे लख्ख चमचम करताना पाहणे म्हणजे दुधात साखर होय. पुष्य, पुनर्वसु, मृगनक्षत्र, रोहीणी, कृत्तिका, भरणी, अश्विनी, रेवती, पुर्वा भाद्रपद आणि उत्तरा भाद्रपद अगदी स्पष्ट दिसत होते. म्हणजेच आकाशात ही दहा नक्षत्र एकाच वेळी दिसणे अमावस्ये शिवाय शक्य नाही, पण आज आम्ही पोर्णिमेच्या दिवशी हे सर्व बघत होतो. यापुर्वी असा योग साधारण पणे दिड एकशे वर्षापुर्वी आला होता.

Photo by Dr Himanshu Pandav

Photo by Dr Himanshu Pandav

आज आपणास आधुनिक साधन सामुग्री आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर अशी ग्रहणे म्हणजे नक्की काय आहे याची उकल झालेली आहे. याच चंद्रास ब्लड मुन म्हणायचे कारण खरे तर कोणतीही कविकल्पना नाहीये बर का. ज्यावेळी रेड ईंडियन जमातींना कधीतरी अशा प्रकारचा चंद्र दिसला असेल, की जो पुर्ण उगवलेला आणि पुर्ण प्रकाशमान असताना, हळु हळु लालसर, रक्त वर्णाचा होतो, त्यावेळी त्यांना जमेल तशी उकल त्यांनी या आकाशीय घटनेची केली असेल. चंद्र मरतोय म्हणुन की काय तो रक्तबंबाळ झालाय अशा काही प्रकारचा तर्क त्या वेळी झालेला असु शकतो. ग्रीक लोककथा आणि एका मातीच्या पाटीवरील चित्राच्या हवाल्याने, त्या खंडात पहीले ग्रहण ख्रिस्तपुर्व १३७५ व्या वर्षी दिसले असे, पुरातत्व संशोधक सांगतात. ख्रिस्त जन्मानंतर २८० व्या साली (इसवी २८०) सापडलेल्या एका चीनी पुस्तकात ख्रिस्तपुर्व ११३७ व्या वर्षी, चंद्रग्रहण पाहील्याची नोंद आढळते. ह्या नोंदी, चंद्रग्रहण म्ह्णुन झालेल्या नाहीत तर, आकाशातील एक अनाकलनीय घटना अशा अर्थाने झालेल्या आहेत. आता अभ्यासक मंडळींना हे समजते आहे की त्या काळी त्या लोकांनी जे पाहीजे ते ग्रहण होते. याच्या ही पेक्षा आणखी जुना चंद्रग्रहणाचा उल्लेख, चंद्रग्रहण आणि सुर्यग्रहण म्हणुन झालेला आहे तो ख्रिस्तपुर्व ३२ व्या शतकातील. महाभारतातील भीष्म पर्व आणि उद्योग पर्वात सुर्यग्रहण आणि चंद्रग्रहण, दोन्ही ग्रहणे एका पाठोपाठ १३ दिवसाच्या अंतराने झाल्याचे म्हंटले आहे. याचाच अर्थ असा होतो की, जगाभरात लोक ग्रहणांना चंद्रदेव आणि सुर्यदेवाचा खेळ किंवा लिला मानीत होते तेव्हा आपले पुर्वज खगोल शास्त्रात खुप प्रगत अवस्थेप्रत पोहोचले होते. आर्यभट नावाच्या एका महाराष्ट्रीय संशोधकाने, ( जन्म – इसवी ४७६), ग्रहण म्हणजे नक्की काय याचे विस्तृत वर्णन त्याच्या गोलपाद नावाच्या ग्रंथात केले आहे. आधुनिक वैज्ञानिकांना ग्रहण म्हणजे काय याचा शोध लागण्यासाठी एकोणीसावे शतकाच्या शेवटापर्यंत वाट पहावी लागली.

असो, माझी तारांगणाची सफर पुर्ण झाली, पुष्य नक्षत्रापासुन रेवती(भारतीय खगोलशास्त्रातील २७ वे व शेवटचे नक्षत्र) पर्यत आकाशात त्यावेळी दिसणारी सगळीच्या सगळी नक्षत्रे पाहुन आमचा रोख पुन्हा चांदोमामा कडे गेला. साडे सात वाजण्याच्या सुमारास ग्रहण सुटण्यास सुरुवात झाली. त्यावेळी पृथ्वीची सावली थोडी वर सरकली आणि क्षितिजाच्या बाजुने चंद्राचा खालच्या पृष्टभागाची कड लख्ख प्रकाशमान झाली. त्प प्रकाशझोत एवढा परीणामकारक होता की त्यावेळचे दृश्य एका अंगठी सारखे दिसत होते. त्या अगंठीच्या वर एक हिरा जणु लावलेला आहे आणि तो हिरा चमकत आहे. जसजसा घड्याळाचा काटा सरकत होता तसतसा रक्तवर्ण फिकट होऊ लागला. एक चतुर्थांश चंद्र दिसायला लागल्यावर तो रक्तवर्ण जवळजवळ नाहीसाच झाला. आता आकाशातील काळोखाची सत्ता संपुष्टात यायला लागली. सुरुवातीस पुष्य , मग पुनर्वसु, मृग, व्याध, असे हळुहळु सगळी नक्षत्रे दिसेनासी झाली. पृथ्वीची सावली चंद्रापासुन दुर गेली आणि पुर्ण, तेजस्वी, प्रकाशमान चंद्र मुळ रुपात आला. आणि हा सावलीचा खेळ आजपुरता तरी संपला..

Photo by Dr Himanshu Pandav

Photo by Dr Himanshu Pandav

आर्यभट, वराहमिहिर सारख्या प्राचीन भारतीय वैज्ञानिकांच्या तसेच आधुनिक खगोल शास्त्रांच्या अभ्यासकांच्या एकंदरीत अभ्यासावरुन आपल्याला हे समजते की पृथ्वी सौरमंडलाचा भाग. सौरमंडलाची स्वतःची अशी एक पध्दती आहे. एक अचुक नियोजन आहे. सुर्य आणि ग्रह यांच्या स्थिती, गतीमान असुनदेखील अबाधीत आहेत. प्रत्येकाची भ्रमणाची कक्षा निश्चित आहे. हे भ्रमण त्या त्या ग्रहाचे स्वःत भोवती (चंद्रासारख्या अनेक उपग्रहांसहीत) तसेच सुर्याभोवती एका विशिष्ट, पुर्वनियोजित रचनेप्रमाणे अचुकपणे होत आहे. सौरमंडल देखील आणखी एका मोठ्या महान योजनेचा एक छोटासा भाग आहे. आपले सौरमंडल, सुर्यासहीत, ह्या मोठ्या योजनेमध्ये गतिमान आहे. सौरमंडल आकाशगंगेचा भाग आहे. आकाशगंगेच्या केंद्रास गॅलेक्टीक केंद्र असे सम्बोधले जाते. तर सुर्य आणि सौरमंडल ह्या गॅलॅक्टीक केंद्राभोवती, गतिमान आहे. आपल्या सौरमंडलाप्रमाणेच, ह्या आकाशगंगेमध्ये किमान १०० अब्ज तारे-तारकासमुह आहेत. आपल्या आकाशगंगेसारख्या अन्य किमान २०० अब्ज आकाशगंगा अवकाशात असतील असा अंदाज शास्त्रंज्ञांनी नुकताच हबल दुर्बिणीतुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे वर्तवला आहे. आणि ह्या एवढ्या अफाट अशा विश्वाच्या पसा-यात आजच्या सारखा सावल्यांचा खेळ नित्य होत असतो. गीतकार सुधीर मोघेंची एका गीतातील ओळी यावेळी आठवतात..

रात्रीस खेळ चाले, या गुढ चांदण्यांचा ।

संपेल न कधीही हा, खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा ॥

 

श्री. हेमंत सिताराम ववले,

निसर्गशाळा, पुणे

Facebook Comments

Share this if you like it..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *